नांदेड:(दि.२६ जुलै २०२४)
राज्यशास्त्र हा विषय भारताचे उत्कृष्ट नागरिक बनविण्यास सर्वतोपरी सहकार्य करीत असतो. सर्व क्षेत्रात राज्यशास्त्र हा विषय अपरिहार्यपणे येतच असतो. कायदा हा माणसाच्या जीवन जगण्याचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्याबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वीता संपादन करून प्रशासकीय पदाद्वारे योजना राबविणारे हात व्हावेत, असे आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलीत यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित इंडक्शन प्रोग्राममध्ये 'राज्यशास्त्रातील करिअर आणि भविष्यातील संधी' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या कल्पकतेतून इ.स.२०१९ पासून इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन केले जाते. संबंधित विषयाचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरच्या कोणत्या संधी आहेत, याचे ज्ञान होण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त सिद्ध होत आहे.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी, भारतीय संविधानाविषयी समग्र माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या विशेषतः राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मीडियामध्ये भरपूर संधी असते, कारण शक्यतो जास्तीत जास्त बातम्या या राजकीय क्षेत्राशी संबंधित असतात, असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय गव्हाणे यांनी केले तसेच आभार डॉ.वीरभद्र स्वामी यांनी मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, बंटी मोरे, जगन्नाथ महामुने, बालाजी देशमुख, जगदीश उमरीकर, गणेश विनकरे आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमास विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा