नांदेड:(दि.२२ सप्टेंबर २०२४)
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "करियर कट्टा" आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत 'आवाज गुरुजनांचा - वेध देशाच्या भवितव्याचा' यावरील आवाजाची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
सदरील आवाजाच्या कार्यशाळेचा लाभ नांदेड जिल्ह्यातील १८० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी घेतला.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते. उद्घाटक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शिरोळे होते. कार्यशाळेसाठी मार्गदर्शिका मुंबई येथील सुप्रसिद्ध आवाज तज्ञ सोनाली लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रारंभी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक करियर कट्टाचे नांदेड विभागीय समन्वयक डॉ.सतीश चव्हाण यांनी केले. त्यांनी करियर कटाच्या अंतर्गत चालणारे उपक्रम तसेच कार्यशाळा प्राध्यापकांसाठी कसा आगळावेगळा अनुभव राहील, त्यातून प्राध्यापकांना कसा लाभ होईल, याबद्दल त्यांनी आपले मत स्पष्ट केले.
उद्घाटक यशवंत शितोळे यांनी, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर चालणारा करियर कट्टा उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे काम करतो, करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थी हा केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून प्रशासकीय अधिकारी, यशस्वी उद्योजक, त्याचबरोबर विविध तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते, महाराष्ट्रातील महाविद्यालयीन युवकांना अगदी माफक दरात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आणि स्पर्धा परीक्षा तसेच उद्योजकतेचे अविरत मार्गदर्शन करियर कट्टाच्या माध्यमातून कशा प्रकारे केले जाते, याबद्दल सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयातील युवकांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढवा त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कौशल्याचा विकास करण्यासाठी उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करियर कट्टा अंतर्गत सुरू करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयातून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी त्याचबरोबर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असणारे पास आऊट आणि ड्रॉप आऊट विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळ्या खाजगी आस्थापनामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या; त्या उद्देशाने शासकीय आस्थापनाच्या सहकार्याने महाविद्यालय स्तरावर रोजगार मेळाव्या आयोजित करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा व्यापक प्रयत्न करियर कट्टा उपक्रमांतर्गत केला जातो, असे त्यांनी यावेळी म्हटले.
प्रमुख मार्गदर्शिका सोनाली लोहार यांनी मार्गदर्शन करताना, आवाजाची व्याख्या, अर्थ, आवाजाची निर्मिती यावर सविस्तर मार्गदर्शन करताना कंठसुचीता अंतर्गत आवाज टिकविण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या काही टिप्स प्राध्यापकांना सांगितल्या; जसे की, आवाजाची काळजी घेण्यासाठी दर १५ मिनिटांनी पाण्याचा एक घोट घेणे, जेव्हा बोलण्याची गरज नसेल तेव्हा बोलणे टाळणे, बोलतांना हानिकारक सवयीमध्ये फोनवर मोठ्याने बोलणे, कारण नसताना किंचाळणे, ओरडणे, चिअरिंग करणे टाळले पाहिजे. समाजात आवाजबद्दल असलेले गैरसमज व त्यातून निर्माण झालेल्या समस्या आणि त्यावर केले जाणारे उपाय यावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपण जर आपल्या आवाजाची काळजी घेतली नाही तर त्यापासून कसे दुष्परिणाम होऊ शकतात, याबद्दलची जाणीव श्रोते वर्गांना करून दिली. आवाजाचा संबंध हा मेंदू, हृदय, फुफ्फुस या सर्व गोष्टीशी येतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आवाजाची काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, शिक्षकी पेशात आवाजाचे महत्व खूप असल्यामुळे प्रत्येक प्राध्यापकाने आवाजाची काळजी घेतली पाहिजे. आवाजाच्या निर्मिती त्याबद्दल त्यांनी शास्त्रीय माहितीही उपस्थिताना दिली तसेच करिअर कट्टा विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीमध्ये उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त केले. एवढेच नाही तर महाविद्यालयांना नॅक पुनर्मुल्यांकनामध्ये करिअर कट्ट्याअंतर्गत चालणाऱ्या उपक्रमास असलेले महत्त्वही विशद केले.
कार्यशाळेसाठी प्रवर्तक प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण, उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन साहित्यिक डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले तर अर्थशास्त्र विभागप्रमुख तथा करियर कट्टा कार्यक्रमाचे नांदेड जिल्हा समन्वयक डॉ. अजय मुठ्ठे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एल.व्ही.पद्माराणी राव, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, करियर कट्टा समन्वय समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. प्रवीण तामसेकर, प्रा.प्रियंका सिसोदिया, प्रा. भारती सुवर्णकार तसेच डॉ.प्रवीण सेलूकर, डॉ. ज्ञानेश्वर पूपलवाड, डॉ. संतोष पाटील, डॉ. शिवराज आवाळे, प्रा. राहुल लिंगमपल्ले, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा