संतोष तळेगावे या उपक्रमशील शिक्षकाने 'रानफुलं फुलविणारे बालकवी-डॉ.सुरेश सावंत' या संपादनाच्या माध्य इल लोमातून विद्यार्थ्यांना आस्वादक समीक्षेची गोडी लावलेली आहे. आज माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात, नेट- इंटरनेटच्या जमान्यात मुलं पुस्तक आणि ग्रंथालयापासून खूप दूर गेलेली आहेत. टी व्ही, मोबाईल आणि इंटरनेटचा अतिरेकी वापर सुरू आहे. अशा निराशेच्या काळात मुले ग्रंथालयात जातात, पुस्तके शोधतात, त्यातील चित्रे न्याहाळतात, आवडीच्या पुस्तकांचे वाचन करतात आणि त्यावर आपली मते प्रकट करतात, ही गोष्ट खूपच आश्वासक आहे.
'रानफुलं फुलवणारे बालकवी-डॉ. सुरेश सावंत' या संपादित पुस्तकात शिवाजी विद्यालय येवती, ता. मुखेड, जि. नांदेड या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिथयश बालसाहित्यकार डॉ. सावंत सरांच्या १४ बालकवितासंग्रहांचा आस्वाद घेऊन त्या पुस्तकांवर आपले अभिप्राय नोंदवले आहेत. त्यांचे रसग्रहण केले आहे. संग्रहांतील कवितांचा आस्वाद घेतला आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या १४ लेखांचा या पुस्तकात समावेश करण्यात आलेला आहे. बालसाहित्यात काम करणाऱ्या कवीने डझनांहून अधिक काव्यसंग्रह लिहावेत, ही गोष्टच आजच्या काळात आचंबित करणारी आहे. एकाहून एक सरस, सचित्र आणि रंगीत तसेच आशयघन कवितासंग्रहांची निर्मिती करणे ही तर त्याहून अवघड गोष्ट आहे.
एखाद्या कवीचे सगळे कवितासंग्रह आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देणे, त्यांना वाचनाची गोडी लावणे व त्या पुस्तकांवर लिहायला प्रवृत्त करणे हे अवघड काम तळेगावे यांनी सिद्धीस नेले आहे. कवितासंग्रह केवळ वाचणे नव्हे, तर त्यावर रसग्रहण लिहिणे हा सुवर्णयोग तळेगावे यांच्या माध्यमातून घडून आला आहे. ही मराठी बालसाहित्यातली हेवा वाटावा अशीच गोष्ट आहे.
मनाला आनंद देत ज्ञानात भर घालणारा कवितासंग्रह 'हिरवे हिरवे झाड' या संग्रहावर सहाव्या इयत्तेतल्या कु. महामाया कांबळे हिने लिहिले असून त्यातील कवितांच्या आशयकथनाबरोबर माहिती, शब्दरचना, कल्पना कवितांच्या विषयांतली विविधता, चित्रे, मुखपृष्ठ यांची दखलही तिने आपल्या लेखात घेतली आहे.
जांभळासारख्या गोड गोड कवितांनी नटलेला कवितासंग्रह 'जांभूळबेट' ह्या संग्रहावर सातव्या इयत्तेतल्या कु. वैष्णवी सुडके हिने आपली मते प्रकट केली आहेत. पोपट , परी, फळबाग, कोकणातला निसर्ग, नाकतोडा, वासरू, आळशी माणसाचं स्वप्न या कवितांचा ऊहापोह करीत त्यातील कवीची भावना, अपेक्षा, अवस्था यांची चर्चा ती आपल्या लेखात करते. पुस्तकाच्या अंतरंगाबरोबर पुस्तकाच्या बाह्यांगावरही तिने प्रकाश टाकला आहे.
भुताच्या भीतीला पळवून लावणारा कवितासंग्रह 'भुताचा भाऊ' हा लेख आठव्या इयत्तेतल्या कु. साक्षी बामणे हिने लिहिला आहे. कवितासंग्रहाचे नाव कसे गमतीदार आहे याचे विवेचन तिने सुरुवातीलाच केले आहे. घंटा, पाहुणे येती घरा, भुताचा भाऊ, श्रावण, खरं सांग आई या कवितांचे छान रसग्रहण केले आहे. सर्वच कविता वेगवेगळ्या विषयांवरील असून यात आपले मन रमून जाते असे मत ती व्यक्त करते.
पालकांना बालकनीती समजून सांगणारा कवितासंग्रह 'बालकनीती' हा लेख कृष्णा सीताराम नरोटे या दहावीच्या विद्यार्थ्याने लिहिला आहे. पालकांनी व कुटुंबीयांनी मुलांवर 'पालकनीती' न लादता त्यांची 'बालकनीती' समजून घेऊन त्यांच्याशी वागले पाहिजे असे तो म्हणतो. काजवा, एक होता कॅप्टन कूक, डॉक्टर मनी, दिव्यांचे संमेलन, हावरट मुंगळा या कवितांचे नेमके मर्म सांगत कविता सुंदर असल्याचे मत तो मांडतो. या संग्रहातील सर्वच कविता खूप छान आहेत असे मत तो प्रदर्शित करतो. मुखपृष्ठाविषयी आणि आतील चित्रांवरही तो भाष्य करतो.
मन आनंदून टाकणारा कवितासंग्रह 'काठीचा घोडा' हा लेख आठव्या इयत्तेतल्या कु. शेख उजमा शमशोद्दीन हिने लिहिला आहे. 'काठीचा घोडा' हा मुलांचा आवडता खेळ असतो. ग्रामीण भागात मुले सायकलचे टायर, तारांची सायकल, एक लांब काठी दोन्ही पायांत धरून खेळतात. त्यामुळे या खेळाचे नावच कवीने आपल्या कवितासंग्रहाला दिल्याचे ती नमूद करते. चिऊताईचे लग्न, मोरपीस, स्वप्नातील गाव, पाऊस, काठीचा घोडा या आणि आवडलेल्या इतर कवितांचा परामर्श ती या लेखामध्ये घेते. मुखपृष्ठ, आतील चित्रे व गीतकार शांता शेळके यांची पाठराखण या बाबी नमूद करून हे पुस्तक आवडल्याची साक्ष देते.
पळसफुलांनी मोहून टाकणारा आणि देशभक्तीने प्रेरित करणारा काव्यसंग्रह 'पळसपापडी' हा लेख कु. वेदिका कुलकर्णी या सातव्या इयत्तेतल्या मुलीने लिहिला आहे. बालगीतसंग्रहाचे हे नाव मजेशीर आहे, असे तिला वाटते. परोपकारी, ओसाडवाडीचे जहागीरदार, महाराष्ट्राची भूमी इत्यादी महत्त्वपूर्ण कवितांचा आढावा घेत, सर्वच कविता सुंदर आहेत असे सांगून सर्वांनी हा कवितासंग्रह वाचण्याचे आवाहन ती करते. शंकर सारडा यांची पाठराखण असलेला हा कवितासंग्रह सर्वांच्या संग्रही असावा असे तिला वाटते.
कॉमिक्सच्या जगाची सफर घडवणारा कवितासंग्रह 'कॉमिक्सच्या जगात' हा लेख नवव्या इयत्तेतील कु. ऋतुजा सुडके या विद्यार्थिनीने लिहिला आहे. काॅमिक्सचा अर्थ गमतीदार चित्रकथा असा आहे. हा संग्रह इतर संग्रहांपेक्षा वेगळा आहे. कॉमिक्सच्या जगात भेटलेला नागराज, त्याला मिळालेले वरदान व त्यातून त्याला महानता प्राप्त होणे याची जिज्ञासा हा संग्रह वाचत असताना वाचकांमध्ये निर्माण होते. पुढे दिल्ली येथे जाणे, परमाणुची भेट, बेडकांचे राज्य, राज्यावर संकट येणे व जवानांकडून शत्रूचा नायनाट होणे असा क्रम यामध्ये येतो. हे सारे ओघवत्या शैलीत ती मांडते. प्रत्येक पानावर असणारी कॉमिक्सच्या जगातील चित्रे, त्याखाली दिलेल्या कवितेच्या ओळी वाचकांना कॉमिक्सच्या जगाची सफर घडवून आणतात, असे तिला मनोमन वाटते.
रानफुलांसारखा मन मोहून टाकणारा बालकविता संग्रह 'रानफुले' हा कु. शिवानी देशमुख हिने लिहिलेला लेख आहे. सहावीत शिकत असूनही कवितांचा आस्वाद घेत लेखन करण्याचे कठीण कार्य तिने पार पाडले आहे. बियाचे स्वप्न, एकदा झाडांना फुटले पाय, चांदोबाची तक्रार, वाऱ्या वाऱ्या, आईच्या कुशीत या कवितेतील सौंदर्याचा आस्वाद घेत पुस्तकात छापलेल्या मान्यवरांच्या अभिप्रायांचाही ती परामर्श घेते.
युद्धाच्या खाईतून शांततेचा मार्ग दाखवणारा कवितासंग्रह 'युद्ध नको बुद्ध हवा' हा नवव्या इयत्तेतील कु. शिवानी सुभेदार हिचा आस्वादक लेख आहे. आज जगाला शांततेची गरज आहे. युद्ध कोणालाच नको आहे. या दीर्घ कवितेची समीक्षा लिहिणे ही तशी खूप अवघड गोष्ट होती. हे आव्हान कु. शिवानी सुभेदार हिने पेलले आहे. चित्रे व मुखपृष्ठाचे विश्लेषण आणि आतील काव्यांशाचा परिचय यामुळे हा लेख वाचनीय झाला आहे.
'नदी रुसली नदी हसली' ही नदीची आत्मकथा आहे. कु. प्रिया नागरगोजे या सातव्या इयत्तेतल्या मुलीने या संग्रहातील आवडलेल्या कवितांचे आशय विश्लेषण केले आहे. संग्रहाचा कागद, चित्रे, इ. बाबी ती आपल्या लेखात नमूद करते.
कवितांचा खजिना 'गूगलबाबा' हा लेख कु. राजनंदिनी सूर्यकांत देशमुख या सातव्या इयत्तेतल्या मुलीने लिहिला आहे. 'गूगलबाबा' या संग्रहावरील ही आस्वादक समीक्षाच आहे. गीरच्या जंगलात, गूगलबाबा, प्रश्न आमचे उत्तर गुगलचे, अजबगजब, सूर्याची शाळा, आपणही झाड होऊ, भाज्यांची जत्रा या कवितांवर तिने केलेले भाष्य उल्लेखनीय आहे. हा कवितासंग्रह उत्कृष्ट असल्याचे ती नमूद करते.
प्राणी किंवा पक्ष्यांचा काव्यमय ज्ञानकोश 'एलियन आला स्वप्नात' हा आठव्या इयत्तेतल्या कु. स्वाती शिंदे हिचा एक सर्वांगसुंदर असा लेख आहे. अलीकडे बालकवितेत गूगलबाबा, एलियन, डायनॉसोर असे विषय येऊ लागले आहेत. या संग्रहामध्ये अशाच अद्भूतरम्य कविता वाचायला मिळतात. प्राणी, पक्षी, झाडे अशा इतर विषयांवरील कविताही वाचायला मिळतात. या साऱ्यांचा खूप सुंदर आढावा तिने आपल्या लेखात घेतला आहे. बालवाडी आनंदवाडी, आजीची देवपूजा, लाडका लाडोबा या कवितांचे सौंदर्य तिने विशद केली आहे.
'आभाळमाया' हा डॉ. सुरेश सावंत यांचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बालकवितासंग्रह आहे. त्यावर 'आभाळमाया सांगे निसर्गाची किमया' हा लेख कु. मयुरी कांबळे या आठव्या इयत्तेतल्या मुलीने लिहिला आहे. त्यामधील आभाळमाया, बहुरूपी झेंडू, अभयारण्यात, माझी शाळा, पुस्तक माझा श्वास आणि इतर सुंदर कवितांचा परामर्श ती घेते, तसेच मुखपृष्ठ आणि पुंडलिक वझे यांनी काढलेली चित्रे यांचे कौतुकही करते. ल. म. कडू यांनी पाठपृष्ठावर दिलेल्या अभिप्रायाचीही नोंद ती घेते.
निसर्ग रक्षणाचा संदेश देणारी कविता 'रंग लागले नाचायला' या पुस्तकाचा नवव्या इयत्तेतल्या कु. दीक्षा तंगनोड या मुलीने रसास्वाद घेतला आहे. त्यातील काही कवितांचे सुंदर विवेचन तिने या लेखामध्ये केले आहे. लाजाळू, चिंचेचा चिगोर, रोजनिशी, पुस्तकपूर, कांगारूदादा, रंग लागले नाचायला अशा एकाहून एक सरस कवितांचा आढावा ती यामध्ये घेते. या संग्रहाचे अंतरंग व बाह्यांगाचीही ती चर्चा करते.
मुलांना एक प्रकारे कृतिशील करून त्यांच्या अभिरुची, अभिवृत्तीत वाढ करण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून संतोष तळेगावे यांनी केलेले आहे. मराठीमध्ये बालसाहित्यात एकाच कवीच्या सर्व कवितासंग्रहांवर विद्यार्थ्यांनी रसग्रहणे लिहिल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.
हल्ली मुले वाचत नाहीत, अशी ओरड होत असताना येथे मात्र मुले केवळ वाचतच नाहीत, तर प्रत्येक पुस्तकावर छान छान अभिप्रायांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. संतोष तळेगावे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षकांनी मुलांना वाचनाची गोडी लावावी. कवितेतील शब्दसौंदर्य, भावसौंदर्य आणि आशयसौंदर्य समजावून द्यावे. मुलांना कवितेतील सौंदर्यस्थळे शोधायला लावावे. मुलांना उमजलेला अर्थ अभिव्यक्त करण्याची संधी द्यावी. कवितेच्या गुणावगुणांची चर्चा घडवून आणावी. असे झाले तर मुले लिहिती होतील, उत्तम रसग्रहण करतील, परीक्षण, समीक्षण लिहितील. उद्याचे आस्वादक, रसिक, लेखक तयार होतील.
या संपादनाच्या निमित्ताने संतोष तळेगावे यांनी मुलांच्या लेखनकौशल्याला वाव देऊन एक चांगला आस्वादक समीक्षेचा बालसाहित्यातला उपयुक्त ग्रंथ निर्माण केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत (संपा9दन)
संपादक : संतोष तळेगावे
प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड
पृष्ठे ९६ किंमत रु १५०.
पुस्तक परिचय :
डॉ. श्रीकांत पाटील
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक
राज्यशासन पुरस्कारप्राप्त लेखक
९८३४३४२१२४
addComments
टिप्पणी पोस्ट करा