हर दर्द की दवा : पत्रकार संजीव कुळकर्णी डॉ.सुरेश सावंत, नांदेड

 

पत्रकार संजीव कुळकर्णी हे आज दि. १२ जुलै रोजी हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त हा लेख :

हर दर्द की दवा : पत्रकार संजीव कुळकर्णी

डॉ.सुरेश सावंत, नांदेड

मित्रवर्य पत्रकार संजीव कुळकर्णी यांची पहिली भेट झाली 1988-89 साली. त्यावेळी ते दै. ‘मराठवाडा’चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून नुकतेच नांदेडला आले होते. गोरठ्यातील सरंजामशाहीच्या कहराचा तो काळ होता. अन्याय-अत्याचारांनी परिसीमा गाठली होती, पण पीडितांचे हुंदके आणि उसासे गावाच्या वेशीबाहेर पडत नव्हते. पोलीस अन्याय-अत्याचारांची नोंद घेत नसत. वर्तमानपत्रे अन्यायाला वाचा फोडायला धजत नसत. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती होती. त्या काळात संजीव कुळकर्णी अन्य दोन पत्रकार मित्रांसह गोरठ्याला आले. त्यांनी गावकर्‍यांच्या मुलाखती घेऊन ‘मराठवाडा’ दैनिकात सरंजामशाहीच्या कारनाम्यांची मालिकाच लावली. 

‘गोरठा हे गाव महाराष्ट्रात आहे की बिहारमध्ये?’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्यामुळे आणि दै. ‘मराठवाडा’ मुळे दबलेले हुंदके आणि उसासे महाराष्ट्राच्या वेशीवर टांगले गेले. त्या काळी संजीव कुळकर्णी यांच्या वार्तापत्रांचे विधिमंडळात आणि आमदार निवासांत सामूहिक वाचन होत असे. त्यामुळे पोलिसांनाही हे प्रकरण गंभीरपणे घ्यावे लागले. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 42 वर्षांनी गोरठ्याला आणि परिसराला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे संजीव कुळकर्णी यांना आम्ही ह्या स्वातंत्र्याचे उद्गाते मानतो. आम्ही संजीव कुळकर्णी यांना गोरठ्याच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार मानतो. 

गोरठा प्रकरणात नव्यानेच नांदेडला आलेल्या आणि अजून व्यवस्थित स्थिरस्थावर न झालेल्या संजीव कुळकर्णी यांनी जी हिंमत दाखविली, त्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. लढाऊ संपादक अनंतराव भालेराव यांच्या तालमीत तयार झाल्यामुळेच त्यांना ते शक्य झाले होते. यानंतर आमच्या भेटीगाठी आणखी वाढल्या.

दुर्दैवाने 2002 मध्ये ‘मराठवाडा’ दैनिक बंद पडले. त्यानंतर संजीव कुळकर्णी यांनी ‘गांवकरी’ या दैनिकाचे काम सुरू केले. इकडे फारसा माहिती नसलेला ‘गांवकरी’ संजीव कुळकर्णी यांच्या शोधपत्रकारितेमुळे जिल्ह्यात वाचकप्रिय ठरला. ‘गांवकरी’नंतर संजीव कुळकर्णी यांनी ‘पुण्यनगरी’त पत्रकारिता केली.

सध्या ते ‘दै.पुढारी’चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहात आहेत. जोडीने ‘लोकसत्ते’चे वार्ताहर म्हणूनही ते काम पाहतात. ‘लोकसत्ते’चे मराठवाडा प्रदेशाचे पान केवळ संजीव यांच्या बातमीमुळे वाचावेसे वाटते. त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेल्या प्रासंगिक पुरवण्या अतिशय वाचनीय आणि संदर्भसमृद्ध असतात.

संजीव कुळकर्णी यांच्या बातमीदारीची एक खासियत आहे. ते रेडिमेड टेबल न्यूज कधीच छापत नाहीत. ते बातमीच्या मुळाशी जातात आणि बातमीमागची बातमी शोधून काढतात, खोदून काढतात. बातमीचे खोदकाम आणि बांधकाम ते फारच मन:पूर्वक करतात. जोपर्यंत बातमी मनासारखी उतरत नाही, तोवर ते बातमी प्रसिद्धीस देत नाहीत. 

