डॉ. सुरेश सावंत हे मराठी बालसाहित्यातील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी दर्जेदार बालकथा आणि उत्तमोत्तम बालकवितांचे लेखन करून मराठी बालसाहित्यात मौलिक भर घातली आहे. डॉ. सावंत यांनी त्यांच्या साहित्यातून बालवाचकांचे मनोरंजन, प्रबोधन आणि जिज्ञासातृप्तीबरोबरच त्यांच्या जीवनात निखळ आनंद पेरण्याचे अनमोल कार्य अविरतपणे आणि अखंडपणे केलेले आहे.
'रंग लागले नाचायला' हा त्यांचा इंद्रधनुष्यी, रंगीबेरंगी आणि बालभावविश्वाशी एकरूप झालेला आगळावेगळा असा बालकवितासंग्रह आहे.
'रंग लागले नाचायला' ह्या शीर्षकाची कविता ही समतेचा, एकतेचा आणि समृद्धीचा संदेश देणारी एक अप्रतिम कविता आहे. प्रत्येक रंगाची आपले वेगळेपण व मोठेपण सांगण्याची, श्रेष्ठत्व अधोरेखित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. पावसाने त्यांना दिलेला एकोप्याने राहण्याचा सल्ला बालकुमारांवर एकात्मतेचा संस्कार कोरणारा आहे. एकीमध्ये ताकद असते. एकीचे बळ सामर्थ्यवान असते. एकीमुळे मोठमोठी कार्ये सिद्धीस जातात. एकीमुळेच शाश्वत आनंद मिळतो.
रंगांचे भांडण मिटवताना पावसाने घेतलेली सामोपचाराची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. सातही रंगांना प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने राहण्याचा दिलेला सल्ला लाख मोलाचा आहे. मिटलेला वाद आणि फुललेले इंद्रधनुष्य रंगांच्या जीवनात आनंदाची उधळण तर करतेच, शिवाय वाचकालाही सुखावून जाते.
'पुन्हा एकदा क्षितिजावर
इंद्रधनुष्य फुलून आले
हातामधे हात मिसळून
सातही रंग नाचू लागले'.
कवितेतून जीवनोपयोगी उपदेश केला गेला पाहिजे, हे साहित्याचे प्रयोजन येथे सार्थ ठरले आहे.
चिमुकल्यांचे बालपण खेळ, भटकंती आणि दंगामस्ती करण्याबरोबरच वाचन- लेखनात रंगून जात असते. मुले सुट्टीत निसर्गभ्रमंती करतात. जंगलात फिरायला जातात. प्राणी आणि पक्ष्यांचे निरीक्षण करतात. सुट्टीनंतर शाळा सुरू झाली, की पुन्हा प्रार्थना, परिपाठ आणि अभ्यासात ते रमून जातात. बाळगोपाळांच्या या दिनक्रमाचा काव्यमय परिचय ह्या कवितासंग्रहात होतो.
बहुरूपी निसर्ग हा बच्चेकंपनीचा सखासोबती आहे, याचे प्रत्यंतर यातील अनेक कविता वाचताना येते. लाजाळू, निसर्गरक्षण करू, काटेसावर, बाभूळमाया, धबधबा, फुलचुखी चिमणी या कवितांतून याचा आपल्याला अनुभव येतो.
हात लावल्याबरोबर किंवा स्पर्श झाल्याबरोबर पाने मिटून घेणारे लाजाळूचे रोपटे हा बाळगोपाळांच्या जिज्ञासेचा व कुतूहलाचा विषय असतो.
'लाजाळूला शोभे नाव लाजवंती
स्पर्श संवेदना ही तयाची श्रीमंती'.
कुणी लाजाळूला चिमुकली सई म्हणते, तर कुणी छुईमुई म्हणते, हे नवेच ज्ञान इथे बालवाचकांना होते. निसर्ग हाच आपला दाता आहे, त्राता आहे. त्याचे रक्षण करण्याबरोबरच जलाशयांची स्वच्छता राखण्याचेही आवाहन कवीने केले आहे. आपली सृष्टी जैवविविधतेने नटली आहे. ह्या निसर्गात अनेक गुणांनी व अंगभूत वैशिष्ट्यांनी नटलेली वनसंपदा आहे. त्यांना अचूक शब्दांत पकडून कवितेत गुंफण्याचे कौशल्य हे डॉ. सावंत यांच्या बालकवितेचे ठळक असे वेगळेपण आहे.
'राजस लोभस काटेसावर
नखशिखांत काटे ल्याली
पाने सगळी फेकून देऊन
शाल्मली ही निष्पर्ण झाली'.
ही कविता वाचताना काटेसावरीचे झाड आपल्या गुणवैशिष्ट्यांसह वाचकांच्या नजरेसमोर साक्षात उभे राहते. हे कवीच्या शब्दांचे सामर्थ्य आहे. बालकांच्या भाषेत त्यांना परिसराची ओळख करून देण्यात ह्या कवितेचे यश सामावलेले आहे. 'चिंचेचा चिगोर' ही कविता वाचताना चिंचेची बहुउपयोगिता लक्षात येते.
झाडझाडोरा हे पक्ष्यांचे आश्रयस्थान असते. काही पक्षी घरटी बांधून तर काही पक्षी झाडांच्या ढोलीत आश्रयाला असतात. ह्या कवितेत कवीने पशुपक्ष्यांना विशेष स्थान दिले आहे. सुतारपक्षी, साळुंकी, कांगारू, हत्ती, वानरे, माकडे, पांडा ही बाळगोपाळांसाठी आकर्षणाची केंद्रं असतात. ती ह्या कवितेत आकर्षक रंगरूपासह अवतरली आहेत. त्यांना काव्यरूप देताना कवीने अभ्यस्त शब्दांचा चपखल वापर केला आहे.
'ठक् ठक् ठक् खट् खट् खट्
सुतारपक्ष्याची चाले कटकट'.
ही कविता वाचता- वाचताच मुखोद्गत होऊन जाते. मुलांना ती ताल धरायला, ठेका धरायला लावते. आनंदाची कारंजी फुलवते.
फ्लेमिंगो हा परदेशी पाहुणा आहे. 'फ्लेमिंगोंची शाळा' ही कविता वाचकांना ज्ञान आणि माहिती पुरविण्याचे काम करते. 'भारद्वाज पक्षी' ह्या कवितेतून कुंभार कावळा आपल्या ओळखीचा होतो. 'कांगारूदादा' ह्या कवितेतून ऑस्ट्रेलियन पाहुण्याची ओळख होते. रानटी हत्ती गावात शिरल्यानंतर गावात उडालेला गोंधळ आणि वनविभागाची तारांबळ पाहायला मिळते.
'रानटी हत्तीने धुमाकूळ घातला
हत्तीचा हल्ला जिवावर बेतला.
वनविभागाचे पथक धावत आले
हत्तीला जंगलात घेऊन गेले'.
ह्या कवितेत कवीने हत्तीच्या खोड्यांचे वर्णन अतिशय चित्रदर्शी शब्दांत केले आहे.
वानरे आणि माकडे यांच्या लीला, सर्कशीतील प्राण्यांच्या करामती, चिनी ड्रॅगनची भयावहता याबरोबरच डोंगरकपारींतून उड्या मारत धावणारा धबधबा, काटेरी असूनही सावलीसह वन्यजीवांचा आधार असलेल्या बाभळीची 'बाभूळमाया' कवीने सुंदर शब्दांत गुंफली आहे.
एकीकडे चार भिंतींतील शाळा आणि दुसरीकडे बिनभिंतीची निसर्गाची शाळा. ह्या दोन्ही शाळा तितक्याच महत्त्वाच्या. आपल्या शाळेची सुरुवात परिपाठाने होते. इथे विद्यार्थी सामूहिक प्रार्थना म्हणतात. प्रार्थनेप्रमाणेच आपण आचरण करावे, ही कवीची अपेक्षा आहे.
'प्रार्थना' ह्या कवितेत कवीने बालकाच्या भूमिकेत शिरून परमेश्वराकडे ज्ञानदेवांसारखे पसायदान मागितले आहे :
'माझिया मनाची भूमी
सर्वदा सुपीक असावी
प्रज्ञा आणि प्रतिभेची
आजन्म संगत लाभावी'.
बालभावविश्वात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व असते. खेळांत स्पर्धा असते, बक्षिसांची आस असते, प्रसंगी जिंकण्याची ईर्षाही असते. याचे लडिवाळ वर्णन 'इटुकली पिटुकली' ह्या कवितेत आले आहे.
'उन्हाळ्यातले ऊन वेड्यासारखे वागते
दररोज खायला आईसक्रीमच मागते'.
ह्या कवितेत उन्हाळ्यातल्या उन्हावर बालकांच्या हट्टीपणाचा आरोप केला आहे.
मुलांचा एकटेपणा दूर करण्यासाठी दैनंदिनी लिहिण्याची सवय लावण्याची आवश्यकता 'रोजनिशी' ह्या कवितेत सांगितली आहे. 'पुस्तकपूर' ह्या कवितेत घरातील आनंदाच्या गावाचे बहारदार वर्णन आले आहे. पुस्तक हा आपला सखा - सोबती असून आनंदाचे सप्तसूर आळवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते.
मज्जाच मज्जा, शांतिदूत पांडा, साळुंकी ग मैनाबाई, चांद्रयान तीन, आवड हरवण्याची, थापाडे आणि बडबडे ह्या कविताही वाचकांना वेगळ्या विश्वाची सफर घडवतात.
हल्ली, डॉ. सुरेश सावंत आणि मराठी बालकविता हे एक समीकरणच बनले आहे. आपल्या १४ बालकविता- संग्रहांमुळे डॉ. सावंत यांचे प्रयोगशील बालकवितेशी अभेद्य नाते जुळले आहे. नितळ, नेमक्या आणि सुगम शब्दांची निवड, नित्यनूतन विषय, ज्ञान आणि माहिती रंजकतेने देण्याची हातोटी, ओघवत्या कवितांतून साहित्यसंस्कार आणि मूल्यसंस्कार करण्याची तळमळ हा कवीचा स्थायीभाव आहे. त्यांची लेखणी सातत्याने नवनवे विषय शोधून ते कवितेत बांधण्यासाठी नेहमीच आसुसलेली असते. ह्या कवितेची भाषा आकलनसुलभ तर आहेच, शिवाय बालमनाला मोहिनी घालणारी आहे. लवचीक शब्दकळा, ओघवती रचना आणि नादमाधुर्याबरोबरच अर्थसौंदर्याने नटलेली ही कविता म्हणजे आधुनिक बालकवितेचे वैभव आहे. देखणे मुखपृष्ठ आणि आतील सजावट शीतल शहाणे यांनी केली आहे. विविधतेने नटलेला हा आकर्षक असा कवितासंग्रह दिलीपराज प्रकाशनाने संपूर्ण रंगीत स्वरूपात प्रकाशित केला आहे.
'रंग लागले नाचायला' (बालकवितासंग्रह)
कवी : डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ व सजावट : शीतल शहाणे
पृष्ठे ६४ किंमत रु. १८०
addComments
टिप्पणी पोस्ट करा