नांदेड:( दि.२२ ऑक्टोबर २०२४)
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाबरोबरच इतिहास अभ्यास मंडळाच्या कार्यातून घडण्यास हातभार लागतो, असे उद्गार सेवानिवृत्त इतिहास विभागप्रमुख प्रा.पी.एल. बिलोलीकर यांनी यशवंत महाविद्यालयाच्या पदवी, पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित इतिहास अभ्यास मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमात उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले.
पुढे बोलताना प्रा. बिलोलीकर म्हणाले की ,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्या त्या विषयाचे अभ्यास मंडळ वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यामध्ये विस्तारित व्याख्यान, शैक्षणिक अभ्यास सहल, स्पर्धा परीक्षा व सेट नेट मार्गदर्शन, क्षेत्रभेट आदीचे आयोजन केले जाते. हे करत असताना सहभागी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे होते.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. पतंगे म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात राबविले जाणारे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा कार्यक्रमातूनच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या आयोजनाचे व नियोजनाचे धडे मिळत असतात. असे अनुभव विद्यार्थ्यांना भावी काळासाठी महत्त्वाचे ठरत असतात.
यावेळी इतिहास अभ्यास मंडळ फलक व नंदगिरी भित्तिपत्रकाच्या फलकाचे अनावरण पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच 'हैदराबाद मुक्ती संग्रामात महिलांचे योगदान' या विषयावरील भितीपत्रकाचे विमोचन झाले.
प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे यांनी केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ एम.ए.द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी पूजा वाठोरे हिच्या स्वागत गीताने झाला तर पाहुण्याचा परिचय डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे) यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.साईनाथ बिंदगे यांनी केले तर आभार बी.ए.तृतीय वर्षाचा विद्यार्थी गणेश विनकरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे, डॉ.संगीता शिंदे(ढेंगळे),डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा.राजश्री भोपाळे, इतिहास अभ्यास मंडळाचा अध्यक्ष ओंकार मेकाने तसेच अभ्यास मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा