*यशवंत महाविद्यालयात 'भारतीय भाषा उत्सव' संपन्न


नांदेड:( दि.१३ डिसेंबर २०२४)

          भारत सरकार आणि विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या निर्णयानुसार, प्रसिद्ध तमिळ कवी, लेखक, पत्रकार आणि स्वतंत्रतासेनानी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ११ डिसेंबरला 'भारतीय भाषा उत्सव' साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याचा उद्देश जनसामान्यांमध्ये मातृभाषेचा प्रचार वाढवणे तसेच जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक परंपरांबद्दल जागरूकता पसरविणे आणि भारतासारख्या बहुभाषिक देशाच्या अखंडतेसाठी भाषिक सद्भाव निर्माण करणे हे आहे. 

          यावर्षी 'भारतीय भाषा उत्सव' ११ डिसेंबर रोजी भव्यपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे - जसे की डिजिटल माध्यमांद्वारे भारतीय भाषांचा प्रचार करणे, बहुभाषिक सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, गाणी, खेळ, मनोरंजनात्मक क्रियाकलापांद्वारे विविध भाषांचा संवर्धन करणे तसेच चित्रपट स्क्रीनिंग, सेमिनार, कार्यशाळा, वादविवाद, विविध भाषिक प्रदेशांतील खाद्यपदार्थ, प्रदर्शने, भाषा शिक्षण केंद्रे, लेखकाशी संवाद, नाटके, लोकसंगीत इत्यादींच्या माध्यमातून नवकल्पना आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे. 

          या अनुशंगाने श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागाद्वारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विश्वविद्यालयाचे माजी प्र- कुलगुरू आणि प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या प्रेरणेतून 'लेखकांशी संवाद' हा कार्यक्रम आभासी मंचावर आयोजित केला गेला. 

          'लेखकांशी संवाद' या शीर्षकाखाली महाविद्यालयाच्या आभासी सभागृहात संवादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचे चित्रीकरण भ्रमणध्वनीद्वारे करण्यात आले आणि यूट्यूबच्या आभासी मंचावर प्रसारित करण्यात आले. ज्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. या संवादात, आखाडा बालापूर येथील हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रो. डॉ. रमेश कुरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या संवादात त्यांची कविता, कथा आणि त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ यावर खुल्या चर्चा झाल्या तसेच आरक्षण, दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानावर उत्कृष्ट विश्लेषण केले गेले. हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. सुनील जाधव यांनी विद्वत्तापूर्ण संवाद घेतला.

          कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदी विभागप्रमुख प्रो.डॉ.संदीप पाईकराव यांनी केली. आभार डॉ. साईनाथ शाहू यांनी मानले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल. व्ही. पद्माराणी राव, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या