बालकविता लिहिणं ही वरवर सोपी वाटणारी गोष्ट मुळात खूप कठीण आहे. नुसतं यमक साधून आणि शब्दांची उतरंड एकाखाली एक बाळबोधपणे लिहून इथे चालत नाही. मुलांचं मन त्या कवितेत रमलं पाहिजे. मुलांना ती कविता आपली वाटली पाहिजे. मुलांच्या भावाविश्वाशी ती कविता सहजगत्या एकरूप झाली पाहिजे. मला वाटतं, बालकवितेची साधना करणाऱ्यांनाच ही कठीण गोष्ट लिलया जमू शकते. म्हणतात ना, इथे हवेत जातीचे. ज्यांनी आयुष्यभर बालकविता हृदयापासून जपली आणि मुलांच्या हृदयांपर्यंत पोहोचवली. असे बालसाहित्यातील 'अभ्यासोनी प्रकटावे असे व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांचे आजतागायत १४ बालकवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या पसंतीस ते उतरलेले आहेत. अनेकदा बालकवितासंग्रहाचा परिचय मोठी मंडळी करून देताना आपण पाहतो. पण मुलांसाठी लिहिलेलं कवितांचं पुस्तक मुलांनाच कसं वाटतं, त्या पुस्तकांबद्दल त्यांना काय वाटतं? हे समजून घेणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. हाच प्रयत्न संतोष तळेगावे या उपक्रमशील शिक्षकाने मनापासून केला आहे. या शिक्षकाने ते कार्यरत असलेल्या श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील त्यांच्या विद्यार्थ्यांना सावंत सरांची बालकवितांची पुस्तके देऊन मुलांना त्या पुस्तकांवर आस्वादात्मक समीक्षा लिहिण्यासाठी प्रवृत्त केले आणि मुलांनी त्याला उत्तम साथ दिली. वाचणारी मुलं लिहिती झाली. मुलांनी लिहिलेल्या या आस्वादात्मक समीक्षेतूनच 'रानफुलं फुलविणारा कवी सुरेश सावंत' हे पुस्तक आकाराला आले. बालकवितेची मुलांनी केलेली ही समीक्षा असल्यामुळे त्या समीक्षेला मुलांच्या मनाच्या नितळपणाचा, खरेपणाचा स्पर्श आहे, हे महत्त्वाचे.
खरंतर, डॉ. सुरेश सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, त्यांच्या बालकवितेबद्दल लिहितात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की सावंत सरांच्या बालकवितेने बालसाहित्याचे दालन खऱ्या अर्थाने समृद्ध केले आहे. त्यांची बालकविता काळाच्या कसोटीवर टिकणारी आहे. मुलांची आनंदाची बाग फुलविणारी आहे.
डाॅ.सुरेश सावंत सरांबद्दल विचार करताना ,
'आत आपुल्या झरा झुळझुळे, निळा निळा स्वच्छंद
जीवन म्हणजे उधळित जाणे, हृदयातील आनंद '
या ओळी सहज ओठांवर येतात. कारण मला वाटते, सावंत सरांचे व्यक्तिमत्त्वच मुळी या ओळींसारखे जीवनाला आनंदाने भिडणारे आणि आपल्या आत एक नितळ झरा सतत जिवंत ठेवणारे असेच आहे. मुलांवर हृदयातील आनंदाची पखरण करत ,चमकदार बालकविता लिहून मुलांची आनंदाची बाग फुलवत, ते आपल्या आयुष्याची वाटचाल करीत राहिले, ते आजतागायत.
