नांदेड:( दि.२० सप्टेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात ‘संशोधन प्रकल्प आराखडा’ या विषयावर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दि. १८ सप्टेंबर रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त माहिती शास्त्रज्ञ रंजीत धर्मापुरीकर यांनी उपस्थितांना, संशोधन प्रकल्पाच्या प्रभावी आराखड्याचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक तंत्रांबद्दल मार्गदर्शन केले.
विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी दर्जेदार आणि समाजोपयोगी संशोधन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विचारमंचावर उपस्थित उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे यांनीही सर्वांना शुभेच्या दिल्या.
श्री. रंजीत धर्मापुरीकर यांनी, संशोधनाच्या विविध टप्प्यांवर कसे नियोजन करावे, संशोधनाचे शीर्षक निवडण्यापासून ते प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीपर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. त्यांनी संशोधन लेखनाचे योग्य स्वरूप कसे असावे, याविषयीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना संशोधन प्रक्रियेत उत्तम आराखड्याचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी विभागातील डॉ.अजय टेंगसे आणि संशोधन विकास समितीचे समन्वयक डॉ. संजय ननवरे यांनी केले.
सूत्रसंचलन प्रा. माधव दुधाटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आणि प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा