'मैत्री आमची भारी' : लाघवी बालकविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.


ज्येष्ठ बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड हे बालसाहित्याच्या क्षेत्रातील एक झपाटलेले झाड आहे. बालकुमारांसाठी त्यांनी सातत्याने, कसदार आणि गुणात्मक लेखन केले आहे. त्यांची बालकथा, बालकविता, नाट्यछटा, काव्यकोडी, चरित्र इ. वाङ्मयप्रकारांतील ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'छंद देई आनंद' ह्या बालकवितासंग्रहासाठी गतवर्षी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. बालसाहित्यावर त्यांचे जितके प्रेम आहे, तितकीच अव्यभिचारी निष्ठा आहे. विरंगुळा म्हणून ते लेखन करत नाहीत, तर एक ध्यास घेऊन लेखन करतात. नुकताच त्यांचा 'मैत्री आमची भारी' हा बालकवितासंग्रह दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. 

'मैत्री आमची भारी' ह्या कवितेतली मैत्री कोणाशी? तर पुस्तकांशी. पुस्तके अवघड ते सगळे सोपे करून देतात. आपली आनंदाची बाग फुलवितात. उत्तुंग भरारी घेण्यासाठी पंखांना बळ देतात. 

लहान मुले मोठेपणी कोण व्हायचे याची स्वप्नं रंगवत असतात. अशा स्वप्नाळू मुलांना कवी एका कवितेतून सल्ला देतात :

'वारा, झरा, तारा, दोरा

अथवा व्हा धारा, चारा

मदतीसाठी धावून जाता

जगण्यास येई अर्थ खरा'. 

स्वप्नरंजन करण्यापेक्षा इतरांना मदत करण्यातूनच आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होत असतो, असा संदेश ही कविता देते. 'बापूजी' आणि 'गाडगेबाबा' ह्या कवितेत कवीने ह्या महापुरुषांचे काव्यमय चरित्र उभे केले आहे. 

'ऋतुरंग' ह्या कवितेत कवीने सहा ऋतूंचे सहा सोहळे सुंदर शब्दांत वर्णन केले आहेत. 'पत्रास कारण की... ' ह्या कवितेत दुर्मीळ होत चाललेली पत्रलेखनाची कला शिकविली आहे. 

'पाऊलवाट' ही कविता वाचताना असे वाटते, की एकनाथ आव्हाड यांची बालकविता म्हणजे बालशिक्षणाची खरीखुरी पाऊलवाट आहे. 

एकनाथ आव्हाड यांच्या बालकवितेत आपल्याला काही चतुर मुले भेटतात. 'माझं काय चुकलं?' ह्या कवितेतील बबलू हा असाच एक चतुर आणि हजरजबाबी मुलगा आहे. तो आपल्या अक्कलहुशारीने गुरुजींना निरुत्तर करतो. 

'निसर्गायन' ह्या कवितेत कवीने तपांबर, स्थितांबर, दलांबर, शिलावरण, वातावरण, जलावरण ह्या भूगोलातील संकल्पना सोप्या करून सांगितल्या आहेत. कवितेच्या शेवटी 

'म्हणूनच सारे करू संकल्प 

चला वाचवू जंगल, रान

ओसाड उजाड माळावरती

पुन्हा डोलू दे पान न् पान' 

ह्या शब्दांत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला आहे. 'डोंबा-याचा खेळ' ह्या कवितेत शाळाबाह्य मुलाचे ह्रदयस्पर्शी शब्दचित्र रेखाटले आहे. मीठमिरची, हळदकुंकू, पानसुपारी, लहानमोठा, नफातोटा, भोळाभाबडा, मायलेकरू, गायवासरू, काळासावळा, संगतसोबत हे जोडशब्द म्हणजे मराठी भाषेचे वैभव आहे. 'संगतसोबत' ह्या कवितेत अशा जोडशब्दांचे सौंदर्य उलगडून दाखविले आहे. 

'माणुसकीचा धर्म' ह्या कवितेत कवीने 'माणसालाच माणसाची भूक समजते', अशा शब्दांत माणुसकीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 

'दातांची बात' ह्या कवितेत हसतील त्याचे दात दिसतील, दात ओठ खाणे, दाताच्या कण्या करणे ह्या म्हणी आणि वाक्प्रचार गुंफले आहेत. तसेच 'कानाची बात' ह्या कवितेत कान उपटणे, कानाला खडा लावणे, हलक्या कानाचा असणे, कान भरणे, कानीकपाळी ओरडणे इ. वाक्प्रचार छान गुंफले आहेत. एकनाथ आव्हाड यांच्या बालकवितेचे हेच तर वेगळेपण आहे. 

सुविचार वाचण्याची आणि लिहिण्याची सवय चांगलीच, पण सुविचार आचरणात आणणे त्याहून चांगले. 

'गुरुजी म्हणती सुविचारांना

द्यावी कृतीची जोड

कर्तव्याची फळे नेहमीच

लागत असतात गोड' 

अशा शब्दांत 'गुरुजी' ह्या कवितेचा बोधप्रद समारोप केला आहे. 

'नशिबापेक्षा मेहनतीलाच अधिक आपले मानावे', 'अहंकाराचा कधीही वारा लागू न द्यावा', 'कर्मावरच पुरता विश्वास ठेवावा', 'समस्या म्हणजे संधीचे असते नवे रूप', 'अडचणींचा सामना करणे हे यशाचे प्रवेशद्वार' ह्या सुवचनांमुळे कवितेची उंची आणखी वाढली आहे. 

'खूप झालं सांगून' ह्या कवितेत कवीने काव्यकोडे घातले आहे. 

'शाळेची मधली सुट्टी' म्हणजे बाळगोपाळांसाठी आनंदपर्वणी. या सुट्टीत प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या मनाचा राजा असतो. विद्यार्थ्यांचे हे राजेपण कवीने फारच बारकाईने टिपले आहे. 

'गाणं' ह्या कवितेत वर्तमानकाळाची उदाहरणे दिली आहेत.

'मी झाड होतो' ही कविता म्हणजे कल्पनारम्यतेचे उत्तम उदाहरण आहे. 

एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्यात ज्ञान आणि मनोरंजन ही मूल्ये हातात हात घालून येताना दिसतात. त्यांनी आपल्या लेखनातून बालवाचकांसाठी माहितीचा, ज्ञानाचा आणि निर्भेळ आनंदाचा खजिनाच खुला केला आहे. बालकुमार वाचकांसाठी अक्षरलेणी घडविली आहेत. आपल्या बालसाहित्यातून ते बालकुमारांच्या भावविश्वातील सुकुमार संवेदना जागवतात. मनोरंजन करत असतानाच बालवाचकांच्या अप्रगट सुप्त शक्तींना ते आवाहन करतात. 

एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य बालवाचकांच्या वयोगटाशी आणि वर्तमानकाळाशी संवादी असते. ते आपल्या बालसाहित्यातून बालकुमारांचे भावविश्व आणि विचारविश्व सहजतेने उलगडून दाखवतात. एकनाथ आव्हाड यांची बालकविता बालकांचे आत्मभाव आणि आत्मभान जागे करून त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन घडविण्यासाठी मदत करते. एकनाथ आव्हाड यांचे समग्र बालसाहित्य म्हणजे एक स्वतंत्र 'संस्कारपीठ' आहे.

उत्तम कवितालेखन आणि तितकीच उत्कृष्ट निर्मिती यासाठी कवी आणि प्रकाशक, ह्या दोघांचेही हार्दिक अभिनंदन!

मैत्री आमची भारी (बालकवितासंग्रह) 

कवी एकनाथ आव्हाड 

दिलीपराज प्रकाशन, पुणे. 

मुखपृष्ठ : संतुक गोलेगावकर

पृष्ठे ५६      किंमत रु. १८०


डॉ. सुरेश सावंत, नांदेड

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या