*शहीद सैनिकांच्या परिवाराबाबत सन्मान व सहानुभूतीची भावना जोपासली पाहिजे* -लेफ्टनंट डॉ.आर.पी.गावंडे

नांदेड:( दि.२९ जुलै २०२४)

          भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सैन्य दलाने अनेक लढाया आणि युद्धसदृश्य मोहिमा लढलेल्या आहेत. या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर सैनिक वीरगती प्राप्त होत असतात. वीर मरण पत्करून देशासाठी शहीद होत असतात. या शहीद सैनिकांना फक्त हारतुरे घालून, श्रद्धांजली अर्पण करून भागत नाही, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी शहीद सैनिकांच्या परिवाराबाबत वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांच्याबाबत अपार सहानुभूती, मदत आणि सन्मानाची भावना जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन लेफ्टनंट डॉ. आर. पी. गावंडे यांनी केले आहे.

          कारगिल विजय दिनानिमित्त श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .

          प्रारंभी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली व त्यांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ.अजय टेंगसे, डॉ.कैलास इंगोले, डॉ.साहेब माने यांची उपस्थिती होती

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी विभागाचे कार्यवाहक प्रा.श्रीकांत सोमठाणकर यांनी केले. याप्रसंगी एनसीसी कॅडेट्सनी कारगिल युद्धातील अनेक पराक्रमाच्या गाथा विद्यार्थ्यासमोर मांडल्या. याप्रसंगी एनसीसी बटालियन, नांदेडचे सुभेदार शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

          शेवटी एनसीसी कॅडेट कृष्णा वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी एनसीसी कॅडेट व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 'भारत माता की जय' हा नारा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या