रानफुलं फुलवणारे बालकवी : डॉ. सुरेश सावंत' कैलास मधुकर होनधरणे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. मुखेड.


मुखेड तालुक्यातील श्री. शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती येथील उपक्रमशील, साहित्यप्रेमी आणि हरहुन्नरी शिक्षक श्री. संतोष तळेगावे यांनी संपादित केलेले 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' हे पुस्तक म्हणजे डॉ. सावंत यांनी लिहिलेल्या समग्र बालकवितेचे बालकांनी केलेले रसग्रहण होय.

श्री. संतोष तळेगावे हे आपला शिक्षकी पेशा सांभाळत साहित्यावर उदंड प्रेम करणारे शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची रुची जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. केवळ रुची निर्माण केली नसून आपल्या विद्यार्थ्यांना लिहितं केलं आहे. ही आजच्या मोबाईलच्या युगात  महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतात अतिशय उपयुक्त, दुर्मिळ आणि कौतुकाची बाब आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांनी बालकांसाठी विपुल आणि कसदार असे साहित्यलेखन केलेले आहे. त्यांनी मुलांच्या भावविश्वाशी तादात्म्य पावणाऱ्या कविता लिहिल्या आहेत. कथा लिहिल्या आहेत. 

डॉ. सावंत यांच्या कविता बालकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, या हेतूने त्यांच्या कवितांमधला गोडवा शालेय मुलांपर्यंत पोचविण्याचे कार्य शिक्षकांनी करायला हवे. ते कार्य श्री. संतोष तळेगाव यांनी अतिशय प्रामाणिकपणे केल्याचे दिसून येते. तळेगावे यांनी डॉ. सावंत यांचे सर्व, म्हणजे १४ बालकवितासंग्रह विद्यार्थ्यांना वाचायला दिले. त्या कवितासंग्रहातील सर्व कविता वाचून, पुन्हा पुन्हा वाचून त्यातील  आवडलेल्या संग्रहातील, भावलेल्या कवितांवर विद्यार्थ्यांनी सोप्या भाषेमध्ये अतिशय मार्मिक आणि प्रांजळ प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. ही बालसाहित्याची बालकांनी केलेली जणू समीक्षाच आहे. ती एखाद्या प्रथितयश समीक्षकापेक्षाही मला जास्त महत्त्वाची वाटते. 

हे चित्तवेधक पुस्तक वाचनासाठी हाती घेतल्यानंतर एका दमात वाचून हातावेगळं केल्याशिवाय राहावत नाही, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. सुरेश सावंत बालकवी म्हणून वाचकांना पूर्णांशाने भेटतात. डॉ. सावंत यांच्या कवितेची शक्ती, मुलांची रसग्रहणभक्ती आणि तळेगावे सरांची अफलातून युक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' हे पुस्तक होय!

या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये  साहित्याची आवड निर्माण करणे, त्यांना मराठी साहित्यविश्वात घेऊन जाणे ही अतिशय दुर्मिळ बाब श्री. संतोष तळेगावे यांनी अगदी लीलया साधली आहे. मुलांचे मोबाईलवर अगदी सहज फिरणारे बोट पकडून त्यांना मराठी साहित्याच्या सुंदरबनात रमविण्याचे अतिशय उदात्त कार्य तळेगावे सर करत आहेत.

वाचनसंस्कृती लोप पावत आहे, असा आरोप होत असताना श्री. शिवाजी विद्यालय येवती येथील विद्यार्थी दिसामाजी वाचतही आहेत आणि लिहीतही आहेत. 

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांची प्रस्तावना तळेगावे सरांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस उभारी देणारी आहे. 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' हे पुस्तक नांदेडच्या इसाप प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. बालकवितांची बालकांनी केलेली ही आस्वादक समीक्षा बालसाहित्याच्या विश्वात मैलाचा दगड ठरेल, यात शंकाच नाही.

कैलास मधुकर होनधरणे, 

गटशिक्षणाधिकारी पं. स. मुखेड

मोबाईल नंबर. 9527678411

टिप्पण्या