नवी मुंबईमधील ठाणे बेलापूर पट्टीतील सानपाडा येथील आगरी कोळी समाजातील लग्न सोहळ्यात होणारा खर्च टाळण्यासाठी सानपाडा येथील ग्रामस्थांनी समाजात जागृती व्हावी म्हणून एक दिवशीय लग्न सोहळा करण्याचे आवाहन केले होते. या आव्हानास चांगला प्रतिसाद लाभला असून २८ डिसेंबर २०२४ रोजी चिरंजीव जय आणि चि.सौ.का. रोशनी या वधू-वरांचा एक दिवसीय लग्न सोहळा दत्तमंदिर सभागृहात संपन्न झाला. नवी मुंबईत पहिला एकदिवसीय लग्न सोहळा यशस्वी करून सानपाडा ग्रामस्थांनी नवीन एक आदर्श घालून दिला आहे.
आगरी कोळी समाजातील लग्न म्हणजे सहा दिवसाचा एक मोठा उत्सव असतो. त्यामध्ये चहापाणी, साखरपुडा, मेहंदी, हळदी समारंभ, लग्न व सत्यनारायण महापूजा याचा समावेश असतो. दिवसागणी या कार्यक्रमात खर्च करण्याची स्पर्धाही वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना साखरपुडा व हळदी समारंभ याचा वाढणारा खर्च परवडत नसल्याने अनेक जण लग्नकार्यासाठी कर्जाच्या खाईत उडी घेतात. आगरी कोळी समाजाच्या हळदी समारंभ व लग्न खर्चावर नियंत्रण आनण्यासाठी सानपाडा ग्रामस्थांद्वारे ग्रामसभेत प्रबोधन करण्यात आले होते. सहा दिवसाच्या लग्नकार्यात अवास्तव होणारा खर्च टाळण्यासाठी सानपाडा गावातील दत्त मंदिराच्या देवस्थान समितीतर्फे एक आदर्श निर्णय घेण्यात आला की, एक दिवसात लग्न सोहळा पार पाडल्यास त्या वधू-वरांना लग्नासाठी सभागृह मोफत देऊन ५१ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. या आव्हानाला सानपाडा ग्रामस्थांनी चांगला पाठिंबा दिल्यामुळे यश आले आहे. या निर्णयामुळे सानपाडा गावातील रेखा भरत मढवी यांनी एक दिवशीय लग्न सोहळा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चिरंजीव जय आणि चि. सौ. का रोशनी यांचा शुभविवाह सर्व विधीनशी २८ डिसेंबर रोजी दत्त मंदिर सभागृहात संपन्न झाला.
आगरी समाजातील पारंपारिक सर्व लग्न विधि साखरपूडा, भातखुंटणी, देवाचं मानपान, नवरा नांदवणे, धवलारिन सौ.अनुसया मढ़वी यांच्या सुरेख आवाजात संपूर्ण दिवसभर श्री दत्त मंदिर हॉलवर उत्साहात पुर्ण करण्यात आल्या .
चि.जय रेखा भरत मढवी यास एकदिवसीय लग्न सोहळ्यासाठी प्रोत्साहनपर मा.नगरसेविका सौ.कोमल सोमनाथ वास्कर व व्यावसायिक शंकर शि.पाटिल यांच्या वतीने घोषित असलेले रोख ५१००० हजार रुपये, सन्मानचिन्ह व भेटवस्तु शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विट्ठलजी मोरे यांच्या हस्ते वधु वरास देण्यात आले. याप्रसंगी सोबत देवस्थान समितिचे सर्व पदाधिकारी, मा.नगरसेवक सोमनाथ वास्कर, नगरसेविका सौ.सुनंदा पाटील , व्यावसायिक शंकरशेट पाटील, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील, भालचंद्र पाटिल , सुरेश वास्कर , प्रल्हाद ठाकुर, शत्रुघ्न पाटील व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वधु वरांस शुभाशिर्वाद देण्यासाठी मा.संदीप नाईक, मा.नगरसैविका सौं.कोमल सोमनाथ वास्कर, देवस्थान समितिचे अध्यक्ष सदानंद पाटील ,साईनाथबुवा पाटील , अमित भोईर, दिगंबर पाटील,राजेश ठाकुर व सानपाडा ग्रामस्थ उपस्थित होते. सदर लग्नसोहळ्यासाठी मौजे सानपाडा देवस्थान - हॉल, राकेश डेकोरेटर्स - ( मंडप,स्टेज सजावट), जयनाथ पाटील - ( बॅंजो ) ॐ कार कला सर्कल- ( ब्रास बैंड), रमेश वास्कर ( जेवण ) , अनिल पाटिल ( भटजी ) अर्जुन नाईक, प्रल्हाद ठाकुर यांचे विशेष सहकार्य लाभले.
आगरी समाजात लग्नाला सरासरी २० ते २५ लाख रुपये खर्च करून ज्या रीतिरिवाजानुसार आगरी समाज बांधव लग्नकार्य आजपर्यंत करीत आले, त्याच धर्तीवर आगरी परंपरा जोपासत संपन्न झालेल्या एकदिवसीय लग्न सोहळ्याचे नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील सर्व आगरी समाज सानपाडा ग्रामस्थांचे कौतुक करीत आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा