स्वामी गोविंददेवगिरिजी महाराजांच्या वाणीतून आजपासून कथा प्रारंभ ; भव्य शोभायात्रा
फोटो - सेलू येथे आयोजित राष्ट्रसंत परमपूज्यस्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या श्रीराम कथेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
फोटो - कथास्थळाचे प्रवेशव्दार
सेलू ता.14
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत परमपूज्यस्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या 'हनुमानगढ' परिसरात मंगळवारपासून (१५ ऑक्टोबर) श्रीराम कथेला प्रारंभ होत आहे. कथेच्या निमित्ताने शहरात जागोजागी कथेच्या बॅनर, होर्डींंगने सर्वांचे लक्ष वेधले घेतले असून कथेसाठी सेलू शहर सज्ज झाले आहे.
बुधवार, २३ ऑक्टोबरपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीराम कथा (मराठीतून) होईल. यानिमित्ताने मंगळवारी सकाळी ८ वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीर ते श्रीबालाजी मंदीरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. क्रांतीचौक, धनलक्ष्मी मंगल कार्यालय, सारंगीगल्ली हनुमान मंदिर, गंगाधर स्वामी मठ, मारवाडी गल्ली चौक मार्गाने श्री बालाजी मंदिरमध्ये शोभायात्रेची सांगता होणार आहे.
शोभायात्रेत श्रीरामायणासह विविध ग्रंथ दिंडी, बँड पथक, धर्म ध्वज, अश्व, मारोती, ध्वजधारी युवक, लेझीम पथक मुले-मुली, श्रीराम उत्सव मूर्ती, कलशधारी, तुळसधारी माता भगिनी, महिला भजनी व वारकरी भजनी मंडळ, वेद विद्यालयाचे विद्यार्थी, स्वामीजींचा रथ, माता-भगिनी, बंधू सहभागी होणार आहेत. तसेच विविध संत महात्मे, श्रीराम जन्म, गुरुकुल, केवटद्वारा श्रीराम चरण पूजा, प्रभू राम हनुमंत भेट, रामराज्यभिषेक, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य शपथ, भारतमाता व महापुरुषांचे सजीव देखावे विविध शाळांचे विद्यार्थी सादर करणार आहेत. शोभायात्रेत व कथा श्रवणासाठी सेलू शहर व परिसरातील महिला, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक जयप्रकाश बिहाणी, विजयकुमार बिहाणी आणि बिहाणी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
भव्य मंडप, व्यासपीठ, नऊ तीर्थधाम
श्रीरामकथेसाठी सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या 'हनुमानगढ' परिसरात ३८ हजार ४०० चौरसफुट जागेत भव्य वाटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. ३२ बाय ६० फूट आकाराचे भव्य व्यासपीठ असून नऊ दिवस कथास्थळी नऊ तीर्थधामांचे स्वरूप साकारले जाणार आहे. यामध्ये अयोध्या, तिरूपती बालाजी, वृंदावन, श्री जगन्नाथ, व्दारका, श्रीक्षेत्र पंढरपूर, श्री रामेश्वर, श्री बद्रीनाथ धाम आणि श्री सारासारजी आदींचा समावेश आहे. सात ते आठ हजार श्रोत्यांची आसन व्यवस्था आहे. यामध्ये तीन हजार खुर्च्यांसह बसण्यासाठी मॅट, ४० कुलर, परिसरात ध्वजस्तंभ, गोशाळा, रामकथा कार्यालय, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. कथेसाठी विविध समिती कार्यरत असून जागोजागी स्वयंसेवक असणार आहे.
विविध अध्यात्मिक व सांस्कृितक कार्यक्रम
राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून १५ ऑक्टोबरपासून ९ दिवस पंचक्रोशीतील भाविकांना श्रीराम कथा श्रवणाचा लाभ मिळणार आहे. कथेदरम्यान, रविवारी, २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता गीता परिवारव्दारा आयोजित सामुदायिक श्रीरामरक्षा स्त्राेत्र पठण, योगा सूर्यनमस्कार, श्रीमद्भगवतगीता पठण, देशभक्तीपर गीते आदींचे सादरीकरण परभणी रोडवरील समर्थ जिनिंग परिसरात होणार आहे. यामध्ये सेलू शहरातील २० शाळेतील विद्यार्थी सहभागी होत आहेत. सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता श्रद्धेय गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भजनसंध्या आहे. तर १८ ते २२ ऑक्टोबर कालावधीत गीता परिवाराच्या वतीने श्री साई मंदिरात सकाळी ८ ते १० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओवीबध्द जीवन चरित्राचे श्रीशिवप्रताप पारायण होणार आहे.
विविध क्षेत्रातील व्यक्तित्वांचा सन्मान
कथेदरम्यान विविध क्षेत्रात समर्पित भावाने कार्यसेवा देणाऱ्या सेलू शहर व परिसरातील व्यक्तित्वांचा राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या हस्ते पालकांसह सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये देश सेवेबद्दल - लेफ्टनंट आकाश संजय रोडगे, मंगेश रघुनाथ देशमुख, संगमेश कैलास मलवडे, बजरंग टीकमचंद परदेशी, वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण-अभिजीत राजूरकर, अध्यात्म- डाके महाराज मानवत, गौ-पालक राजेंद्रजी करवा सेलू, कुंजबिहारीजी काबरा मानवत, प्रकाशजी बंग गुंज, ग्रामीणभागात गुरुकुलच्या माध्यमातून निवासी शिक्षणाच्या सेवेबद्दल रामकिशन (आबा) सोळंके, कीर्तन कुलसेवा योगेश महाराज साळेगांवकर, शंतनू शिवाजीराव पाठक आदींचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक जयप्रकाश विजयकुमार बिहाणी यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा