*शीव उड्डाणपूल बंद , पालक-विद्यार्थ्यांची धावपळ*


मुंबई -  ( अस्मिता शिर्के)  मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन ११२ वर्षे जुन्या उड्डाणपुलाचे आयुष्यमान संपल्याने तो तोडला जात आहे. तसेच पुढील दोन वर्षांच्या कालावधीत पुलाची पुनर्बांधणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र त्याचा फटका धारावीतील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. धारावीतील अनेक मुलांच्या शाळा या शीव, माहीम, माटुंगा, दादर परिसरात आहेत. त्यामुळे अनेकजण पालकांबरोबर दुचाकीने शाळा गाठायचे. तर, अनेकजण शालेय बसद्वारे प्रवास करायचे. मात्र, पूल बंद झाल्यास पर्यायी मार्गाने पूर्ण वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच वाहतूक कोंडी वाढल्याने , शाळेत वेळेत पोहचण्यासाठी विद्यार्थीं आणि पालकांना लवकरच घर सोडावे लागत आहे.


शीव उड्डाणपूल बंद झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. मुंबईतील महत्वाच्या मार्गांपैकी असलेल्या या पुलाच्या बंदमुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. शिवाय, पालकांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागत आहे. यामुळे वाहतुकीचा वेळ वाढला असून, रस्त्यांवर गर्दी वाढल्याने रहदारीत अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवासात होणाऱ्या विलंबामुळे शाळेतील वेळेवर परिणाम होतो आहे. प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करून पालक-विद्यार्थ्यांची ही धावपळ कमी करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.


 शिव शिक्षण संस्था, डी.एस हायस्कूल, एस.आय. ई.एस.कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, गुरु नानक कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स, सायन म्युनिसिपल हायस्कूल यासारखी अनेक शैक्षणिक संस्था शीव परिसरात आहेत. 


२३ बेस्ट बसच्या मार्गात बदल

एकूण २३ बेस्ट बस मार्ग प्रभावित झाले असून उड्डाणपुलाची पुनर्बांधणी पूर्ण होईपर्यंत हे मार्ग बदललेल्या मार्गांनी चालवले जात आहेत.

दीड लाख वाहने पर्यायी मार्गाने

शीव उड्डाणपुलावरून दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक वाहने ये-जा करत होती. मात्र, उड्डाणपूल बंद झाल्याने, ही वाहतूक इतरत्र वळविण्यात येणार आहे. वाहनांना धारावीतील ६० आणि ९० फूट रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे . तसेच इतर पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होत  आहे.

टिप्पण्या