पाउलो कोएलो यांची 'द अल्केमिस्ट' ही एक जगप्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीचे पंचावन्नपेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ह्या कादंबरीने कोट्यवधी प्रतींच्या विक्रीचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. ह्या कादंबरीचा नितीन कोत्तापल्ले यांनी केलेला अनुवाद नुकताच वाचला. शकुनांवर आणि प्रतीकांवर विश्वास असलेल्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या एका जिद्दी मुलाची ही अतिशय उत्कंठावर्धक कथा आहे. 'जेव्हा तुम्हाला खरंच एखादी गोष्ट पाहिजे असते, तेव्हा सगळं विश्व तुमच्या मदतीला धावून येतं' हे ह्या कादंबरीचं भरतवाक्य आहे. ह्या कादंबरीत अशीच, सुभाषितांसारखी किंवा सुविचारांसारखी काही विधाने येतात. उदाहरणार्थ :
सगळं जगच पहिल्यांदा आपल्याला अनुकूलता दर्शवितं. तुमचं भवितव्य तुम्ही साध्य करावं, हीच आयुष्याची इच्छा असते.
जेव्हा आपल्याला नशिबाची साथ असते, तेव्हा त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. एका अर्थानं आपण नशिबाला दिलेला प्रतिसादच असतो. यालाच 'अनुकूलतेचा सिद्धान्त' किंवा 'नवख्याचे नशीब' असे म्हणतात.
प्रत्येकाच्या स्वप्नपूर्तीचे मार्ग वेगवेगळे असतात.
तुम्हाला नेमकं काय पाहिजे, हे तुम्हाला पक्कं माहीत असलं पाहिजे.
सौंदर्य माणसाला भुरळ पाडतंच.
एखाद्या वरदानाकडं दुर्लक्ष करणं म्हणजे शापित असण्यासारखंच असतं.
एक निर्णय घेणं ही अनेक निर्णय घेण्याची सुरुवात असते. जेव्हा एखादा मनुष्य निर्णय घेतो, तेव्हा तो एका प्रचंड शक्तिशाली प्रवाहात उडी घेत असतो. हा प्रवाह त्यानं कधीच न पाहिलेल्या स्थळांना घेऊन जातो.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट एक शकुनच असते.
योगायोग नावाची कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही.
आपल्याला ज्याची गरज आहे, जे आपल्याला हवं आहे, ते मिळवायचं सामर्थ्य जर आपल्या अंगी असेल, तर आपण कशालाच घाबरायचं कारण नाही.
आपण कितीही वळणे घेतली, तरी ठरलेल्या मुक्कामाच्या दिशेनंच जात असतो.
आत्ताचा क्षण हाच खरं जीवन असतो.
खजुरांच्या झाडांचं सौंदर्य माणसाला कळावं यासाठीच परमेश्वरानं वाळवंट तयार केलेलं असावं.
जीवन जीवनाला आकर्षित करून घेतं.
प्रेम कुणालाही आपलं भवितव्य साकार करण्यापासून रोखून धरत नाही.
माणसं घर सोडल्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा परतीच्या दिवसाचं स्वप्न पाहतात.
शिकण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो, तो म्हणजे तुमची स्वतःची कृती.
लोक आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला घाबरतात, कारण आपल्या लायकीविषयीच त्यांना शंका असते.
प्रत्यक्ष दु:खापेक्षा दु:खाची भीती ही अधिक वाईट असते.
आपल्या स्वप्नांचा शोध घेत निघालेल्या कुठल्याच ह्रदयाला दु:खाशी सामना करावा लागत नाही. या शोधमोहिमेतला प्रत्येक क्षण परमेश्वराशी आणि अनंताशी आपली भेट घालून देत असतो.
जे लोक आनंदी असतात, त्यांच्यात प्रत्यक्ष परमेश्वर वसत असतो.
पृथ्वीतलावरच्या प्रत्येकासाठी त्याचा खजिना असतो. तो त्याची वाट पाहत असतो.
पुष्कळ लोकांना जग ही एक धोकादायक जागा वाटते....आणि तसं वाटल्यामुळे जग खरोखरच धोकादायक बनतं.
प्रत्येक शोधमोहिमेची सुरुवात नवख्याच्या नशिबानंच होते, पण प्रत्येक शोधमोहीम विजेत्याच्या कठीण परीक्षेनंच संपते.
तुमच्याजवळ जेव्हा सर्वोत्तम खजिना असतो आणि तुम्ही लोकांना तसं सांगायचा प्रयत्न करता, तेव्हा तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही.
पृथ्वीतलावरच्या कुठल्याही गोष्टीचे बरेवाईट परिणाम सगळ्यांवर होतच असतात.
तुमच्या डोळ्यांतून तुमच्या आत्म्याची ताकद दिसत असते.
ज्ञानी माणसांचे शब्द लोकांना कधीच कळले नाहीत, म्हणूनच सोनं उत्क्रांतीचं प्रतीक बनण्याऐवजी भांडणाचं मूळ बनलं.
जो दुसऱ्याच्या भवितव्यामध्ये ढवळाढवळ करतो, त्याला स्वतःचं भवितव्य कधीच साकार करता येत नाही.
जगात स्वप्न साध्य न होऊ देणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अपयशाची भीती.
हे पुस्तक आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला शिकविते. आपल्या नजरेसमोरचे संशयाचे ढग पळवून लावते. हे पुस्तक संयम आणि सहनशीलता शिकविते. मोठमोठी स्वप्नं पाहायला शिकविते. स्वप्नपूर्तीच्या दिशेने चालायला शिकविते. बदलांना सामोरे जायला शिकविते. आपली निर्णयक्षमता विकसित करायला मदत करते. भीतीवर मात करायला शिकविते. भूत आणि भविष्याचा फार विचार न करता वर्तमानात जगायला शिकविते. जगाकडे सौंदर्यपूर्ण दृष्टीने पाहायला शिकविते. प्रेमातील त्यागाकडे आपले लक्ष वेधते. खूप खूप शिकायला प्रवृत्त करते. हे शिक्षण केवळ पुस्तकी नसून आपल्याला कृतिशील बनविते. आनंदी जगण्यातच परमेश्वरी अस्तित्व आहे, हा नवाच दृष्टिकोन हे पुस्तक आपल्याला देते.
'मृत्यूची भीती नेहमीच माणसाला जीवनाविषयी अधिक सजग बनविते'.
हे पुस्तक सूड, बदला, अद्दल ह्या क्षुद्र भावनांपासून दूर होऊन स्वतःच्या श्रेयसावर लक्ष केंद्रित करायला शिकविते. 'हे जग म्हणजे परमेश्वराचा दृश्य आविष्कार आहे'.
अशा सकारात्मक विचारांची पेरणी ह्या पुस्तकात केलेली आहे.
खरे तर हे पुस्तक वाचायला मला जरा उशीरच झाला, पण हरकत नाही. द अल्केमिस्ट वाचल्याचा आनंद आहेच! हे पुस्तक म्हणजे सकारात्मक जीवनदृष्टीचा वस्तुपाठ आहे.
ज्यांनी अजून हे पुस्तक वाचलेले नाही, अशांना वरील विधाने पुस्तक वाचायला प्रवृत्त करतील, अशी अपेक्षा आहे.
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
addComments
टिप्पणी पोस्ट करा