नांदेड दि. २१
ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा मिलिंद गाडगीळ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथील चेतक बुक्सने प्रकाशित केलेल्या 'आभाळमाया' ह्या पुस्तकाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दि. २६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आयोजित साहित्य संघाच्या ८९व्या वर्धापनदिनी हा सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अचला जोशी ह्या राहणार असून नामवंत चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
डॉ. सावंत यांची आजवर ५६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारांसह अन्य प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे ३३ पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. डॉ. सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विद्यापीठीय अभ्यासक्रमांत समाविष्ट झाले आहे. त्यांच्या एकूण बालकवितेवर संशोधन करून एका विद्यार्थ्याने एम. फिल. ही पदवी संपादन केली आहे.
डॉ. सुरेश सावंत यांची १) वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती, २) बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध, ३) आजची मराठी बालकविता, आणि ४) बालसाहित्यातील नवे काही ही पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहेत. डॉ. सावंत यांनी कुंटूर, जळगाव आणि पैठण येथे संपन्न झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेले आणि संतोष तळेगावे यांनी संपादित केलेले 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा