स्वारातीम’ विद्यापीठ आणि एसजीजीएस यांच्यामध्ये सामंजस्य करार

 

रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्यामध्ये येणाऱ्या काळाची पाऊले ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी १२ जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे आणि एसजीजीएस चे संचालक डॉ. मनेश कोकरे यांच्या पुढाकाराने या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाने याबाबतीत पुढाकार घेतलेला आहे. या संकुलामध्ये मराठी व इंग्रजीसह फ्रेंच व स्पॅनिश या परकीय भाषाही शिकवल्या जातात. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर या परकीय भाषा अवगत केल्या तर त्यांना त्या-त्या देशामध्ये नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होतात. आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख असे तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग शिक्षण देणार आहे.
नांदेड शहरातील या दोन्हीही शासकीय अग्रगण्य संस्था आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० अंमलबजावणीच्या अनुषंगाने या दोन्हीही संस्थानी काळाची पाऊले ओळखून व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा सामंजस्य करार केलेला आहे. यावेळी नवोपक्रम नवसंशोधन साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे, प्रा. डॉ. पी. विठ्ठल, प्रा. शैलजा वाडीकर, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, प्रा. डॉ. निना गोगटे, प्रा. डॉ. झिशान अली यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या