सरांची बालकवितांची पुस्तकं ही वैशिष्ट्यपूर्णच ठरली आहेत. या पुस्तकांनी ख-याअर्थाने बालसाहित्यात मोलाची भर घातली. अ .भा.बालकुमार साहित्य संस्थेचा ग.ह.पाटील पुरस्कार लाभलेले 'हिरवे हिरवे झाड' हा बालकवितासंग्रह , महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार लाभलेले 'जांभुळबेट', 'बालकनीती' व 'पळसपापडी' हे तीन बालकवितासंग्रह, तसेच 'भुताचा भाऊ','काठीचा घोडा', 'काॅमिक्सच्या जगात', 'रानफुले', 'युद्ध नको बुद्ध हवा', 'नदी रूसली नदी हसली', 'गूगलबाबा' , 'एलियन आला स्वप्नात', 'आभाळमाया' आणि आता नुकतेच प्रसिद्ध झालेले 'रंग लागले नाचायला' ही १४ बालकवितांची पुस्तकं मुलांच्या राज्यात आजही हवीहवीशी वाटणारी अशीच आहेत. आपण नेहमी म्हणतो, काळानुसार बालसाहित्य हे नेहमीच बदलत गेले पाहिजे.बालसाहित्याचे विषय, आशय आजची मुलं डोळ्यासमोर ठेऊन निवडले गेले पाहिजेत म्हणजे ते बालसाहित्य काळाच्या कसोटीवर खरे उतरण्यास मदत होईल. त्यात आणखी प्रयोगशीलतेची भरही पडली म्हणजे ते बालसाहित्य त्याच्या वेगळेपणामुळे मुलांचे लक्ष वेधून घेईल. डाॅ. सुरेश सावंत यांनी बालसाहित्य नुसते लिहिले नाही तर ते साहित्य मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम देखील राबवले आणि ते यशस्वी करुन दाखवले. सावंत सरांची बालकविता मुलांचे रंजन करता करता नकळत एखादा चांगला विचारही देऊन जाते. हेच त्यांच्या बालकवितेचे वैशिष्ट्य विशेषत्वाने जाणवते.
त्यांचा बालकुमारासांठी असलेला ' युद्ध नको बुद्ध हवा ' ह्या बालकुमार कवितासंग्रहात एकच दीर्घ कविता या पुस्तकात मुलांना वाचायला मिळते. फुलापानांवरच्या कवितेच्या पलीकडेही वास्तवतेचे एक जग आहे; जे सावंत सरांच्या कवितेतून डोकावून पाहते.
हिरवे हिरवे झाड हा कवितासंग्रह मुलांना झाडांचा लळा लावणारा आणि आनंदाचा मळा फुलवणारा आहे.
झाड होते पक्षांच्ये बाबा आणि आई
रात्रीला झोपावते का गाऊन अंगाई
किती सहज सुंदर कवितेच्या या ओळी.
जांभूळबेट हा कवितासंग्रह मुलांना कल्पनेची भरारी घ्यायला लागणारा.
जांभूळ बेटावर उतरली परी
थेट निघाली पोपटाच्या घरी
पोपटाने दिली जांभळं पाच
पोपट म्हणाला नाच परि नाच
जांभूळबेटावरची मज्जा अनुभवायची असेल तर हा कवितासंग्रह मुळातून वाचला पाहिजे.
भुताचा भाऊ हा गमतीशीर आणि आश्चर्यकारक अनुभूती देणारा बालकवितासंग्रह आहे.
बालकनीती हा बालकविता संग्रह पालकांना बालकनीती समजावून सांगणारा आहे.
सरांचे सर्वच बालकवितासंग्रह मजेशीर, अद्भुत, आनंददायी आणि नकळत चांगला विचार देऊन जाणारे आहेत. सावंत सरांच्या १४ बालकवितासंग्रहांचा आस्वाद घेऊन त्यावर आपल्या परीने समीक्षा लिहिणाऱ्या या पुस्तकात सहभागी झालेल्या १४ विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. सरांच्या कवितेमुळे त्यांना व्यक्त व्हावेसे वाटले, लिहावेसे वाटले, हे विशेष.
या सा-यांमुळेच सावंत सरांच्या पुस्तकांशी मुलांचे मैत्र हे सहजगत्या जुळते, हे आपल्या लक्षात येते. पुस्तक माझा मित्र या बालकवितेत सरांनी लिहिलंय...
पुस्तकांनी बोट धरून
अद्भुत विश्वात नेले
पुस्तकांच्या मैत्रीनेच
मला श्रीमंत केले....
मला वाटतं, सरांची पुस्तकं वाचून लहानथोरांच्या मनी हा विचार आल्याशिवाय राहणार नाही.
शाळेला 'आनंदशाळा', 'जीवनशाळा ' बनविण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे कल्पक, उपक्रमशील व प्रयोगशील मुख्याध्यापक, संवेदनशील लेखक म्हणून डाॅ. सुरेश सावंत सरांची ओळख तशी महाराष्ट्राला नवीन नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंतःकरणपूर्वक धडपडणारी त्यांची शाळा नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय सरांची खरी कर्मभूमीच . सावंत सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तिथे अनेक उपक्रम, प्रकल्प राबविले आहेत. ते यशस्वी करून दाखविले आहेत.
