शंकर वाडेवाले हे शेताशिवारात रमलेले कास्तकार कवी आहेत. एकेकाळी ते शिक्षक होते. शेतीमातीवरच्या आणि कवितेवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांनी फार लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि शेतीला नि कवितेला वाहून घेतले आहे. मागील ३६ वर्षांत त्यांचे कढवाही, आभाळमाती, माती बोले गूज, देह चंदनाचा, मायीच गाणं, थेंब थेंब पाऊस आणि गाणं शिवारातल्या माणसांचं हे ७ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.आता त्यांचा 'नादारीचा सातबारा' हा नवीन कवितासंग्रह आला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे शेताशिवाराला आलेली अवकळा आणि कास्तकारांची होत असलेली कुतरओढ हा ह्या कवितेचा विषय आहे.
शहरात सुखात राहून शेती आणि शेतकरी यांच्याविषयी उमाळ्याने लिहिणे वेगळे आणि शेतीमातीत मिसळून, आयुष्याचा खत करून जीवनाचा जमाखर्च मांडणे वेगळे. 'नादारीचा सातबारा' ह्या कवितासंग्रहात कवीने कास्तकारांच्या बेदखल जिनगानीचा जमाखर्च मांडला आहे.
'शेत माझे पंढरपूर। नदी माझी चंद्रभागा
वारकरी मायबाप। त्यांच्या पायी माझी जागा'
ही कवीची आत्मीय श्रद्धा आहे.
'शिवार माझा पंढरी
झोपडी माझा विसावा
गुंतलेला प्राण माझा
झाडावेलीत दिसावा'
इतकेच कवीचे मागणे आहे. पण कवीची ही किमान अपेक्षाही पूर्ण होताना दिसत नाही.
कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी हे भारतीय शेतीचे भागधेय आहे. पावसाची लपाछपी हा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा खेळ आहे. ढगफुटीने सोयाबीन मातीमोल झाले आहे. झाडावरच कापसाच्या वाती झाल्या आहेत. उडदामुगाला मोड फुटले आहेत. घरची चूल उपाशी आहे. सालोसाल पावसाची हीच बोंबाबोंब आहे. जित्राबाची दैना झाली आहे. आखरं ओस पडत चालली आहेत. गोठ्यात जनावरांचे बिरडे थिजत चालले आहेत. कास्तकारांच्या शरीराच्या सनकाड्या झाल्या आहेत. कर्जाच्या नागोबानं घरादाराला दंश केला आहे. सातबारावरचा बोझा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कास्तकारांच्या नशिबी नादारीचं जीनं आलं आहे. यातच अनेक पिढ्या बरबाद झाल्या आहेत.
अशा परिस्थितीत धगधगत्या मनात अंगार फुलत आहे, हे कवीचे निरीक्षण आहे. तथापि त्याचे परिणाम दिसत नाहीत.
'असं रोजचं मरण। कुणब्याच्या नशिबात
कष्टाविन फळ दुज्या। जगावेगळीच रीत'
'मळ्याला कुपाटी। पोटाला उटी
कर्जाच्या खाईत। कण्या वाटी वाटी'
ही मोठीच शोकांतिका आहे. शेतकरी दिवसरात्र राबून शेती पिकवतो आणि दलाल भरातली सुगी लुटून नेतात, ही बाब अस्वस्थ करणारी आहे.
म्हणून कवी आपल्या बांधवांना
'पुरे झाली सौदेबाजी। गुलामीचे पाश तोड'
असे आवाहन करतो आहे.
हल्ली कुणब्याच्या आयुष्याला घूस लागली आहे. टगे कारभारी झाले आहेत.
'सरत्यावर मूठ जीवा चुटपूट
उनगलं रान झाली सारी लूट'
ही लूट उघड्या डोळ्यांनी पाहावी लागते, हे त्याहून वाईट.
'आडतीत माल नेला,
नाही तिथं मोल त्याला
मात-याचं दाम मला
निक्की रास आडत्याला'
अशी ही विषम विभागणी झाली आहे.
'ऋतूंच्या चक्रात। नागवी माती
घरात अंधार। रिकामी पोती'.
ही नागवणूक जशी मातीची आहे, तशीच ती शेतकऱ्यांचीही आहे. सावकारी पाशात शेतकऱ्यांची मान अधिकाधिक गुंतत चालली आहे.
'योजनांचा भडिमार, वाटपाची ऐशीतैशी'
ही शासनस्तरावरची अनास्था आहे.
शेती हा आतबट्ट्याचा खेळ झाला आहे.
'चक्रव्यूह' ह्या कवितेत कवीने जणू आपले मनोगतच व्यक्त केले आहे. यातील कवीचे आत्मपरीक्षण कौतुकास्पद आहे.
'पाटीलकीच्या नादात
बापानं आय्याशी केली
बाईबाटलीच्या नादात
घराची राखरांगोळी झाली'
असे लिहिताना कवीची लेखणी अजिबात कचरत नाही.
'गरिबीला पुरून उरलीस' अशा शब्दांत कवीने सहचारिणीविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
'शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व
शेतकऱ्यांनीच केलं पाहिजे
वाटाघाटीसाठी सरकारनं
बांधावरच गेलं पाहिजे'
ही कवीची अपेक्षा आहे. पण लक्षात कोण घेतो!
आयुष्यभर आसमानी आणि सुलतानी चरकात पिळून निघाल्यानंतर शेवटी कवीला असे वाटते, की
'जर आसवांवरती
भिजली असती भोय
तर पोटापाण्याची
झाली असती सोय'.
कवी शेतीमातीशी इतका एकरूप झाला आहे, की त्याला माती हीच माता वाटते.
'असा चिपाडला जीव
रक्त पाजतो भोयीला
चिल्लेपिल्ले जगविण्या
दान मागतो भोयीला'.
देणारीही तीच आणि घेणारीही तीच असल्यावर अन्य कुणीही तारणहार उरत नाही.
'नादारीचा सातबारा'मधून कवीने वाचकांना गावगाड्यातून आणि शेताशिवारातून फिरवून आणले आहे. या विश्वात आपल्याला माय, बाप, कवी आणि कवीचा गोतावळा भेटतो. मराठवाडी बोलीभाषेतील बोंगाळणे, झांबडणे, मायंदळ, कर्तूक, हिसाळा, बळद, खवंद, नकितर, तनखजाळ, भिरूड, चोयट्या, पलान, म्हामूर, इवक, हाराशी इ. शब्द मराठवाडी संस्कृतीची ओळख करून देतात. बेणे आणि भाडे ह्या शिव्यांना कवीने ओवीच्या अवकाशात ओतले आहे. नादारीच्या सातबारावर उनगलेल्या पिकांच्या नोंदी गडद होऊन उतरल्या आहेत. मुखपृष्ठावरील कवीची छवी मोठीच अन्वर्थक आहे.
'नादारीचा सातबारा (कवितासंग्रह)
कवी : शंकर वाडेवाले
प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड
पृष्ठे ८०. किंमत रु. १५०
मुखपृष्ठ मांडणी : विजयकुमार चित्तरवाड
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा