लोकशाही स्थिर, विकासमान व समृद्ध करण्यासाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे. लोकशाही व्यवस्था ही जनतेच्या सहभागाने विकसित होत असते. लोकशाहीवर कितीही टीका होत असली तरी लोकशाहीला पर्याय 'लोकशाही'च आहे. माओ नावाचा विचारवंत म्हणतो, "क्रांती ही केवळ दोनच माध्यमातून होते;बुलेट किंवा बॅलेट." बुलेट म्हणजे बंदुकीची गोळी आणि बॅलेट म्हणजे मतपत्रिका. आज मतपत्रिकेची जागा ईव्हीएम मशीनने घेतलेली आहे.
२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक असल्यामुळे ईव्हीएमचा वापर अपरिहार्यपणे येणारच. आपण काळाच्या पाठीमागे जाऊ शकत नाही; इतके मात्र निश्चित करू शकतो की, तंत्रज्ञानाचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेऊ शकतो.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा आणि नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्ष, युती, आघाडी यांचा प्रचार, आरोप व प्रत्यारोपाने वातावरण गजबजून गेले आहे. समृद्ध लोकशाहीचे तत्व आहे की, विकास, शिक्षण, रोजगार, स्त्रियांचा दर्जा व सन्मान, नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावणे, प्रादेशिक समतोल साधणे; या मुद्द्यांभोवती निवडणूक प्रचार फिरला पाहिजे.
विविध पक्ष हे देखील लोकशाहीचे अपरिहार्य वैशिष्ट्य आहे. 'समुद्रात ज्याप्रमाणे लाटा नैसर्गिक असतात; त्याप्रमाणे लोकशाहीत राजकीय पक्ष नैसर्गिक असतात.' लोकशाहीत जनता ही सर्वेसर्वा व अंतिम असते. जनतेने मतदानाद्वारे हे निश्चित करणे आवश्यक आहे की, दोन प्रमुख पक्ष असावेत की बहुपक्ष पद्धती, की युती व आघाडी. मात्र ही निश्चिती केवळ मतदानाच्या आधारे होत असते.
जास्तीत जास्त मतदान, हे लोकशाहीतील दोष व गैरप्रकार टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रत्येकाने आपले मत 'दान ' म्हणून न करता मताधिकार म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. लोकशाहीत प्रत्येक बाब जनतेला मतदानाद्वारे विचारून निर्धारित केल्या जात असते.
२० नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील जनतेसाठी आपल्या घटक राज्याचे येणारी पाच वर्षे म्हणजे २०२९ पर्यंत भविष्य निश्चित करण्याचा क्षण आहे.
जो मतदान करीत नाही; तो अप्रत्यक्षपणे, मी या देशाचा नागरिक नाही, असे म्हणत असतो. देशात निवास करायचा, सर्व सेवा सुविधा उपभोगायच्या; मात्र कर्तव्य बजावणीची वेळ आल्यावर नकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा, हे अयोग्य आहे. मतदान न करणाऱ्याला देशातील समस्यांवर बोलण्याचा अधिकार नाही, कारण भविष्य निर्धारणाकरिता लोकशाहीमय उपाय मतदानाच्या रूपाने आपल्यापुढे अस्तित्वात असताना आपण पाठ फिरविणे; लोकशाहीला दुर्बल करण्यासम आहे.
मतदान करताना विचारपूर्वक, जाहीरनामा वाचून, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विज, पाणी आणि रस्ते या मूलभूत गरजांच्या परिपूर्ण पूर्ततेसाठी कोणता राजकीय पक्ष व उमेदवार उपयुक्त व योग्य आहे; याचा सद्सदविवेकपूर्ण सारासार विचार करून मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावला पाहिजे; हीच लोकशाहीची नागरिकांकडून माफक अपेक्षा आहे.
*-डॉ.अजय गव्हाणे,*
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
addComments
टिप्पणी पोस्ट करा