बातमीचे ते पुनः पुन्हा पुनर्लेखन करतात. एखादा सिद्धहस्त सर्जनशील साहित्यिक आपल्या नवनिर्मितीवर जेवढी मेहनत घेतो, तितकी मेहनत कुळकर्णी आपल्या बातमीवर घेतात. त्यांचे लेखन अतिशय निर्दोष असते. एखादा शब्द अडला, तर नि:संकोचपणे फोन करणार. बातमीवर इतकी मेहनत घेणारा पत्रकार माझ्या पाहण्यात दुसरा नाही. संजीव कुळकर्णी यांची प्रत्येक बातमी हा परिपूर्ण वृत्तलेखनाचा उत्कृष्ट नमुना असतो. संजीवच्या टोकदार आणि गोळीबंद बातमीने लक्ष्याचा भेद झालाच म्हणून समजावे. वास्तविक आजचे वृत्तपत्र ही उद्याची रद्दी समजली जाते. बातमीचे लौकिक आयुष्य फार तर चोवीस तासांचे. पण संजीव कुळकर्णी यांची बातमी दीर्घ परिणाम साधणारी असते. 

इतर पत्रकारांची बातमी शीर्षकातच समजून जाते, पण संजीव कुळकर्णी यांची बातमी शीर्षकापासूनच वाचनीय बनत जाते. पिताश्री, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुळकर्णी यांचा साहित्यिक वारसा संजीव कुळकर्णी यांनी आपल्या वृत्तलेखनात अवलंबिला आहे. संजीव कुळकर्णी यांच्या बातमीच्या शीर्षकातच कमालीची उत्कंठावर्धकता असते. त्यांच्या बातमीत नाट्यही असते आणि काव्यही. संजीव कुळकर्णी हे मूळचे डोंगरकड्याचे. म्हणजे त्यांचा मूळ तालुका कळमनुरी.

जिसके कलम में नूर है, वह कलमनुरी!

त्यामुळे संजीव यांच्या कलममध्ये नूर आहे. त्यांच्या लेखणीला एक धार आहे.

मुळात संजीव कुळकर्णी यांच्या व्यक्‍तिमत्त्वात अभिजात रसिकता आहे. क्रिकेट आणि चित्रपट हे तर त्यांच्या आवडीचे प्रांत  आहेतच, शिवाय स्वातंत्र्योत्तर आणि समकालीन राजकारणातील अंतःप्रवाह हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ह्या संदर्भाने ते भरपूर वाचन करतात. त्यांना डॉ. सुधीर रसाळ, अनंत भालेराव,  फ. मुं. शिंदे, न्या. नरेंद्र चपळगावकर इ. अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांचा निकट सहवास लाभला आहे. त्यामुळे त्यांचा विद्याव्यासंग अद्ययावत आहे. त्यांच्यासमोर पत्रकारितेतील दिव्य अशा दीपस्तंभांचा आदर्श आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक बातमी संदर्भसमृद्ध असते. त्यांची बातमी वाचताना इतिहास साक्षात होऊन समोर उभा राहतो.

‘बातमी मुरवणे’ आणि ‘बातमी जिरवणे’ ह्या पत्रकारितेतील दोन अभिनव संकल्पना आहेत. संजीव कुळकर्णी आधी आलेली बातमी आपल्या मनात चांगली मुरवतात. त्यावर चिंतन-मंथन करतात आणि मगच कागदावर उतरवतात. ते बातमी कधीच जिरवत नाहीत. किंबहुना बातमी जिरू देत नाहीत. संजीव कुळकर्णी यांच्या पत्रकारितेचा संबंध फक्त पेन आणि कागदापुरता मर्यादित नसतो, तर तो थेट वाचकांच्या काळजाला भिडतो. बातमी लिहिण्यापूर्वी तिच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक संदर्भांचा ते नीट शोध घेतात. 

एखादा निष्णात फलंदाज जसा येणारा चेंडू पाहून तो कसा टोलवायचा, याचा अभ्यासपूर्वक अंदाज बांधतो, तसे संजीव कुळकर्णी समोरच्या बातमीसोबत कसे खेळायचे, ते आधी ठरवतात. मनाजोगी बातमी उतरली नाही, तर ते कितीही कागद फाडतील. त्या बाबतीत 'कंटाळा' हा शब्द त्यांना माहीतच नाही. म्हणून त्यांची प्रत्येक बातमी ही नवनिर्मिती असते. थोडक्यात काय, तर त्यांच्या बातमीचा पाया पक्का असतो. त्यावर आधारलेली त्यांची प्रत्येक बातमी खंबीर आणि गंभीर स्वरूपाची असते. तो एक महत्त्वपूर्ण दस्तावेज असतो.

संजीव यांनी फार कमी वयातच महाराष्ट्रातील पत्रकारांचे संघटन केले आणि ह्या संघशक्तीतून चालत आलेले अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. 

संजीव कुळकर्णी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसोबत उठतात-बसतात, खातात-पितात. पण ते बातमीच्या बाबतीत शत्रू आणि मित्र असा भेद करत नाहीत. पत्रकार संजीव कुळकर्णी यांना एखाद्याची बातमी झाकून ठेवावी असा कुणी मित्र नाही किंवा मुद्दाम एखाद्याच्या मागे हात धुऊन लागावे, असा कुणी शत्रूही नाही. त्यांनी समतोल पत्रकारितेचा विवेक सांभाळलेला आहे. जिल्ह्यात असा एकही अधिकारी किंवा पदाधिकारी नसेल, की ज्याला संजीव कुळकर्णी यांच्या लेखणीचा एखादा फटका बसला नसेल. म्हणून आम्ही त्यांना पत्रकारितेतील 'वार'करी संबोधतो. तथापि ते दीर्घद्वेषी नाहीत. जे काही झोडपायचे ते केवळ त्या बातमीपुरतेच! विनाकारण कोणाविषयी डूख धरून ते निरंतर गरळ ओकत राहात नाहीत.

संजीव कुळकर्णी यांचे विविध राजकीय नेत्यांशी मैत्रीचे संबंध असले, तरी त्यांनी आपली लेखणी कुठेच गहाण ठेवलेली नाही. ती कुणाची मिंधी नाही. तिचा बाणा सदासर्वदा 'स्व' तंत्र आहे. वस्तुनिष्ठता हा त्यांच्या लेखणीचा स्थायीभाव आहे.

चांगल्याला चांगले म्हणण्यासाठी एक प्रकारची दानत असावी लागते. मनाचा उमदेपणा असावा लागतो. ती दानत, तो उमदेपणा संजीव कुळकर्णी यांच्या ठायी आहे. गुणग्राहकता हा ह्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक लोभस गुणविशेष आहे. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्याही हे एक ठाम व्यक्तिमत्त्व आहे. वाईटाच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याला खडसावण्यासाठी जी हिंमत लागते, ती संजीव कुळकर्णी यांच्या व्यक्‍तिमत्त्वात आहे. 

संजीव यांच्या लेखणीचा धाक नांदेडच्या पत्रकारितेत अजून टिकून आहे. संजीव कुळकर्णी यांच्या लेखणीत शाईऐवजी बारूद ठासून भरलेले आहे. त्यामुळे त्यांच्या बातमीचा स्फोट होतोच होतो. काही बातम्यांमुळे भूकंपासारखे धक्के जाणवतात. 'काळ'कर्ते शि. म. परांजपे आणि 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांनी दाखविलेल्या वाटेचे ते वाटसरू आहेत. सत्तांधांचा कर्दन'काळ' बनून मदांधांना 'दर्पण' दाखवताना ते अजिबात घाबरत नाहीत. एखाद्या घटनेबद्दलची संजीव कुळकर्णी यांची प्रतिक्रिया काय आहे, याची उत्सुकता चोखंदळ वाचकांना नेहमीच असते. त्यांची लेखनशैली जितकी पल्लेदार आहे, तितकीच धारदार आहे. कमीत कमी शब्दांत अधिकाधिक आशय कवेत घेण्याची क्षमता हा ह्या लेखनशैलीचा आणखी एक विशेष आहे. 

राजकीय सत्तांतरात ही लेखणी आपला खारीचा वाटा उचलत असते. आमच्यासारख्या मित्रांना असे वाटते, की हा माणूस एखाद्या मोठ्या दैनिकाचा संपादक असायला पाहिजे होता. या माणसाने त्या दैनिकाचे सोने केले असते. जसे एखाद्या माणसाने हातात माती धरली, तरी तिचे सोने होते, असे म्हणतात. तद्वतच संजीव कुळकर्णी यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक दैनिकाचे सोने केले आहे.

संजीव कुळकर्णी यांनी अभंग पुस्तकालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात वाचनसंस्कृती रुजविली आहे आणि अभंग प्रकाशनाच्या माध्यमातून लेखनसंस्कृती विकसित केली आहे. त्यांनी मोजकीच पण दर्जेदार पुस्तके मोठ्या जाणकारीने प्रकाशित केली आहेत. डॉ. अच्युत बन यांच्या एकसष्टीचा समारंभ आणि त्या निमित्ताने प्रकाशित 'आनंदयात्री' सन्मानग्रंथ हे संजीव कुळकर्णी यांच्या संयोजन - कौशल्याचे दाखले आहेत. 

संजीव कुळकर्णी यांनी आपले वडील प्रा. तु. शं. कुळकर्णी यांच्या साहित्याचा 'निवडक तुशं' हा ग्रंथ प्रकाशित केला, तसेच अनंत भालेराव यांच्या समग्र लेखनाचे दोन वैभवशाली खंड संपादित करून प्रकाशित केले आहेत. आधुनिक धन्वंतरी डॉ. भागवत यांचा देखणा असा स्मृतिग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या एका पुस्तकाला राज्यपुरस्कारही मिळाला आहे. 

ते कधीही कोण्या राजकारण्याचा भाट झालेले नाहीत, पण रचनात्मक राजकारण्याची ते कदर करतात. आदर राखतात. 

गोपीनाथ मुंडे यांच्यावर त्यांनी ‘संघर्षयात्री’ हा ग्रंथ संपादित केला आहे. अकाली एक्झिट झालेले युवा खासदार संसदरत्न राजीव सातव यांच्यावरही संग्राह्य स्मृतिग्रंथ संपादित केला आहे. न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्यावरील एक ग्रंथ पूर्णत्वास आणला आहे. जे करायचे ते अस्सल आणि नंबरवन असा त्यांचा आग्रह असतो. ह्या अर्थाने ते मिस्टर परफेक्शनिस्ट आहेत. त्यांचा अभंग ग्रंथोत्सव ही नांदेडकरांसाठी अपूर्व अशी पर्वणी असते. अभंगतर्फे त्यांनी छगन भुजबळ, क्रिकेट समालोचक सुशील दोशी यांच्या प्रकट मुलाखतींचे आयोजन केले होते. त्यांनी आयोजित केलेल्या साहित्य संस्कृतीविषयक विविध समारंभांतून आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले आहे. 

पत्रकार म्हणून संजीव कुळकर्णी जसे ग्रेट आहेत, तसे माणूस म्हणून त्याहून ग्रेट आहेत. स्नेहीजनांच्या सुख-दुःखात धावून जाण्याचा धर्म ते निष्ठेने पाळतात. वरकरणी फणसासारखे दिसणारे हे व्यक्तिमत्त्व दीर्घ सहवासानंतरच उलगडत जाते. अनेक मित्रांना ते अपील कोर्टासारखे वाटतात. अनेकांना संजीव कुळकर्णी हे आपले मित्र आहेत, याचा आधार वाटतो, धीर वाटतो. अनेकांनी अनेकदा त्यांच्या मैत्रीच्या उत्कटतेचा आश्वासक अनुभव घेतला आहे. कुळकर्णी यांनी अनेकांना आधार देऊन आयुष्यात उभे केले आहे. त्यामुळेच त्यांचा लोकसंग्रह फार दांडगा आहे. अडचणीतला माणूस एखाद्या राजकीय नेत्याकडे जाण्याआधी संजीव कुळकर्णी यांच्याकडे धावत जातो, कारण त्यांच्याकडून तत्काळ मदत मिळण्याची खातरी असते. 

