मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना २६ जून १८७३ साली झाली असून, या पोर्टला २६ जून २०२४ रोजी १५१ वर्ष पूर्ण झाली. गोदीमाता ही आपली अन्नदाता आहे. या उद्योगामुळे अनेकांचे संसार उभे राहिले. मुलांचे चांगले शिक्षण झाले. प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचं घर घेता आलं. या उद्योगांनी अनेक पिढ्यातील कामगारांना रोजगार दिला. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पूर्वी ४२ हजार कामगार होते तर आता फक्त ३ हजार कामगार शिल्लक राहिले आहेत, तर ३६ हजार पेन्शनर्स आहेत. आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील परिवार ८३ च्या ग्रुपतर्फे कर्जत येथील पुष्पक लॉर्ड संस्कृती या रिसॉर्टवर " १३ जुलै २०२४ रोजी मुंबई पोर्ट प्राधिकरण १५१ वर्ष "या नावाचा केक कापून मुंबई पोर्टचे १५१ वर्षे साजरे करण्यात आले. मुंबई पोर्टला १०० वर्ष पूर्ण झाली, तेव्हा ज्येष्ठ कामगार नेते व मुंबई पोर्टचे तत्कालीन कामगार विश्वस्त डॉ. शांती पटेल व कॉ. एस. आर. कुलकर्णी यांनी गोदी कामगारांसाठी " शताब्दी स्मारक निधी " या नावाने फंड निर्माण केला होता. या फंडातून सेवेत असणारे व निवृत्त झालेल्या गोदी कामगारांना व त्यांच्या पत्नीला चष्मे, शैक्षणिक कर्ज, संकटकाळी आर्थिक सहाय्य, अशा अनेक विविध कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मुंबई पोर्ट ट्रस्टला १२५ वर्षे पूर्ण झाली, तेव्हा सर्व कामगारांना टायटनचे घड्याळ देण्यात आले होते. आजही गोदी कामगार या घड्याळाची आठवण काढत आहेत. तर १५० वर्ष पूर्ण झाली म्हणून मुंबई पोर्टने कामगारांना खाऊ वाटप केले. १५० वर्षा निमित्त मुंबई पोर्टने गोदी कामगारांना आकर्षक भेटवस्तू द्यावी, अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर आणि ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार व बोर्ड मेंबर मुं कल्पना देसाई यांनी कामगार संघटनांच्या वतीने मुंबई पोर्ट प्रशासनाकडे केली आहे, असे स्पष्ट उद्गार युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांनी काढले.
मारुती विश्वासराव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे सांगितले की, कर्जत येथील पुष्पम लॉर्ड संस्कृती या रिसॉर्टची २२ एकर जागा असून, येथे थ्री स्टार हॉटेल देखील आहे. यामध्ये ४२ रूम आहेत तर ३६ बंगले आहेत. जेवण व नाश्ता रुचकर होता. बुफे पद्धतीने जेवणाची व नाश्ट्याची उत्तम व्यवस्था होती. जेवणात व नाष्ट्यामध्ये अनेक प्रकार होते. त्यामुळे परिवार ८३ च्या कुटुंबासहित असलेल्या सर्वांनीच पावसाळी पिकनिकचा चांगला आस्वाद घेतला. ही एक आठवणीत राहणारी पावसाळी पिकनिक झाली.
गोदी विभागातील सेवानिवृत्त शेड मॅनेजर व सभेचे अध्यक्ष नामदेव घोडके यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, गोदी मातेने तुम्हा आम्हाला सर्व काही दिले आहे. ते आपण विसरू शकत नाही. आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम करीत आहोत, ही एक चांगली कल्पना आहे. मुंबई पोर्टच्या पैशातून जेएनपीटीची उभारणी करण्यात आली, मात्र त्यामुळे आपले काम जेएनपीटीला गेले, आणि आता मुंबई पोर्टच्या १८०० एकर जागेवर केंद्र सरकारचा डोळा आहे. कामगार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे मुंबई पोर्टच्या सहकार्याने एलआयसीकडे असलेल्या पेन्शनच्या रकमेत चांगली भर पडली आहे. त्यामुळे आता गोदी कामगारांना शेवटच्या श्वासापर्यंत पेन्शन मिळत राहील.
याप्रसंगी सेवानिवृत्त शेड मॅनेजर व समाजसेवक प्रकाश परब, जे.पी. मुजावर, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे सेक्रेटरी संजय बु, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस.सी. एस.टी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी प्रदीप कांबळे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. गोदी विभागातील परिवार ८३ च्या पावसाळी पिकनिकसाठी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे सेवानिवृत्त असिस्टंट शेड मॅनेजर व परिवार ८३ ग्रुपचे प्रमुख शेखर बर्वे, प्रकाश परब, जोगेंद्र मुजावर, नामदेव घोडके, विनय शिखरे, शशिकांत सहाने, देविदास खरात, उमाकांत थळकर, शिवाजी सावंत, संजय बोबडी इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा