मुंबई दि.२१: देशात कधी नव्हे ती बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आली आहे. सन२०४७ पर्यंत आपला देश विकसित देशांच्या पंक्तीत असेल,असे दिवा स्वप्न दाखविणा-या नरेंद्र मोदी सरकारच्या फसव्या चाली विरुद्ध आता कामगार वर्गाला एकजूटीने लढावे लागेल,असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री,ज्येष्ठ कामगार नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कामगारांच्या पुरस्कार सोहळ्यात बोलतांना केले आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या विद्यमाने संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.गं.दं. आंबेकर यांची ११७ वी जयंती बुधवारी परेलच्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाली.या प्रसंगी गं.द.आंबेकर जीवन गौरव व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करताना, आंबेक रजींचा विधायक विचार पुढे नेण्यात येतील,असे सांगितले.तत्पूर्वी स्व.गं.द.आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून,दीप प्रज्वलन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी आपल्या भाषणात सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेताना म्हणाले,केंद्र सरकारने चार कामगार साहिंता संसदेमध्ये मंजूर करून कामगारवर्ग आणि कामगार चळवळीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे.राज्यातील महायुती सरकारने केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून,हे कामगार विरोधी कायदे राज्याला लागू करण्याचा डाव रचला आहे.परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर कामगारांच्या संसाराची अधिकच धूळधाण होईल,तेव्हा कामगार वर्गाला या सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम करावे लागणार आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार सचिन भाऊ अहिर म्हणाले, मुंबई मधील कामगारांना एक लाख ४० हजार घरे देण्याचे धाडस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविले आहे.परंतु राज्याच्या महायुती सरकारने मागील सरकारने सोडतीत लागलेल्या घरांच्या चावी वाटपापलीकडे काहीच केलेले नाही.या सरकारने सत्तेवर आल्यापासून एकाही कामगाराला नवीन घर बांधलेले नाही.या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारकडे वेळ मागितला तर तोही दिला जात नाही, असे सांगून सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले,यापूर्वी मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्या एनटीसीद्वारे चालविण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सहानुभूतीचा निर्णय घेतला.परंतु आताचे केंद्र सरकार देशातील बंद पडलेल्या एनटीसीच्या २३ गिरण्या चालविणे आमचे काम नाही,असे म्हणून टाळाटाळ करीत आहे.केंद्र सरकारने कोविडचे कारण पुढे करून चालू असलेल्या देशातील एनटीसीच्या २३ गिरण्या बंद केल्या आहेत.
आम्ही या प्रश्नावर राष्ट्रीयस्तरावर लढा उभा केला.परंतु कामगारांच्या उपासमारीवर सरकाराने डोळे झाक करुन निर्दयीपणाचा कळस गाठला आहे.दिवंगत कामगारनेते दत्ता ईस्वलकर यांच्या निष्ठापूर्वक कामाची सचिनभाऊ अहिर यांनी आपल्या भाषणात आठवण करून दिली.
पुरस्कार प्रदान सोहळ्यात,संघटनेने अमृत महोत्सवीवर्षाची वाटचाल पूर्ण केल्याबद्दल.केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.जी संजीवा रेड्डी यांना श्रमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.ते मुंबईला आजाराच्या कारणास्तव आले नाहीत.परंतु तो पुरस्कार त्यांच्या रहात्या घरी हैद्राबादला नेऊन देण्यात येईल.
मानाचा गं.द.आंबेकर पुरस्कार तडफदार कॉंग्रेस कामगार नेते भाई जगताप यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कारखाने आणि आस्थापनातील १)सिटु पदाधिकारी हरिभाऊ बाळाजी तांबे(सिन्नर),कामगार चळवळ,२) सामाजिक कामातील निस्पृह कार्यकर्ते दिलीप गणपत खोंड (मुंबई) सामाजिक,३) चौफेर लेखक विलास पंचभाई (नाशिक) साहित्य, ४) राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नेमबाज नेहा मिलिंद साप्ते (मुंबई) क्रीडा,५) विविधांगी कलेने सुपरिचित संतोष दत्ताराम शिंदे (रत्नागिरी) कला,या सर्व गुणवंतांना श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप मानपत्र,स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे होते.श्रमरत्न पुरस्कारास ७५ हजार रू.,जीवन गौरव पुरस्कारास ५१ हजार रु.,श्रम गौरव प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे धनादेश सोबत पारितोषिक म्हणून
प्रदान करण्यात आले.
विद्यार्थी दशेतूनच संघर्षाकडे वळलेले कॉंग्रेसनेते आमदार भाई जगताप आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, कामगार नेता हा शेवटपर्यंत कामगार नेता म्हणूनच जगतो.कामगार आणि राजकारण या
मध्ये आपण नेहमीच कामगार जीवनार अधिक निष्ठा वाहात आलो आहोत. आयुष्यातील अनेक पैलूं वरील यशा-पयशाचे अनुभव सांगताना भाई जगताप म्हणाले, हसत-खेळत जगण्याला आपण अधिक महत्त्व दिले आहे.
जीवन गौरव म्हणजे
आपल्या जीवन कार्याला पूर्णविराम समजू नये,तर ती आपल्या सर्वोत्कृष्ट कामाची प्रशंसा आणि संधी असते,आशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी भाईं जगताप यांच्या लोकीकाची प्रशंसा केली.
कार्यक्रमाला खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे,आंबेकर श्रम संशो धन संस्थेचे संचालक जी.बी.गावडे,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे राजन लाड,सुनिल अहिर, उत्तम गिते,मिलिंद तांबडे,संजय कदम, अवधेश पांडे, किशोर रहाटे,साई निकम पदाधिका-यांसह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीने सभागृह खचाखच भरला होता.
डॉ.शरद सावंत, राजेंद्र गिरी,प्रदीप मून,काशिनाथ माटल यांनी पूरस्कार निवड समितीचे काम पाहि ले.प्रदीप मून यांनी सांगितले,संस्थेने आपल्या लोकीकाला हा साजेसा असा उपक्रम निवडला आहे.
गं.द.आंबेकर जयंतीच्या औचित्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वाटचालीवर एक माहिती पूर्ण चित्रफीत प्रकाशीत करण्यात आली.या औवचित्याने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गिरणी कामगारांच्या मुलांचा "आंबेकर स्मृती शैक्षणिक सहाय्याने गुणगौरव करण्यात आला.कार्य क्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विजय कदम यांनी केले.••••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा