केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल, त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात सर्वांनी
एकजुटीने लढा दिला पाहिजे. असे स्पष्ट उद्गार शेतकऱ्यांचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी जाहीर सभेत काढले.
भारतीय जीवन व पृथ्वी रक्षक चळवळीचे निमंत्रक ॲड. गिरीश राऊत यांनी १९ सप्टेंबर २०२४ रोजी दादर येथील धुरु हॉलमध्ये वाढवण बंदर रद्द करा या व इतर मागण्यांसाठी देशातील मान्यवरांची एक संयुक्त सभा आयोजित केली होती.
पर्यावरण अभ्यासक ॲड. गिरीश राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वाढवण बंदर, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, बारसू रिफायनरी अशा महाकाय प्रकल्पामुळे पृथ्वीच्या पर्यावरणात दुरुस्त न होणारा हस्तक्षेप होणार आहे. विकासासाठी राजकीय क्षेत्राने औद्योगिकीकरणाच्या रूढ चौकटीत विचार केल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही. विकासाचे मॉडेल म्हणून देशापुढे ठेवलेले गुजरात बुडाले व बडोदा जाम नगरातील उच्चभृ वस्त्यांसह इतरही शहरात मगरीचा संचार सुरू झाला ही गोष्ट बोलकी आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी वाढवण येथे खोल समुद्र असल्यामुळे चांगल्या प्रकारची मच्छी मिळते. वाढवण बंदर झाल्यास मच्छीमारांचे खूप नुकसान होणार आहे. त्यामुळे मच्छीमार समाज या वाढवणं बंदराला शेवटपर्यंत विरोध करणार आहे.
सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार मेनन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आम्ही नरीमन पॉइंट ते पालघर या समुद्रकिनाऱ्याचा संपूर्ण अभ्यास केला असून पालघर येथे होणारे वाढवण पोर्ट करू नये असा अभ्यासकांचा व शास्त्रज्ञांचा अहवाल असतानाही वाढवण बंदराचे भूमिपूजन झाले आहे. या ठिकाणी समुद्रात ३० मीटर पाण्याची खोली असल्यामुळे मोठ्या बोटी लागू शकतात, त्यामुळे केंद्र सरकारने वाढवणे येथे पोर्ट बनविण्याचा विचार केला आहे. मात्र या पोर्टमुळे मच्छीमार समाज व स्थानिक लोकांचे खूप नुकसान होणार आहे.
महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे माजी सरचिटणीस सूर्यकांत बागल यांनी सांगितले की, समुद्रात भर घालून या बंदरासाठी पाच हजार एकर जागा सरकारने ताब्यात घेतली असून, या ठिकाणी वाढवण बंदर झाल्यास आवश्यक असणारी रस्ते वाहतूक व इतर सुखसोयी जमिनीवरच होणार आहेत, त्यामुळे अनेक गावे प्रस्थापित होतील. या सभेला ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जनार्दन जंगले, प्रा. डॉ. सचिन बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रणाली राऊत यांनी मानले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा