उच्च न्यायालयाचे अहवाल सादर करण्याचे महसूल सचिव व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
नांदेड /प्रतिनिधी - शीख धर्मियांचे यांचे जगविख्यात तीर्थक्षेत्र सचखंड गुरुद्वारा येथे भाविक मोठ्या प्रमाणामध्ये मौल्यवान हिरे मोती सोने चांदीचे दागिने भेट स्वरूपात दान करत असतात. अशाप्रकारे प्राप्त मौल्यवान सोने-चांदीच्या दागिन्यांना वितळून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने याप्रकरणी रणजीतसिंघ गिल व राजेंद्रसिंघ पुजारी यांनी दाखल याचीकेवर निर्णय देताना न्यायालयाने या प्रकरणी केलेल्या चौकशीचा अहवाल दि. 3 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करण्याचे निर्देश सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांना देऊन राज्याचे महसूल सचिव व यांना जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सिख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे दरवर्षी लाखो भाविक जगभरातून दर्शनासाठी येतात. श्रद्धेपोटी भाविक गुरुद्वाराला मोठ्या प्रमाणामध्ये हिरे मोती सोने, चांदीचे दागिने भेट स्वरूपात दान करतात. या दानाच्या माध्यमातून 1971 ते 2020 च्या दरम्यान प्राप्त झालेले मौल्यवान सोने चांदीचे सुमारे 50 किलो वजनाचे दागिने गुरुद्वारा बोर्डाचे तत्कालीन सचिव रवींद्रसिंघ बुंगई यांनी शासनाची परवानगी न घेता सारंग ज्वेलर्सचे मालक संतोष रामकिशन वर्मा यांना वितळून बिस्किट स्वरूपात तयार करण्याचे काम दिले होते.
याचिकाकर्त्यांनी सचखंड गुरुद्वाराला मिळालेले दान स्वरूपातील बहुमूल्य सोने चांदीचे दागिन्यांचा लिलाव केला असता तर यांची मोठ्या रक्कम प्राप्त झाली असल्याचा दावा करीत सदर दागिने वितळून शुद्ध सोन्या चांदीच्या दागिने ऐवजी भेसळयुक्त सोन्या चांदीचे बिस्किटे तयार करून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तत्कालीन प्रशासक डॉ. परविंदरसिंघ पसरिचा यांनी दखल घेऊन राज्य शासनाला याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु या मागणीच्या अनुषंगाने कारवाई पूर्ण न झाल्याने रणजितसिंघ गिल व राजेंद्रसिंघ पुजारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाई करण्याची मागणी केल्याने खंडपीठाचे न्यायाधीश मंगेश पाटील व प्रफुल्ल खुबाळकर यांनी महसूल प्रशासनाचे सचिव व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तीन डिसेंबर पर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याची का कर्त्याची बाजू ॲड. शेख वासिफ सलीम यांनी मांडली तर त्यांना ॲड. कश्यप व अशोक शिंदे यांनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा