डॉ. सुरेश सावंत यांना पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार



नांदेड दि. १८


१३० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या, पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना मिळाला आहे. नांदेड येथील संगत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या, त्यांच्या 'बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध' ह्या संशोधनपर ग्रंथाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वर्धापनदिनी, दि. १६ नोव्हेंबर रोजी पुणे येथे आयोजित एका विशेष समारंभात डॉ. सावंत यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष मा. खा. प्रदीप रावत हे होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. अ. नी. नवरे, कार्यवाह अ. श्री. चाफेकर, आनंद हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. सावंत यांची आजवर ५६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारांसह अन्य प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे ३३ पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. डॉ. सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट झाले आहे. त्यांच्या एकूण बालकवितेवर संशोधन करून एका विद्यार्थ्याने एम. फिल. ही पदवी संपादन केली आहे. 

डॉ. सुरेश सावंत यांची १) वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती, २) बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध, ३) आजची मराठी बालकविता, आणि ४) बालसाहित्यातील नवे काही ही पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहेत. डॉ. सावंत यांनी कुंटूर, जळगाव आणि पैठण येथे संपन्न झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेले आणि संतोष तळेगावे यांनी संपादित केलेले 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

टिप्पण्या