*यशवंत महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न*

 


नांदेड:( दि. २३ ऑक्टोबर २०२४)

          यशवंत महाविद्यालयातील ग्रंथालयात शैक्षणिक वर्ष: २०२४-२५ च्या प्रारंभी विद्यार्थ्यांसाठी नव्याने दाखल झालेल्या विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ग्रंथांची माहिती व्हावी; याकरिता ग्रंथालय विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तसेच वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने सकाळी ११ ते सायंकाळी ०५  पर्यंत ग्रंथालय सभागृहामध्ये “स्पर्धा परीक्षेकरिता ग्रंथ” या विषयावर दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

           ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी केले.

          उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी सांगितले की,  महाविद्यालय ग्रंथालयामार्फत सर्व ग्रंथसंग्रह व वाचनसाहित्य याची सोयीसुविधा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध आहे. त्याचा शैक्षणिक विकास व स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी पुरेपूर उपयोग करून फायदा घ्यावा तसेच ग्रंथालय वाचन कक्ष व ई-संसाधने (ई-रिसोर्सेस) याचाही जास्तीत जास्त उपयोग करून स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवावे. 

          प्रारंभी समन्वयक ग्रंथपाल डॉ. कैलास ना. वडजे यांनी प्रास्ताविकाद्वारे ग्रंथ प्रदर्शनाचा उद्देश विशद केला. 

           ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, सेट, नेट, आयएएस, आयपीएस, आयएफएस व विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा ग्रंथसंग्रह, ई-वाचनसाहित्य, नियतकालिके, संशोधन पत्रिका व अहवाल इत्यादी मांडण्यात आलेले होते. 

          प्रस्तुत ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ग्रंथसंग्रहाची संख्या  पाच हजारपेक्षाही जास्त आहे. 

          सदरील ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथ मांडणीसाठी सहायक ग्रंथपाल संजय भोळे, श्रीमती पिंपळपल्ले, श्री.देशमुख, श्री.मोरे, व तसेच सर्व ग्रंथालय कर्मचारीवृंद श्री.धात्रक, तोगरे, गोरटकर, सिराज, साखरे, अलुरवाड, श्रीमती विटाळकर व श्रीमती कुकुटला यांनी परिश्रम घेतले.

          ग्रंथ प्रदर्शनाचा महाविद्यालय व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व नागरिकांनी भेट देऊन लाभ घेतला.

           शेवटी सहायक ग्रंथपाल संजय भोळे यांनी आभार मानून ग्रंथ प्रदर्शनाची सांगता केली. 

          या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या