'दिवाळी अंकांच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचे जतन' कॅबिनेट मंत्री हेमंत पाटील

नयन प्रकाशनाच्या 'नयन अक्षर' दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

 नांदेड (प्रतिनिधी) :

दिवाळी अंकांच्या माध्यमातून  मोबाईल युगातही वाचनसंस्कृतीचे जतन आणि सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम काम सातत्याने केलं जातं. अलीकडे वाचनसंस्कृती कमी होत चाललेली आहे. क्षीण होत चाललेल्या वाचनसंस्कृतीला बळ देण्याचं काम दिवाळी अंकासारखे  प्रयोग सातत्याने करत असतात, असे मत कॅबिनेट मंत्री तथा बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष  आ.  हेमंत पाटील  यांनी  व्यक्त केले.

नांदेड येथे  नयन प्रकाशनाच्या 'नयन अक्षर'  दिवाळी अंकाचे प्रकाशन हेमंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गोदावरी बँकेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या  राजश्री पाटील होत्या. यावेळी सौ. कमलबाई पाटील, नयन अक्षर  मासिकाचे मुख्य संपादक-संचालक  संदीप काळे, कार्यकारी संपादक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, कादंबरीकार डॉ. मथुताई सावंत, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गावंडे, डॉ. अवधूत निरगुडे, सृजन कम्युनिकेशनचे  किशोर अटकोरे,  मुर्तूजा अथर, डॉ. संकेत सावंत यांची यावेळी उपस्थिती होती. 

वाचनसंस्कृतीला गती द्यायची असेल, तर आपली संस्कृती, भोवतालचे जगणे आणि सर्वसामान्यांचे जिवंत अनुभव साहित्यात आले पाहिजेत. त्यामध्ये नावीन्य, वास्तविकता आणि सत्य असलं पाहिजे. साहित्याला वास्तविक जीवनाची जोड जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत ते साहित्य अंतःकरणाला भिडत नाही.  प्रकाशनाच्या माध्यमातून नव्या लेखकांचे प्रयोगशील उपक्रम आणि सामाजिक दायीत्वाने  प्रेरित  असलेली नवी पुस्तकं  सातत्याने येऊ लागली आहेत.  भविष्यातील नयन प्रकाशनाच्या अभिनव उपक्रमांसाठी  माझ्या शुभेच्छा आहेत, असेही हेमंत पाटील यावेळी  म्हणाले. 

एक विषय घेऊन दिवाळी अंक काढायचा, त्यात सातत्य ठेवायचे. पुन्हा नवनवीन प्रयोग करायचे हे सोपे काम नाही. मुळात नव्या वाचकाला वाचनासाठी प्रोत्साहित करणे, त्याला नेहमी दर्जेदार साहित्य देत राहणे, ही सुद्धा एक चळवळ आहे. नयन प्रकाशनाच्या माध्यमातून  राज्यात वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी  सुरू झालेली चळवळ अजून गतिमान झाली पाहिजे, अशा शब्दांत सौ. राजश्री पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त  केल्या. 

यावेळी आ. हेमंत पाटील यांनी संदीप काळे आणि डॉ. सुरेश सावंत यांचा ह्रद्य सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

काय आहे 'नयन अक्षर' दिवाळी अंकात? 

बदलत्या काळात लेखकांनी आपली भूमिका मांडली पाहिजे यावर भाष्य.  ज्येष्ठ श्रेष्ठ अशा निवडक  लेखकांचा दीर्घ परिचय. कथा, कविता, अनेक पुस्तकांवर विस्तृत भाष्य.  लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अश्विनी धोंगडे, सदानंद देशमुख, विश्वास पाटील, विजय पाडळकर, माधवी कुंटे, प्रदीप निफाडकर, विनिता ऐनापुरे यांच्यासह अनेक मान्यवर 'नयन अक्षर' साठी लिहिते  झाले आहेत. हा अंक वाचनसंस्कृतीला वाहिला आहे. 

  

फोटो ओळी :   नयन प्रकाशनाच्या 'नयन अक्षर' या दिवाळी अंकाचे प्रकाशन  करताना  कॅबिनेट मंत्री तथा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ.  हेमंत पाटील,  गोदावरी बँकेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटील,  नयन अक्षर या मासिकाचे मुख्य संपादक- संचालक  संदीप काळे, नयन अक्षर  मासिकाचे संपादक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, डॉ. मथु सावंत, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गावंडे आदी.  

........................

टिप्पण्या