पुणे जिल्ह्यात सेवानिवृत्त गोदी कामगारांचा मेळावा


भारतातील बंदर व गोदी कामगारांसाठी १ जानेवारी २०२२ पासून पाच वर्षासाठी लागू होणारा भरघोस पगारवाढीचा वेतन करार मुंबईत संपन्न झाल्यानंतर, पुणे जिल्ह्यामधील जुन्नर, आंबेगाव व राजगुरुनगर तालुक्यातील सेवानिवृत्त गोदी कामगारांचा आनंदोत्सव मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

मुंबई गोदी कामगार सेवानिवृत्त संघाच्या वतीने १२ ऑक्टोबर २०२४ रोजी जुन्नर तालुक्यातील १४ नंबर येथील माई वडेवाले सभागृहात सेवानिवृत्त गोदी कामगारांचा आनंदोत्सव मेळावा मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड असोसिएशनचे अध्यक्ष सी. जे. मेंडोसा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, मुंबई येथे झालेल्या गोदी कामगारांच्या वेतन करारात नोकरीत असलेल्या कामगारांना भरघोस पगारवाढ मिळाली असून, पेन्शनर्सना देखील चांगली पेन्शनवाढ झाली आहे. या वेतांकरारात पेन्शनवाढीचा कायदेशीर समावेश करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कामगारांच्या प्रलंबित मागण्या या वेतन करारात मान्य झाल्या असून, याचे सर्व श्रेय सहा गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांना व इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटा यांना आहे.

२००४ पासून भरती झालेल्या कामगारांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी आपली मागणी आहे. सभेचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मुंबई बंदरातील सद्य परिस्थितीचे वर्णन करून, भारतातील सेवेत असलेल्या २० हजार गोदी कामगारांना आणि १ लाख ४० हजार पेन्शनर्सना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा 

वेतन करार २७ सप्टेंबर २०२४ रोजी झाला असून, या वेतन करारात गोदी कामगारांना चांगली पगारवाढ व सेवानिवृत्तांना चांगली पेन्शनवाढ मिळाली आहे. या वेतन करारानुसार पोर्ट ट्रस्ट वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांना २९०० रूपये ते १३६६० रुपये, पोर्ट ट्रस्ट वसाहतीमध्ये न राहणाऱ्या 

कामगारांना ५४८० रूपये ते २५५७० रूपये पगार वाढ मिळणार असून पेन्शनर्सना ११६५ रूपये ते 

 ६५४५ रुपये पेन्शनवाढ मिळणार आहे. सेवेत असलेल्या कामगारांना ५०० रुपये विशेष भत्ता मिळणार आहे. पेन्शन फंडाच्या रकमेत ५ हजार कोटीची तूट होती.

 ती आता फक्त २७० कोटी आहे. गोदी कामगारांना व त्यांच्या पत्नीला आता प्रत्येकी चष्म्याचे ४ हजार रुपये मिळणार असून ऑक्टोबर २०२४ च्या पगार व पेन्शनमध्ये ३ टक्के महागाई भत्ता वाढणार आहे. गोदी कामगारांना घरे मिळण्यासाठी सर्व कामगार संघटनानी पाठपुरावा करून एकजुटीने लढा देण्याची काळाची गरज आहे. 

याप्रसंगी ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे, सेवानिवृत्त शेड सुप्रीटेंडंट व समाजसेवक डी.एस. करलकर, बबन हाडवळे, विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे संचालक डी.बी. बांगर, सुनिल प्रभू, इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सदर सभेला ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे माजी सचिव मोहम्मद अली, मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस डी . एच. डिंग्रेजा, गोवेकर, माईकल कोलॅसो, बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचे संचालक वसंत गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मुंबई गोदी कामगार सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष गेनभाऊ बांगर यांनी केले तर आभार जिजाभाऊ आवटी यांनी मानले

आपला 

मारुती विश्वासराव 

 प्रसिद्धीप्रमुख 

 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या