मुलांना पुस्तकांकडे बघण्याची नवी दृष्टी देणारा प्रयोग नामदेव माळी, सांगली.


श्री. शिवाजी माध्यमिक विद्यालय, येवती, ता. मुखेड जि. नांदेड या शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या बालकवितासंग्रहांची आस्वादक समीक्षक केली आहे. संतोष तळेगावे या शिक्षकाच्या कल्पकतेतून ह्या पुस्तकाने मूर्त स्वरूप धारण केले आहे. अलीकडे महाराष्ट्रभर गोष्टी, कविता, दैनंदिनी इत्यादी साहित्य प्रकारांमधून शाळकरी विद्यार्थी अभिव्यक्त होताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना वाचते आणि लिहिते करण्यासाठी महाराष्ट्रात माधव गव्हाणे, युवराज माने, त्र्यंबकेश्वर पाटील, बालाजी इंगळे, अनिल साबळे इ. शिक्षक सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. 

माधव गव्हाणे आणि युवराज माने यांचे विद्यार्थी सातत्याने पुस्तके वाचतात आणि पुस्तकांविषयी स्वतःची मते मांडतात. पुस्तकाची माहिती सांगतात. जे आवडले त्याच्याविषयी मोकळेपणाने बोलतात. अशा विद्यार्थ्यांनी लिहिलेले पुस्तक परिचय किंवा पुस्तकाची समीक्षा याची पुस्तके प्रकाशित होणे हा याचाच पुढचा टप्पा आहे. एखाद्या साहित्यिकाने लिहिलेल्या पुस्तकाविषयी, त्यांच्या साहित्याविषयी लिहिण्याच्या प्रयोगाचे  प्रमाण अत्यल्प आहे. तथापि ते खूपच महत्त्वाचे आहे. नरेंद्र लांजेवार यांनी मैत्री लांजेवार आणि तिच्या मैत्रिणींकडून असा प्रयोग केलेला होता. 

डॉ. सुरेश सावंत हे सर्जनशील साहित्यिक आहेत.  मुख्याध्यापकपदी कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचन व लेखनविषयक विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य वाचायला देऊन त्या पुस्तकांवर मुलांना परीक्षणे लिहायला प्रेरित केले होते. त्याचे फलित म्हणून 'एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य : बालसमीक्षकांच्या नजरेतून' हे पुस्तक साकार झाले. त्यांनी सतत नावीन्याचा ध्यास घेत मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. शिवाय त्यांच्यासारखे काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांनी सातत्याने प्रेरणा दिली आहे. जी शाळकरी मुले लिहिण्यासाठी धडपडत आहेत, ज्यांनी थोडेफार लिहिले आहे, त्यांच्या पाठीवर डॉ. सुरेश सावंत यांची कौतुकाची थाप नेहमीच प्रेरणा देत आली आहे.

संतोष तळेगावे यांनी डॉ. सुरेश  सावंत यांच्या पावलावर पाऊल टाकत विद्यार्थ्यांकडून  बालकवितासंग्रहांची आस्वादक समीक्षा लिहून घेतली आहे. कदाचित ही समीक्षा रूढ अर्थाने समीक्षा वाटणार नाही. तथापि पुस्तके वाचणे, साहित्याचा आस्वाद घेणे, त्याविषयी आपले मत व्यक्त करणे, त्या पुस्तकाचा परिचय करून देणे हीसुद्धा खूप वेगळी आणि मोठी गोष्ट आहे. वाचनसंस्कृतीच्या पडझडीच्या काळात अशी वेगळी वाट चोखाळणारे शिक्षक आहेत. या आणि अशा  शिक्षकांच्या कडूनच वाचन संस्कृती जोपासण्याची आणि टिकण्याची आशा करण्यास वाव आहे. अशा शिक्षकांमुळे आज आपल्याला थोडेफार नवीन वाचक तयार होताना दिसत आहेत. म्हणून संतोष तळेगावे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

मोठ्यांच्या बालसाहित्याविषयी मोठेच लिहितात. यात नवीन असे काही नाही, परंतु मोठ्यांनी लिहिलेल्या बालसाहित्याविषयी बालवाचकांना काय वाटते, हे अधिक महत्त्वाचे आहे.

संतोष तळेगावे यांनी आपल्या मनोगतामध्ये पुस्तकाच्या निर्मितीविषयी  भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, 'शाळकरी मुला-मुलींनी अवांतर पुस्तके वाचली पाहिजेत. त्यातून प्रेरणा घेऊन ती लिहिती झाली पाहिजेत.  आजच्या मोबाईलच्या, इंटरनेटच्या युगात वाचनसंस्कृती कमी होत चालली आहे. उद्याची पिढी सक्षम करायची असेल तर आपण त्यांना वाचतं, लिहितं केलं पाहिजे', या भूमिकेतूनच त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावली आहे. 

याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी डॉ. सुरेश सावंत यांचे १४ बालकवितासंग्रह विद्यार्थ्यांना वाचायला दिले. विद्यार्थ्यांनी त्यावर अभिप्राय लिहिले. १४ विद्यार्थ्यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या १४ बालकवितासंग्रहांविषयी लिहिलेल्या समीक्षेचे मूर्त रूप म्हणजे 'रानफुलं फुलवणारे बालकवी : डॉ. सुरेश सावंत'  हे पुस्तक होय.

विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या समीक्षालेखांची शीर्षकेही खूप छान आहेत. 'पळसफुलांनी मोहून टाकणारा आणि देशभक्तीने प्रेरित करणारा काव्यसंग्रह : पळसपापडी', 'रानफुलांसारखा मन मोहून टाकणारा बालकवितासंग्रह - रानफुले', 'युद्धाच्या खाईतून शांततेचा मार्ग दाखवणारा कवितासंग्रह :  युद्ध नको बुद्ध हवा',  'नदीची आत्मकथा : नदी रुसली नदी हसली'. ही शीर्षके वाचल्यावर मुलांची वाचनाची आणि लेखनाची झेप किती मोठी आहे हे आपल्या ध्यानात येते. पुस्तकांची समीक्षा लिहीत असताना मुलांनी लेखकांविषयी, लेखकाला मिळालेल्या पुरस्कारांविषयी , या पुस्तकातल्या कविता का आवडतात याविषयी मनापासून आणि विचारपूर्वक लिहिलेले आहे. प्रत्येक कवितासंग्रहाची वैशिष्ट्ये, कवितांचा आशय, कवितांचे प्रकार याविषयी लिहिले आहे. कवितेतून मिळणारा संदेश, कविता मनाला का भावते याविषयी मुले व्यक्त झाली आहेत. 

मुलांना गमतीदार, मजेदार आणि आश्चर्यकारक गोष्टी आवडतात. उत्सुकता लावणाऱ्या, नवीन माहिती देणाऱ्या कविता आवडतात हे दिसून येते. साक्षी बामणे हिला 'भुताचा भाऊ' हे नावच खूप मजेशीर वाटते. विद्यार्थ्यांना या कविता वाचल्यावर तशाच प्रकारची दुसरी एखादी कविता आठवते. शिवानी देशमुख हिला 'चांदोबा चांदोबा रुसलास का?' आठवते. शिवाय या मुलांचा त्यांच्या आयुष्यातील अनुभव काय आहे, तो अनुभव मुले कवितांशी जोडताना दिसतात. वेदिका कुलकर्णी 'जंतर-मंतर' या कवितेविषयी लिहिताना म्हणते, 'आम्हीही असेच जादूचा खेळ खेळत होतो. एखाद्याची एक वस्तू लपवून 'आली मंतर कालीमंतर छू' म्हणून ती वस्तू काढायचो. जादूने ती वस्तू मिळाल्याचा आनंद व्हायचा. मला ही खूप आवडली'. 

विद्यार्थी कवितासंग्रहांविषयी लिहितातच, त्याशिवाय पुस्तकाचे मुखपृष्ठ, पुस्तकाचे मलपृष्ठ, पुस्तकाला मिळालेले पुरस्कार आणि पुस्तकाची पाठराखण याविषयीही लिहितात. त्यांची शब्दरचना ही खूप नेमकी आणि वाचकांना मोहित करणारी आहे. वेदिका कुलकर्णी 'पळसपापडी' या संग्रहाविषयी लिहिताना म्हणते, 'या संग्रहाचे मुखपृष्ठ सुंदर आहे.  हे मुखपृष्ठ शीतल शहाणे यांनी खूप सुबक आणि सुरेख रेखाटलेले आहे'. विद्यार्थ्यांनी बालकवितासंग्रहांविषयी मनमोकळेपणाने लिहिले आहे. यातील  प्रत्येक लेख स्वतंत्र आणि वेगळा आहे.  हे लेखन तांत्रिक, ठोकळेबाज अथवा ठरवून लिहून घेतले आहे, असे वाटत नाही. अत्यंत प्रवाही आणि वाचनीय असे हे लेख मनापासून रसग्रहण करून लिहिलेले आहेत.