आमच्या एका पत्रकार मित्राने खूप वर्षांपूर्वी एका खाजगी फायनान्सकडून कर्ज काढून मोटारसायकल विकत घेतली होती. कर्जाचा हप्‍ता थकल्यामुळे फायनान्सचे लोक मित्राची मोटारसायकल घेऊन जात होते. ते पाहताच संजीव कुळकर्णी यांनी वसुली अधिकार्‍यांना तत्काळ आपला धनादेश देऊन गाडीचे कर्ज चुकते केले. ‘पैसे कधी परत मिळतील,’ याची एका शब्दानेही चौकशी केली नाही. असा दिलदार मित्र लाभणे हा भाग्ययोग असतो. संजीव कुळकर्णी यांच्या अशा कृतज्ञ आणि कृतार्थ मित्रांची यादी फार मोठी आहे. त्यांचा दरबार एखाद्या राजकीय नेत्यासारखा सदैव गजबजलेला असतो.  आपल्या मदतनीसावरही ते तितकंच प्रेम करतात, जितकं मित्रांवर किंवा नातेवाईकांवर.

संजीव कुळकर्णी यांची साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि कला, क्रीडाविषयक जाण फार प्रगल्भ आहे. त्यांचे आकलन फारच स्वच्छ आहे! ते जसे आपल्या बातमीमागचा दृष्टिकोन समजावून देतात, तसेच ते समोरच्या व्यक्तीला आस्थेने समजून घेतात. ते नित्य प्रेमाने फोन करून मित्रमंडळींची आस्थेने खबरबात घेत असतात. त्यामुळे त्यांचे नेटवर्क जबरदस्त आहे. त्यांच्यासोबत काव्यशास्त्र विनोदाने रसरसलेली गप्पांची मैफल जमवणे हा एक आनंददायी योग असतो. त्यांची संवेदनशीलता, सौंदर्यदृष्टी आणि मूल्यविवेक वाखाणण्यासारखा आहे. त्यांची स्मरणशक्‍ती अतिशय तल्लख आहे. त्यांच्या पोतडीत किस्से, कहाण्या आणि शेरोशायरीची आणि विडंबनाची भरमार असते. 

संपर्कात आलेले साहित्यिक, राजकारणी, अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार यांच्या विविध लकबी आणि रंजक किस्से संजीवच्या जिभेवर खेळतात. गप्पांचा फड रंगवताना ह्या लकबी आणि अनेक खुमासदार किस्से हळूहळू बाहेर निघतात. त्यातही अभिजातता असते. निंदाव्यंजकता मुळीच नसते. ‘मोपाटा’, ‘सुसाट’ यासारख्या शब्दांनी त्यांचा शब्दकोश समृद्ध झाला आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दयोजनेत मार्मिकता आणि अर्थपूर्णता असते. कधीकधी असेही वाटते, की ह्या शक्तिमान माणसाची सगळी सर्जनशीलता बातमीदारीत वाया गेली. त्यांनी स्वतंत्र लेखन केले असते, तर कदाचित त्यांनी त्यात आपली नाममुद्रा उमटवली असती! पण आपल्या अशा वाटण्याला तसा काही अर्थ नसतो, कारण पत्रकारिता हा त्यांनी जाणीवपूर्वक निवडलेला मार्ग आहे आणि त्या मार्गावर त्यांनी आपल्या पाऊलखुणा निश्चितच उमटवल्या आहेत. 

असा जिंदादिल माणूस आमचा मित्र आहे, हीच आमची श्रीमंती आहे. संजीव आणि सौ. नीमावहिनी ही जोडी ‘मेड फॉर ईच ऑदर’ अशी आहे. नीमाताई त्यांना खंबीर साथ देत आल्या आहेत. आज संजीव कुळकर्णी आपला ५९वा वाढदिवस साजरा करताना षष्ट्यब्दीत प्रवेश करत आहेत. त्यानिमित्ताने ह्या आरकाट मित्राला खूप खूप शुभेच्छा! त्यांची षष्ट्यब्दीपूर्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा भव्य स्वरूपात साजरी व्हावी, असे आम्हाला मनापासून वाटते. संजीव कुळकर्णी हे तसे अमर्याद वागणारे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांना निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे. त्यांच्या लेखणीला आणखी धार यावी, ही शुभकामना!


डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

टिप्पण्या