भरपावसात ज्येष्ठांची पदयात्रा धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर

 

नांदेड - ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी भरपावसात मायबाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकली.  यावेळी शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले.
ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 वर्षे करावी, ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार पाचशे रूपये महिला मानधन द्यावे, ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी, ज्येष्ठ नागरिक धोरण 2007 च्या कायदा, 2010 च्या नियमांची व 2013 च्या कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, ज्येष्ठांच्या त्याग, समर्पण व संख्येचा टक्का लक्षात घेऊन एक महिला किंवा पुरूष ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी विधानपरिषद, राज्यसभेवर घ्यावा, गरजवंत, गरीब, दुर्लक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी, कामगार, विधवा माता व दिव्यांग ज्येष्ठांना किमान तीन हजार पाचशे रूपये  दरमहा मानधन द्यावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ-फेस्कॉम संलग्न सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी 11 वाजता कलामंदिर येथून मायबाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रेस सुरूवात झाली.
भरपावसाची रिमझीम सुरू असतांनाही पदयात्रेत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर जवळपास दोन तास धरणे आंदोलन केले.
यावेळी डॉ.हंसराज वैद्य यांनी उपस्थित  मागण्यांची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी रामचंद्र कोटलवार, गिरीश बाऱ्हाळे, प्रभाकर कुंटूरकर, माधवराव पवार काटकळंबेकर, डॉ.लक्ष्मी पुरनशेट्टीवार, पुष्पा कोकीळ, प्रभा चौधरी, जिंतूरकर, सोमावाड, वाढवणकर, सुषमा गहिरवार आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या