हे सर्व लेख वाचले, की अशा लेखनामुळे मुले विचारी बनतात, त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात, मुले प्रश्न विचारायला शिकतात, वाचलेल्या मजकुरावर  चिंतन करतात,  आपले मत मांडतात आणि या सर्वांचे फलित म्हणून जबाबदार नागरिक तयार होतात, असे मला वाटते. 

प्रिया नागरगोजे  'वाचनपेटी' ह्या कवितेतील ओळींचा उल्लेख करते :

'आवडलेल्या पुस्तकांवर

निबंध लिहून झाले

पुस्तकाशी मैत्री होता 

मस्तक उन्नत झाले' 

ती पुढे म्हणते, 'म्हणतात ना वाचाल तर वाचाल. वाचनाने माणूस खूप हुशार बनतो. त्याला पुस्तकातून सगळ्या जगाचा अभ्यास होतो. आपण जर पुस्तकांशी मैत्री केली तर महापुरुषांच्या चरित्रकथा, विज्ञानातील गमतीजमती, संशोधकांच्या यशोगाथा, सामान्यज्ञान, कथा, कविता, नाटक या सगळ्या गोष्टी आपणास वाचावयास मिळतात'. 

प्रियाचे  मनोगत वाचल्यावर खरोखरच वाचनामुळे मुलांचे मस्तक उन्नत होत आहे, याची आपणास खात्री पटते.


'युद्ध नको बुद्ध हवा' या बालकवितासंग्रहाविषयी लिहिताना शिवानी सुभेदार म्हणते, 'आनंदाने नांदत असलेल्या सुखी समाधानी जनतेला युद्धात आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे प्रेतांचे खच पडतात. पृथ्वी रक्ताने माखून जाते. जणू काही पृथ्वीची रक्तामांसाने ओटीच भरलेली आहे की काय, असे कवीला वाटते.  एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या रशिया व युक्रेन या दोन देशांतील युद्धाच्या बातम्या रोज टीव्हीवर पाहत होते. युद्धामुळे किती नुकसान होते! निष्पाप लोकांचे जाणारे बळी पाहून मन सुन्न होते. ही कविता वाचताना त्या घटनेची आठवण झाली. आजही ते शांत झालेले नाही, याची मला खंत वाटते. तेथील राज्यकर्त्यांनी बहुतेक बुद्ध वाचलेला नसावा, असे मला वाटते'. हे शिवानीने लिहिलेले वाचले की खरोखरच एखाद्या कसलेल्या लेखकाप्रमाणे तिने लिहिले आहे, याची खात्री पटते.


'आभाळमाया' कवितासंग्रहाविषयी लिहिताना मयूरी कांबळे म्हणते,  'या संग्रहाच्या नावातच माया आहे. माया म्हणजे प्रेम, ममता. हे प्रेम, ही माया आभाळाएवढी, म्हणजेच 'आभाळमाया ' असे मला वाटते. आपले आई-वडील आपल्यावर आभाळाएवढं प्रेम करत असतात. म्हणून त्यांची माया ही आभाळमायाच असते. निसर्गही आपल्यावर आभाळाएवढी माया करत असतो, पण आपण त्याची कदर करत नाही. आपण निसर्गावरच हल्ला चढवला आहे. त्याला नष्ट करण्याच्या मार्गावर आपण आहोत, पण निसर्ग कधीच याची तक्रार करत नाही. तो आपल्यावर 'आभाळमायाच' करत असतो.


मुले काय, कसा आणि किती विचार करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती येथील विद्यार्थ्यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या बालकवितासंग्रहांविषयी केलेली समीक्षा. संतोष तळेगावे यांनी मुलं लिहिती होण्याविषयी, त्यांच्या लेखनातील बदलाविषयी अधिक सूक्ष्मपणे, तपशीलवार आणि कोणकोणत्या टप्प्यावर कसे बदल होत गेले, वाचनातून  लेखक घडण्याची  मुलांची प्रक्रिया कशी होती हे लिहिले असते, तर असे काम करणाऱ्या इतर शिक्षकांना ते मार्गदर्शक ठरले असते.


इसाप प्रकाशनाने पुस्तकाची देखणी निर्मिती केली आहे.  पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक व पुस्तकाचा आशय सांगणारे आहे.  साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांनी या संग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. तसेच या पुस्तकाची पाठराखणही केलेली आहे. संतोष तळेगावे यांचा मुलांना पुस्तकांकडे बघण्याची नवी दृष्टी देणारा हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांना पुढील प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा!

'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' (बालकवितासंग्रहांची रसग्रहणे)

संपादक : संतोष तळेगावे

प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड.

पृष्ठे ९६     किंमत रु १५०.

पुस्तक परिचय : नामदेव माळी, सांगली.

टिप्पण्या