*गोदी कामगारांच्या एकजुटीमुळेच दिल्लीत झाला पगारवाढीचा समझोता करार*

भारतातील गोदी कामगारांच्या सहा फेडरेशनची  एकजूट, कुशल नेतृत्व, संपासाठी कार्यकर्त्यांनी केलेली पूर्व तयारी आणि भारतातील प्रमुख बंदरातील गोदी कामगारांची एकजूट,  यामुळेच बंदर व गोदी कामगारांचा दिल्लीत समझोता वेतन करार संपन्न झाला,   असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के. शेट्ये यांनी माझगाव येथील कामगार सदन  सभागृहात झालेल्या कामगार कार्यकर्त्यांच्या विजयी मेळाव्यात काढले. 

भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या पगारवाढीचा समझोता करार २७ ऑगस्ट  २०२४  रोजी दिल्लीमध्ये संपन्न झाला. गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांनी दिल्लीत समझोता करार केल्यानंतर  द्विपक्षीय वेतन समितीचे सदस्य सर्वश्री सुधाकर अपराज,  विद्याधर राणे आणि केरसी पारेख यांचे २९  ऑगस्ट  २०२४ रोजी  मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेव्हा त्यांचे मुंबई पोर्ट  ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आणि ट्रान्सपोर्ट  डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाल व पुष्पहार घालून  भव्य स्वागत केले. कामगार सदन जवळ गोदी कामगारांनी फटाके वाजून आपला विजयोत्सव साजरा केला.

भारतातील बंदर व गोदी कामगारांना  १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा करार  ३२ महिने झाले तरी होत नव्हता, त्यामुळे अखेर भारतातील मान्यताप्राप्त सहा कामगार महासंघाना १२ ऑगस्ट २०२२ रोजी पोर्ट  प्रशासन आणि केंद्र सरकारला २८ ऑगस्टपासून बेमुदत  संपाची नोटीस द्यावी लागली. प्रमुख बंदरामध्ये तशी संपाची तयारीही झाली. आता संप निश्चित होणार असे संदेश केंद्र सरकारला गेले.  गोदी कामगारांच्या एकजुटीमुळेच ८.५० टक्के पगार वाढीचा समझोता करार  अखेर दिल्लीमध्ये संपन्न झाला.

  कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतिन पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  युनियनचे पदाधिकारी,  कार्यकर्ते व कामगारांच्या एकजुटीमुळेच ही पगारवाढ झाली आहे.  यापुढेही युनियनवर विश्वास ठेवा आणि कामगारांची एकजूट कायम ठेवा. युनियनचे सेक्रेटरी व द्विपक्षीय वेतन समितीचे सदस्य विद्याधर राणे यांनी  कराराबाबत सांगितले की, सर्व बंदरातील कामगारांनी संपावर जाण्याची तयारी केली होती. संप निश्चित होणार होता.  परंतु  कुशल नेतृत्व, दूरदृष्टीकोन व कामगारांची एकजूट यामुळेच ८.५० टक्के पगारवाढीचा दिल्लीमध्ये समझोता करार झाला.  यासाठी दिल्लीत वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या झाल्या. इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटा यांनी पुढाकार घेऊन मंत्री महोदयाच्या सहकार्याने सन्माननीय तडजोड करून आणली,  त्याबद्दल त्यांचे खरोखरच मनःपूर्वक अभिनंदन. युनियनचे जनरल सेक्रेटरी व  द्विपक्षीय वेतन समितीचे सदस्य  सुधाकर अपराज यांनी  करारा विषयी कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करताना सांगितले की, गोदी कामगारांची भक्कम एकजूट तसेच नोकरीत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी देखील या संपाची चांगली तयारी केली होती. केंद्र सरकारवर कामगारांच्या एकजुटीचा दबाव आल्यामुळेच गोदी कामगारांचा चांगला समझोता करार घडून आला. आता गणपतीचा सण आला आहे गोदी कामगारांना बोनस मिळाला पाहिजे याबाबतही चर्चा झाली असून बोनस कॅबिनेटच्या मंजुरीला गेला असून लवकरच मंजूर होऊन येईल अशी आशा आहे. जर उशीर झाला तर गेल्या वर्षाप्रमाणे ॲडव्हान्स बोनस दिला जाईल. सभेचे सुंदर सूत्रसंचलन युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. पगारवाढीची गोड बातमी असल्यामुळे सर्व कामगारांना पेढे वाटण्यात आले. शेवटी कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है. लाल बावटे की जय. या घोषणानी मिटिंगची सांगता झाली.

याप्रसंगी  मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, युनियनचे पदाधिकारी विजय रणदिवे, मनीष पाटील, विकास नलावडे, अहमद काझी, शीला भगत, रमेश कुऱ्हाडे, विष्णू पोळ, संदीप चेरफळे, आप्पा भोसले, मारुती विश्वासराव त्याचप्रमाणे कामगारांबरोबरच सेवानिवृत्त कामगारही मोठ्या संख्येने हजर होते. 

आपला 

 मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.

टिप्पण्या