फारूक एस. काझी हे बालकुमारांचे आवडते असे प्रयोगशील लेखक आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांना बालमानसाची चांगली जाण आहे. आजवर त्यांची मित्र, प्रिय अब्बू, तू माझी चुटकी आहेस, चित्र आणि इतर कथा, शिंजीर दिवसभर का बरं खात राहतो, मी जेव्हा मोठी होईन तेव्हा, आनंद, चुटकीचं जग, ए हाड नावाचा कुत्रा, जादूई दरवाजे आणि शहाण्या बाबाची कहाणी ही ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
'अब्बूंचे मोदक' हा आपला नवीन बालकथासंग्रह घेऊन ते वाचकांच्या भेटीला आले आहेत. ह्या पुस्तकात वाचनीय अशा सात गोष्टी आहेत. फारूक काझी यांच्या गोष्टीत अल्फाज आणि गझल ही पात्रं सामान्यतः असतातच. आपल्या भोवतालच्या कोणत्याही घरात ते असतात. हे छोटे भाऊ-बहीण मोठे कल्पक आणि क्रियाशील आहेत. 'अब्बूंचे मोदक' ह्या पहिल्याच गोष्टीतही ते आहेत. अल्फाजला घरी मोदक बनवून खावेसे वाटतात. अल्फाजची इच्छा पूर्ण करण्यासाठी अब्बू कामाला लागतात. खरं तर उकडीचे मोदक बनविणे हे अवघड काम. पण अब्बू ते आव्हान स्वीकारतात. अल्फाज आणि गझल त्यांना जमेल तशी मदत करतात. पहिल्या मोदकाची चव बघून अभिप्राय देतात.
'फसलेले मोदक अब्बूंकडे बघून हसत होते' ह्या वाक्यातून मोदकांची चव वाचकांना समजते.
'ओढ' ही एक आगळीवेगळी गोष्ट आहे. ह्या कथेत, एका कलादालनात लाकडी कलाकृतींचे प्रदर्शन भरले आहे. लोक भान हरपून ते प्रदर्शन पाहत आहेत, कारण सर्व कलाकृती अप्रतिम आहेत. अब्बू आपल्या चार वर्षांच्या अर्शला प्रदर्शन पाहायला घेऊन जातात. अर्श आपल्या अब्बूचा डोळा चुकवून दुसर्या दालनात गेला आणि तेथील एका लाकडी मूर्तीला त्याने आई समजून मिठी मारली. त्या कलाकृती विक्रीसाठी नव्हत्या, पण त्या कलाकाराने ती मूर्ती अर्शला मोफत देऊन टाकली. अर्शला मूर्तीच्या रूपात आपली दिवंगत आई सापडली होती. त्या कलाकाराला अर्शच्या अम्मीच्या रूपात आपली दिवंगत मुलगी सापडली होती. लेखकाने ह्या कथेत कलाकाराची सौंदर्यदृष्टी आणि अर्शची संवेदनशीलता छान टिपली आहे! ओढ हे शीर्षक अतिशय अन्वर्थक आहे.
जेव्हा माणूस एखाद्या निर्जीव वस्तूशी मनाने एकरूप होतो, तेव्हा त्याला त्यात जिवंतपणाचा अनुभव येत असतो. 'कोण होता तो?' ह्या कथेतली पाचवीत शिकणारी काव्या ही मुलगी अशीच पुस्तकाशी एकरूप झाली आहे. त्या पुस्तकाचे एक पान फाटल्यामुळे ती कमालीची अस्वस्थ आहे. जेव्हा तिला ते हरवलेले पान सापडते, तेव्हा तिला खूप आनंद होतो. तिला कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येतो. 'कोण होता तो?' तर तो होता फाटलेल्या पानाचा आत्मा. हीच तर आहे, पुस्तकाच्या जिवंतपणाची खूण! फक्त ती ओळखता आली पाहिजे. ही कथा अतिशय उत्कंठावर्धक आहे.
'चार पानं' हीसुद्धा अशाच एका संवेदनशील मुलीची गोष्ट आहे. कविता तिचं नाव. तिच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तिचे डोळे भरून सांडत होते. तिचा जीव चातक झाला होता. ती आपलं दु:ख आपल्या दैनंदिनीत मांडते. ती केवळ दैनंदिनी लिहीत नव्हती, तर काळजाची ओल कागदावर उतरवली होती पोरीने. अशा शब्दांत लेखकाने कविताच्या भावना वाचकांपर्यंत अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने पोहोचविल्या आहेत.
'चार मुंगूस पिल्ली' ही एक अद्भुत रोमांचकारी प्राणिकथा आहे. ह्या कथेत एक मुंगसांचे कुटुंब आहे, कबिला आहे. कोडाली मुंगशीण ही ह्या कुटुंबाची प्रमुख आहे. मुंगसांची ही पिलं अतिशय अवखळ आणि धाडसी आहेत. ते आईवडलांपासून दूर जाऊन सापाशी पंगा घेतात. सगळे मुंगूस मिळून त्या नागाला लोळवतात. सापाची आणि मुंगसांची ही लढाई पाहताना बालकुमार वाचकांना मज्जा येते. मुंगशीण आपल्या पिलांना एक धडा देते, 'जिवंत राहायचं, तर लढावंच लागेल. हा निसर्गाचा नियम आहे'.
मुंगशीणीच्या माध्यमातून लेखकाने बालकुमार वाचकांनाच जणू हा संदेश दिला आहे.
'टिफिन' ह्या कथेत गरिबीने गांजलेला एक मुलगा आहे. त्याची गरीब आई त्याला शहाणपण शिकवते. कथेच्या शेवटी नायक म्हणतो, 'टिफिन नाही, शिदोरीच होती ती'.
प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ वाढविणारी ही कथा उमेद देऊन जाते.
'शिक्षा झालेल्या दोन मैत्रिणीं'ची गोष्टही मोठी मजेशीर आहे. एकीचे नाव कांचन आणि दुसरीचे नाव रुबिना. रुबिनाला अवांतर पुस्तके वाचण्याची भारी आवड. उलट कांचनला पुस्तके वाचण्याचा भयंकर कंटाळा. त्या शहरात सुंदर बाग होती आणि वाटेल ती पुस्तके वाचण्याची सोय होती. न वाचणा-यांना शिक्षा केली जात असे. त्यामुळे सगळे लोक पुस्तके वाचत. कांचन वाचत नसल्यामुळे तिला शहराच्या बाहेर एका मोठ्या इमारतीत ठेवले होते. तिला पुस्तके वाचण्याची शिक्षा दिली होती. तिथे दुसरी मुलगी होती, रुबिना. तिने इतकी पुस्तके वाचली होती, की तिला पुस्तके न वाचण्याची शिक्षा दिली होती. रुबिना कांचनला पुस्तके वाचून दाखवते. कांचनला वाचनाची गोडी लागते आणि ती स्वतःच वाचायला लागते. न वाचणारी कांचन वाचती झाली आणि वाचनाची आवड असलेली रुबिना लेखिका झाली. ही आहे पुस्तकांची जादू!
फारूक काझी यांची लेखनशैली अतिशय ओघवती आहे. या कथांतील पात्रांचे संवाद उर्दूमिश्रित हिंदीतून होतात. सौंफ, तारीफ यांसारखे हिंदी शब्द भाषेची लज्जत वाढवतात. घटना प्रसंगांचे चित्रदर्शी वर्णन करून लेखकाने छान वातावरणनिर्मिती केली आहे! ह्या सगळ्या कष्टकरी वर्गातील मुलामुलींच्या गोष्टी आहेत. ह्या कथांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच काही एक विचार, काही एक संस्कार बालकुमार वाचकांपर्यंत पोहोचतो. सातही कथांचे विषय वेगवेगळे असून बालवाचकांच्या काळजाला हात घालण्याची क्षमता ह्या कथांमध्ये आहे. पद्माकर यांचे मुखपृष्ठ आणि आतील रेखाटने अतिशय बोलकी आहेत. राजहंस प्रकाशनाने पुस्तकाची निर्मिती कृष्णधवल केली असली तरी पुस्तकाची वाचनीयता अधिक महत्त्वाची आहे.
'अब्बूंचे मोदक' (बालकथासंग्रह)
लेखक : फारूक एस. काझी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ : पद्माकर
पृष्ठे ५५ किंमत रु. ८०
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा