दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक व पत्रकार संजय बुडकेवार यांचे निधन झाल्याची वार्ता वाचून मन सुन्न झाले. एक मितभाषी, कर्तव्यकठोर व सर्वसामान्य लेखकांना प्रकाशझोतात आणणाऱ्या मित्राचे असे असमयी एक्झिट अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. यशवंत महाविद्यालयाच्या बातम्या पाठवितांना दैनिक प्रजावाणीच्या कार्यालयात संजय बुडकेवार यांची भेट झाली. ई-मेल किंवा व्हाट्सअपवर बातम्या पाठविण्यापूर्वी बातमी प्रत्यक्ष भेटून दिली जात होती. अशावेळी बऱ्याच बातम्या संजय बुडकेवार यांच्या हातात दिल्या. प्रत्येक नांदेडकराकडे दैनिक प्रजावाणी असल्यामुळे साहजिकच बातम्यांची आणि लेखांची गर्दी असणारच. अशावेळी संजय बुडकेवार यांच्या हातात बातमी देणे किंवा आजच्या काळात ई-मेल किंवा व्हाट्सअपवर संजय बुडकेवार यांची नजर पडणे; म्हणजे बातमी हमखास प्रसिद्ध होणे; हे माझे समीकरण व गणितच बनले होते. प्राध्यापक व शिक्षक वर्गाबद्दल त्यांना अतिव आदर होता. भेटीनंतर ते स्वतः कमी बोलत व इतरांना बोलू देण्याची जास्तीत जास्त संधी देत व इतरांचे म्हणणे पटल्यास त्या सकारात्मक व स्वीकारमय संमती देऊन बातमी आणि लेख प्रसिद्ध करण्याच्या दिशेने वाटचाल करीत. बातम्यांबरोबरच माझे बरेचसे लेखही संजय बुडकेवार यांनी प्रसिद्ध केलेले आहे. विशेषतः 'डॉ शंकररावजी चव्हाण यांच्या हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदान' हा इतिहास विभागातील प्रा. राजश्री भोपाळे यांच्या ग्रंथावरील परीक्षणपर लेख. हा लेख लिहून संजय यांच्याकडे पाठविण्यास वेळ झाला. दैनिक प्रजावाणीमध्ये लेखमाला येण्याचा दिवस रविवार. शनिवारी रात्री आठच्या सुमारास लेख प्रसिद्ध होण्यास पाठविल्यानंतरही लेखाची आवश्यकता व अपरिहार्यता पाहून लेख प्रसिद्ध झाला. रविवारी प्रस्तुत लेखकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत संजय बुडकेवार आज जगात नाहीत; यावर विश्वास ठेवणे कठीणच. त्यांच्या निधनाची वार्ता वाचून धक्का बसला. व जणू असे वाटले की, पायाखालची जमीन सरकली. माझ्यासारख्या नवख्या लेखक व बातमीदार प्राध्यापकाचा बातम्या व लेख देणे हा छंद. हा छंद पाहून प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी यशवंत महाविद्यालयाच्या प्रसिद्धी समन्वयकपदी नियुक्ती केली. आपण दिलेली बातमी प्रसिद्ध झाल्याचे वाचून व केवळ नांदेडच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेल्या वाचनीय, निष्पक्ष प्रजावाणीमध्ये नाव येणे म्हणजे छाती फुलून येणे व एक प्रकारे आपल्याला जनमान्यता प्राप्त होणे होय. नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन केंद्रातील एका व्याख्यान कार्यक्रमात आदरणीय सौ.शामल पत्की म्हणाले होत्या की, सूर्योदय होणे आणि दैनिक प्रजावाणीचे वाचन या इतक्या सरमिसळ झालेल्या बाबी आहेत की, त्यांना एकमेकापासून वेगळे करणे शक्य नाही. अशा या मान्यताप्राप्त दैनिकाच्या उपसंपादकाला काळाने अवेळी हिरावून घेणे म्हणजे पत्रकारिता क्षेत्राची फार मोठी हानी आहे. बऱ्याच प्रसंगी संजय बुडकेवार यांची प्रत्यक्ष भेट होत असे. पत्रकारीतेशिवाय, बातम्या व लेखाशिवाय इतर काही ते अजिबात बोलत नसत. सदैव कार्यामध्ये गर्क राहत असत. कधीही फोन केल्यानंतर फोन स्वीकारत असत व बातमी आणि लेखाबद्दल शाश्वती देत असत. दैनिक प्रजावाणीच्या आधारस्तंभापैकी एक महत्त्वपूर्ण आधार संजय बुडकेवार यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जगाचा निरोप घेणे; म्हणजे एक सहकारी वृत्तीचा चांगला मित्र, पत्रकार, बातमी व लेखाची हमखास शाश्वती देणारा उपसंपादक गमावणे आहे. हे दुःख व वेदना कायमस्वरूपी मनात सलत राहील. स्व. संजय बुडकेवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- *-डॉ.अजय गव्हाणे,*
- राज्यशास्त्र विभागप्रमुख व प्रसिद्धी समन्वयक,
- यशवंत महाविद्यालय, नांदेड.
addComments
टिप्पणी पोस्ट करा