*व्यापक व उदार भूमिकेचा शिक्षक: डॉ.परमेश्वर पौळ*


          श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथील भूगोल विषयाचे डॉ.परमेश्वर पौळ हे सदोदित व्यापक व उदार भूमिका घेऊन कार्यरत असतात. समाजसेवा हे त्यांचे व्रत आहे आणि सतत कार्यमग्न राहणे, ही त्यांची वृत्ती आहे. 

          दि.२ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या कार्याचा संक्षिप्त उल्लेख.

           शिक्षण आणि संशोधन यांचे उपयोजन करत ग्रामीण भागात शाश्वत विकास  करणारा, देशहित कार्यात  कमालीची निष्ठा आणि जीव ओतणारा,  विषयाशी प्रामाणिक राहुन काम करणारी माणसं तसे थोडेचं असतात; त्यातील एक सर्वसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व  म्हणजे डॉ.परमेश्वर पौळ.

           गडयाला निसर्गाची भलतीच आवड. विशेषतः पाणी व वन या निसर्गाच्या संपदेवर फार जीव.  पाण्याच्या थेंबाचा हिशोब याला तोंडपाठ.

          महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जननायक खा.अशोकरावजी चव्हाण यांच्या कार्यप्रणालीने, सर्वसामान्य माणसाप्रती असलेल्या अपार जिव्हाळ्यामुळे, कोणतेही कार्य सूक्ष्म नियोजन आणि व्यवस्थापनाद्वारे पार पाडण्याच्या हातोटीमुळे डॉ.परमेश्वर पौळ यांची अपारनिष्ठा, आपुलकी व जिव्हाळा असलेला आढळून येतो. आदरणीय अशोकरावजी चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे सदोदित कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते; हे त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण तत्व आहे.

            डॉ.परमेश्वर पौळ यांचा जन्म हलाखीची परिस्थिती असलेल्या गरीब शेतकरी मजूर कुटुंबात लातूर या दुष्काळी भागात खंडाळी या गावात झाला. त्यांनी १ ली ते १० वीपर्यंतचे शिक्षण शेतात काम करत करत पूर्ण केले. पुढचे १२ वी ते पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण 'कमवा आणि शिका' या धर्तीवर आपल्यासोबत इतर मित्र परिवाराला घेऊन पूर्ण केले. ते १२ वी ते बी.ए. पर्यंत अहमदपूरला शिकले. एम.ए. उदगीरला. पुढचे जीआयएस, जीपीएस आणि रिमोट सेन्सिंगचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूर्ण केले. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची  समजली जाणारी पदवी म्हणजे पीएच.डी. नांदेडच्या  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाद्वारे प्राप्त केली. 

           ते १० वी नंतर सर्व परीक्षा मेरिटमध्ये पास आहेत. अवघड समजल्या जाणाऱ्या गेट ,पेट, सेट व नेट या परीक्षा ते पास आहेत.

           डॉ.परमेश्वर पौळ यांनी आतापर्यंत ३० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांनी लिहिलेली २ पुस्तके,  विविध विषयावरील १४ लेख प्रकाशित आहेत. ते ११ व १२ वी भुगोल विषयाचे लेखक आहेत. त्यांनी ४० पेक्षा जास्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार व परिषदेत सहभाग घेतला आहे. 

             शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तीन वर्षे आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत संशोधनकार्य पूर्ण केले.

            दुष्काळी भागातील परिस्थितीची जाणीव असल्यामुळे सुरुवातीपासूनच ग्रामीण भागातील लोकांच्या शाश्वत विकासाची त्यांना ओढ होती. म्हणून पाणी हा सर्वात महत्त्वाचा विषय त्यांनी संशोधनासाठी निवडला. संशोधन कार्यादरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची दाहकता त्यांनी पाहीली.

                  समाजसेवेसाठी स्थापन  झालेल्या परमविश्व फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत.

          त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामध्ये.......हजारो लोकांना जलसाक्षरतेत शाश्वत जलव्यवस्थापन करण्यासाठी जलसाक्षरता अभियानाची चळवळ नांदेडमधुन सुरवात करत राज्यपातळीवर त्यांनी पोहचविली, महाराष्ट्रातील सेट, नेट व पीएच.डी. या बुद्धिजीवी वर्गाना न्याय मिळून देण्यासाठी राज्य पातळीवर लढा उभारला, संचिताच्या आधारे वंचितांना शिक्षण कसे मिळून देता येईल, यासाठी परमविश्व फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मोलाची मदत  करतात, नाम पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून  विविध भागात त्यांनी काम केले. डॉ. परमेश्वर पौळ यांनी दिवाळी प्रदूषणमुक्त अभियान राबविले,  सीडबॉल प्रकल्पात सक्रिय सहभाग घेतला तसेच डॉ.परमेश्वर पौळ यांनी आपल्या संशोधनाद्वारे वॉटर बजेटिंग संकल्पनेचे महत्त्व व गरज स्पष्ट केली .

               डॉ.परमेश्वर पौळ यांना ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल टिचिंग आवार्ड: २०१६ प्राप्त झाला आहे.

              अशा या बहुआयामी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वास  वाढदिवसाच्या आणि भविष्यातील कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 

                       *-डॉ.अजय गव्हाणे,*

                    राज्यशास्त्र विभागप्रमुख, 

                यशवंत महाविद्यालय, नांदेड.

टिप्पण्या