कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी सरकारला आंदोलनाचा इशारा*



 गेल्या १० वर्षात ४९ हजार कंपन्या बंद पडल्या असून ३ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत.हेच कामगार अखेर नाइलाजाने कंत्राटात काम करतात.परंतु दुसऱ्या बाजूने त्यांना कायद्या‌प्रमाणे किमान वेतनही मिळत नाही, सरकारच्या दुर्लक्षीत धोरणातून कंत्राटी कामगारांच्या वाट्याला हलाखीचे जीवन आले आहे.तेव्हा या प्रश्नावर सरकारला जाग आणण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल,असा स्पष्ट इशारा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, ठाकरे शिवसेनेचे उपनेते, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी  कामगारांच्या आक्रोश मोर्चात बोलताना दिला.

  महाराष्ट्र इंटक,एचएमएस, सिटु, भारतीय कामगार सेना,आयटक,एनटियू आय,एआयसीसीटीयू आदि‌ कामगार‌ संघटनांनी,कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती,महाराष्ट्राच्या विद्यमाने २३ ऑगस्ट २०२४ रोजी आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. 

     कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे समन्वयक डॉ.डी.एल‌. कराड म्हणाले,कंत्राटी कामगारांचा प्रश्न असेल,अथवा केंद्र सरकारने संमत केलेल्या चार श्रम संहिता असतील,यातून सरकारचे कामगार विरोधी धोरण स्पष्ट झाले आहे. तेव्हा एक कोटींची वोट बँक असलेला कामगारवर्ग विधानसभेत राज्य सरकारला चांगलाच धडा शिकविल्या शिवाय गप्प‌‌ बसणार नाही!

   सर्वश्री गोविंदराव मोहिते,कॉ.उदय भट,निवृत्ती धुमाळ, कॉ.मिलींद रानडे कॉ. सुकुमार दामले,विवेक मोंन्टेरो,कॉ.ताप्ती मुखोपाध्याय,सुधा सुमंत आदींनी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील तरतुदीनुसार कष्टकरी कामगारांना समान कामाला समान वेतन मिळालेच पाहिजे,अशीही मागणी केली. 

    कामगारांच्या प्रश्नावर सरकारला शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. निवेदनात कंत्राटी कामगार प्रथा बंद करा.त्यासाठी कंत्राटी कायदा रद्द करा, कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा.कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता संमत केलेल्या चार श्रम सहिता रद्द करा, सर्वच उद्योगातील कामगारांना किमान वेतन दरमहा २६००० रुपये मिळालेच पाहिजे,आदी दहा मागण्या करण्यात आल्या.पुढील आंदोलन बीकेसी येथेच करण्याचा निर्णय आक्रोश मोर्चात घेण्यात‌ आला. याप्रसंगी व्यासपीठावर हिंद मजदूर सभेचे कार्याध्यक्ष व म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, हिंद मजदूर सभेचे उपाध्यक्ष विद्याधर राणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी दत्ता खेसे,  मारुती विश्वासराव, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे निवृत्ती देसाई, प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील इत्यादी विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्याला कंत्राटी कामगार व महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या. असे मारुति विश्वासराव  कळवित आहेत.

टिप्पण्या