'आज विज्ञानयुगात सबंध जग अतिशय गतिमानतेने ढवळून निघत आहे. कालचे पारंपरिक विचार आणि कल्पना आज कालबाह्य ठरत आहेत आणि त्यांची जागा नवे विचार, नव्या कल्पना घेत आहेत. आजची बालकांची पिढी ही फारच चिकित्सक आणि जिज्ञासू आहे. आजच्या बालकाला चंद्रासाठी हट्ट धरणाऱ्या प्रभूरामचंद्राची गोष्टही ऐकावीशी वाटते आणि खऱ्याखुऱ्या चंद्राची, म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या उपग्रहाची खगोलशास्त्रीय माहितीही वाचावीशी वाटते. याचाच अर्थ आजच्या बालकाला स्वप्नही हवी आहेत आणि सत्यही हवे आहे. त्यातून तो स्वत:चे स्वतंत्र मत बनवू पाहतो. तो इतरांची तयार मते स्वीकारायला तयार नाही. अशा स्वयंप्रज्ञ बालवाचकांसाठी निखळ बालसाहित्य लिहिणे, हे आजच्या बालसाहित्यिकांपुढचे एक अवघड आव्हान होऊन बसले आहे. बालसाहित्य हे काळाशी आणि बालमनाच्या विकासाच्या टप्प्यांशी सुसंवादी असले पाहिजे असे जे म्हटले जाते, ते या अर्थाने ! बालकुमारांची बालसाहित्याशी गट्टी जमायची असेल तर बालसाहित्य त्यांच्या पसंतीला उतरणारे असले पाहिजे. आजच्या मुलांचा इतका बारकाईने विचार करणारे आज हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच बालसाहित्यकार आहेत ,आणि त्यात सावंत सरांचे नाव अगदी वरचे आहे.
सरांनी हाती घेतलेलं प्रत्येक कार्य त्यांनी परिश्रमपूर्वक पूर्णत्वास नेले. ते कार्य आदर्शवत ठरले.
अशावेळी, मला त्यांच्या जांभूळबेट पुस्तकातील झरा या बालकवितेतील खालील ओळी आवर्जून आठवतात.
'कड्यावरून उड्या मारीत,
पळू लागला झरा
डोंगर आडवा आला तरी,
अडला नाही जरा...'
धावत्याला रस्ता सापडे म्हणतात तेच खरे.
सरांची कामाची पद्धतही अनोखी . हाती घेतलेलं कोणतंही कार्य ...मग ते शिकवणं असेल ,लेखन - वाचन असेल, संपादन करणं असेल, मुद्रितशोधन असेल ...ते जीव ओतून आणि अभ्यासपूर्णच करणार. जो पर्यंत ते काम मनाजोगं होत नाही तो पर्यंत त्यांच्या मनाला स्वस्थता नाही, असा त्यांचा शिरस्ता. म्हणूनच त्यांच्या हातून पूर्ण झालेली कोणतीही साहित्यकृती ,शिक्षणकृती ही इंद्रधनुष्याप्रमाणे लक्ष वेधून घेते.
म्हणतात ना,
सुंदरतेचा वेध घ्यायला, मन नेहमी जागे हवे
प्रयोग नवे करायला, हात नेहमी सज्ज हवे.
सरही असेच आहेत ; बालसाहित्यात, शिक्षणक्षेत्रात विविध प्रयोग करुन बालमन फुलविणारे. मुलांबद्दल अपार लळा आणि कणव असणारे . सरांचे हे व्यक्तिमत्त्व पाहून मला निदा फाजली यांच्या कवितेच्या ओळी आठवतात...
'घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर लें
किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाये '
मला वाटतं , सरांनी आयुष्यभर मुलांची मनं जपली.त्यांच्या दुःखावर हळूवार फुंकर घालून त्यांना आनंदाच्या वाटेवर आणलं.बालसाहित्यातून त्यांची मनं आनंदाच्या बागेसारखी फुलवली.
मुलं म्हणजे देव, मुलं म्हणजे देव
मुलं म्हणजे राष्ट्राची, मोलाची ठेव
हाच विचार आयुष्यभर त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या बालसाहित्यातून झिरपत आजही आपल्यापर्यंत तो पोहचत आहे ,हे विशेष.
एकनाथ आव्हाड,
( साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी)
९८२१७७७९६८
addComments
टिप्पणी पोस्ट करा