पंडित पवळे यांच्या 'शिक्षणयोगी' गौरवग्रंथाचे प्रकाशन थाटात संपन्न


नांदेड दि. 6 -

सदोतीस वर्षे विद्यादानाचे कार्य करण्यासोबत तीन दशकांहून अधिक काळ मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे राज्य पुरस्कारप्राप्त  उपक्रमशील शिक्षक पंडित पवळे यांच्यावरील 'शिक्षणयोगी' गौरवग्रंथाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार होते.

यावेळी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, मा. आ. मोहनअण्णा हंबर्डे, अ‍ॅड. डी. के. हांडे, माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, गोदातीरचे संपादक केशव घोणसे पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, पूर्व अति. मु. का. अ. शिवाजीराव कपाळे, पूर्व शिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे, इंजि. शे. रा. पाटील, मधुकरराव देशमुख, कल्पना डोंगळीकर आदींची विशेष उपस्थिती होती. दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांनी संपादित केलेला हा गौरवग्रंथ  निर्मल प्रकाशनाने सिद्ध केला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत आपल्या भाषणात म्हणाले, की पंडित पवळे हे सानेगुरुजींच्या परंपरेतील निष्ठावान शिक्षक आहेत. ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले, ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा गौरवग्रंथ वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी संपादित केला, ही गौरवाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. 

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या भाषणात पंडित पवळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, की पंडित पवळे यांच्यासारखे शिक्षक म्हणजे समाजाची बौद्धिक संपदा आहे. 

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब, कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि अरूणा जाधव यांच्या सुरेल आवाजातील जिजाऊ वंदनेने प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली. स्वागतपर मनोगत निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजीराजे पाटील यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात कामाजी पवार यांनी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणारे शिक्षक लाभणे ही भाग्याची बाब असल्याचे सांगून पंडित पवळे यांनी सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ मराठा सेवा संघाच्या कार्याला वाहून घेण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. डी. के. हांडे यांनी आपल्या मनोगतात पंडित पवळे यांच्या विविध आठवणी सांगून त्यांना सदिच्छा दिल्या.

हॉटेल ताज पाटीलच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला समाजाच्या सर्व स्तरातील स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी पवळे दांपत्याचा ह्रद्य सत्कार केला. पंडित पवळे यांनी उपस्थितांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

टिप्पण्या