'गोष्टींतून कबीर' हा ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री संजीवनी बोकील यांचा बालकथासंग्रह दिलीपराज प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरून यात कबीरांच्या जीवनातील बोधप्रद गोष्टी सांगितल्या असतील, असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे नाही. ह्या सर्व नेहमीच्या बालभावविश्वाशी संबंधित बालकथा आहेत. कथेच्या शेवटी त्या कथेचे सार व्यक्त करणारा कबीरांचा दोहा दिलेला आहे. गोष्टीला अनुरूप दोहा आणि दोह्याला अनुरूप गोष्ट असे हे गूळपीठ मस्त जमले आहे. गोष्टीचा गद्य सारांश न सांगता लेखिकेने गोष्टीला दोह्याची जोड दिली आहे. हा दोहा म्हणजे त्या गोष्टीचे तात्पर्यच आहे. दोह्याच्या खाली दोह्याचा अर्थ आणि अपरिचित शब्दांचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टींची काव्यात्मता वाढली आहे.
७२ पृष्ठांच्या ह्या पुस्तकात दहा मराठी कथा आणि खडी बोलीतील दहा दोहे यांची छान गट्टी जमली आहे. 'गुरुर्देवो महेश्वरा' ह्या पहिल्याच गोष्टीत लहानू गुरुजींचा निरोप समारंभ आहे. लहानू गुरुजी म्हणजे ध्येयवादी शिक्षक, पण साधा माणूस. त्यांनी दुसरीत शिकविलेला चंद्रशेखर धर्माधिकारी हा त्यांचा लाडका विद्यार्थी आता न्यायमूर्ती झालेला आहे. न्यायमूर्ती पदाची शपथ घेतल्यावर ते आधी आपल्या देवतुल्य गुरुजींना पहिला नमस्कार करण्यासाठी आणि त्यांच्या सत्कारासाठी हजर झाले. ह्या आकस्मिक भेटीने गुरू आणि शिष्य दोघेही कृतार्थ झाले. कथेच्या शेवटी कबीरांचा तो प्रसिद्ध दोहा येतो :
'गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागों पाय
बलिहारी गुरु आपणें, गोविंद दियो बताय'
सुंदर हस्ताक्षर हा अनमोल दागिना मानला जातो. देसाई हायस्कूलमध्ये आज शालेय हस्तलिखितांना बक्षीसे दिली जात आहेत. उपेंद्र वैद्य हे प्रमुख पाहुणे आहेत. सगळी बक्षीसे देऊन झाल्यावर वैद्य यांनी आठवीतील सुभाषला सुंदर हस्ताक्षरासाठीचे बक्षीस दिले. त्या वेळी सुभाषला सुंदर हस्ताक्षराचे धडे देणारे साने सर आठवतात. त्यांनी बक्षीस दिलेल्या पेननेच सुभाषने हस्तलिखित सजवलेले असते. सुभाषच्या मनात साने सरांविषयीची कृतज्ञता दाटून येते. कबीरांच्या कुंभाराविषयीच्या प्रसिद्ध दोह्याने 'कुंभाराचा हात' ह्या कथेचा समारोप केला आहे.
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आजोळचा आनंद हे एके काळी समीकरणच बनून गेले होते. 'सहवास चंदनाचा' ह्या गोष्टीत लेखिकेने 'तो' काळ रंगवला आहे. कोकणातील आजोळी बारा नातवंडांची टीम जमली आहे. ते सगळे मिळून नवीन काही शिकत उन्हाळ्याची सुट्टी सत्कारणी लावतात. परिसाच्या सहवासात लोखंडाचे सोने होते, असे म्हणतात. निलेश हा मुलगा परदेशात शिकून, मोठा होऊन आलेला आहे. तो शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या आजोबांची गोष्ट सांगतो. आजोबांमुळे आपल्या आयुष्याचे सोने झाले, असे त्याला वाटत असते. 'लोखंडाचे होई सोने' ह्या कथेच्या शेवटी
'संगत कीजै साधु की, कभी न निष्फल होय' ह्या संगतीचे महत्त्व सांगणा-या दोह्याची उत्तम जोड दिली आहे.
कोणालाही कोणतीही मदत न करणारा श्रीमंत माणूस म्हणजे 'बिनसावलीचे झाड'. मारुती खेडेकर यांनी आयुष्यभर आपल्या मालकाची सेवा केली. नानाशेठच्या पश्चात त्यांचा मुलगा विजयशेठ कारभारी बनला. मारुतीने मुलीच्या लग्नासाठी विजयशेठला मदत मागितली, पण त्यांनी ती नाकारली. 'गरिबाचं मानाशी आणि अमीराचं दानाशी नाही तरी वाकडंच असतं' हे विधान ह्या कथेचा आत्मा आहे.
'बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर
पंथी को छाया नही, फल लागे अति दूर'
हा कबीरांचा दोहा आपल्या परिचयाचा आहेच. कबीरांच्या दोह्याची 'पंचमेल खिचडी' आणि कथेची मराठी भाषा यांचा सुंदर मिलाफ ह्या पुस्तकात पाहायला मिळतो.
'झुकलेल्या फांदीवरचे फळ' ही सरिता आणि शेफाली ह्या दोन मैत्रिणींची गोष्ट आहे. शेफाली कंटाळा करून बॅडमिंटन सोडून देते आणि सरिता निष्ठेने खेळत राष्ट्रीय स्तरावर विजेती ठरते. लेखिकेच्या मते सरिता हे झुकलेल्या फांदीवरचे गोमटे फळ आहे. कबीरांच्या दोह्याचा अर्थ सांगताना लेखिकेने लिहिले आहे : 'ज्ञान, मान आणि दान नम्र माणसाच्याच पदरात पडते'.
लहान थोरांना फुलझाडे आवडतातच. छोटी चैत्राली त्यापैकीच एक. छोट्या रोपट्याच्या कानात ती रोज सांगते, 'उद्या मला फूल दे. नाहीतर तुझी कट्टी करीन'.
चैत्रालीच्या आजीने तिला
'धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय' ह्या दोह्याचा दाखला देऊन सबुरीचा सल्ला दिला आहे.
'काट्यांना उत्तर फुलांनी' ही उमेश आणि समीर ह्या मित्रांची गोष्ट आहे. समीर साधाभोळा तर उमेश दांडगा दुंडगा. वाह्यात उमेशला परिस्थितीच धडा शिकवते आणि सुधारते. कथेच्या शेवटी लेखिकेने 'दुसरी व्यक्ती आपल्याशी कशीही वागली, तरी आपण त्याच्याशी चांगलेच वागले पाहिजे' हा संदेश दिला आहे.
चांगल्या माणसाच्या सहवासातून माणूस घडतो, अशा आशयाची 'लागे सुगंध अत्तराचा' ही अतिशय बोधप्रद गोष्ट आहे. घरी आलेल्या स्वामीजींच्या सहवासात मयूरेश घडतो. आरामात राम नाही, ही स्वामीजींची शिकवण. कथेच्या शेवटी
'कबीरा संगत साधु की, ज्यों गंधी की बास' हा दोहा चपखल बसला आहे.
ज्यांना मुले आवडतात, ते शिक्षक मुलांना आवडतात, हा शिक्षण क्षेत्रातला नियमच आहे. नववी अ च्या वर्गशिक्षिका गोखले बाई गंभीर आजारामुळे वर्षभराच्या रजेवर गेल्या आहेत. त्यांच्या जागेवर राक्षे सर आले आहेत. वेष बावळा परी अंतरी नाना कळा, असे आहेत राक्षे सर. विद्यार्थी गोखले बाईंना विसरू शकत नाहीत आणि राक्षे सरांना लवकर स्वीकारत नाहीत. सरांकडे प्रयत्नांचे धनुष्य आणि कष्टांचे बाण आहेत. ते गोड बोलून विद्यार्थ्यांची मने जिंकतात. त्यासाठी कबीरांनी सांगितलेला मंत्र राक्षे सरांनी अमलात आणला आहे. हा मंत्र प्रत्येक शिक्षकाने अवलंबिला पाहिजे.
संजीवनी बोकील यांची कथनशैली अतिशय ओघवती आहे. ह्या पुस्तकातील 'कथादशक' जसे रंजक आहे, तसेच बोधप्रद आहे. प्रत्येक कथेत लेखिकेची अनुभवसमृद्धता जाणवते. लेखिकेने हसतखेळत नवीन पिढीचा सांधा संतसाहित्याशी जोडला आहे. गोष्टी सांगत सांगत बालकुमार वाचकांना बोटाला धरून कबीरांच्या दोह्यांकडे नेले आहे. कबीरांच्या दोह्यांतील शैक्षणिक मूल्य आणि जीवनमूल्ये बालकुमार वाचकांच्या लक्षात आणून दिली आहेत. पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रस्तावना ह्या पुस्तकाला लाभली आहे. चित्रकार संतोष घोंगडे यांनी मुखपृष्ठावरची कबीरांची ध्यानमुद्रा आणि आतील जिवंत चित्रे रेखाटली आहेत. दिलीपराज प्रकाशनाने बहुरंगी छपाई करून पुस्तकाची निर्मिती अतिशय देखणी केली आहे.
'गोष्टींतून कबीर' (बालकथासंग्रह)
लेखिका : संजीवनी बोकील
मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे.
पृष्ठे ७२ किंमत रु. २३०
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा