इतिहास अभ्यासक्रमातून ज्ञानात्मक भूकेची तृप्तता* -डॉ.पराग खडके


नांदेड:(दि.३ ऑक्टोबर २०२४)

          कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना अभ्यास मंडळाने सर्व पैलू समाविष्ट करताना विद्यार्थ्यांची ज्ञानात्मक भूक भागेल; याची काळजी घेणे गरजेचे असते. इतिहास अभ्यास मंडळाने अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांची ज्ञानात्मक भूक भागेल, याची काळजी घेतल्याचे उद्गार  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग खडके यांनी व्यक्त केले. 

           यशवंत महाविद्यालयातील पदवी, पद्वयुत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्र आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित पदव्युत्तर नवीन अभ्यासक्रमावर आधारित एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

           पुढे बोलताना डॉ.खडके म्हणाले की, इतिहासाच्या अभ्यासक्रमात विविध घटकांचा समावेश करून उत्कृष्ट अभ्यासक्रम इतिहास अभ्यास मंडळाने तयार केला आहे. 

          उद्घाटन समारंभाच्या  अध्यक्षस्थानी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर होते.

          अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले की, नांदेड आणि नांदेड परिसराला फार मोठा प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ऐतिहासिक स्वरूपाच्या घटनांचा समावेश अभ्यासक्रमात केला तर विद्यार्थ्यांना नांदेड आणि नांदेड परिसराच्या प्राचीन वारशाची ओळख होण्यास मदत होईल तसेच नांदेड परिसरात राजकीय , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे दिग्गज होऊन गेले आहेत. यामध्ये श्रद्धेय कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती; एवढेच नाही तर राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर त्यांनी फार मोठे योगदान देऊन आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशा व्यक्तिमत्त्वाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास विद्यार्थ्यांना निश्चित त्यांच्या कार्यापासून  प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही.

          याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना, प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, इतिहास अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमावर विद्यापीठस्तरीय कार्यशाळेत विस्ताराने चर्चा व्हावी आणि एक दर्जेदार अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कसा देता येईल, याच्याबद्दल विचार विनिमय करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. 

          याप्रसंगी मंचावर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.राहुल वरवंटीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपले विचार व्यक्त करताना, इतिहास अभ्यास मंडळाने  जो अभ्यासक्रम तयार केला आहे; त्याबद्दलचा अहवाल मांडत समाधान व्यक्त केले आणि हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे, असे मत व्यक्त केले. यासोबतच त्यांनी मुलांना प्रकल्प लेखनासाठी स्थानिक पातळीवरील वेगवेगळे विषय दिल्यास आपल्या आजूबाजूच्या ऐतिहासिक घडामोडी इतिहासामध्ये नमूद होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

          याप्रसंगी मंचावर अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. रामभाऊ मुटकुळे व  इतिहास विभाग प्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांची उपस्थिती होती . 

          कार्यशाळेसाठी इतिहास अभ्यास मंडळातील डॉ.रमेश गंगथडे, डॉ. विजया साखरे, सिनेट सदस्य डॉ.दिलीप पाईकराव, डॉ.राजेसाहेब भोसले, डॉ. हनुमान मुसळे, डॉ.नितीन बावळे, डॉ. वसंत कदम, डॉ.अरविंद सोनटक्के, डॉ. ओमशिवा लिगाडे, डॉ. बाळासाहेब क्षीरसागर यांची आवर्जून उपस्थिती होती.

           प्रारंभी प्रास्ताविक डॉ.शिवराज बोकडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. साईनाथ बिंदगे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी पूजा वाठोरे हिने अत्यंत सुरमय स्वागत गीत गायले तर आभार डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे) यांनी मानले. 

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिवराज बोकडे, डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे) डॉ.एस.एम. बिंदगे, प्रा. आर. जी.भोपाळे यांच्यासोबत ओमकार मेकाने, मधु कदम, पूजा वाठोरे, अंजली भुक्तरे, गौरव बोकारे, माधव आरसुळे या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

           कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

           कार्यशाळेत प्राध्यापकांसोबत पदवीधर विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या