'कासरा' : कृषिसंस्कृतीचं भेदक आत्मकथन डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ऐश्वर्य पाटेकर हे 'जू' ह्या दाहक आत्मकथनामुळे मराठी साहित्यविश्वाला सुपरिचित झालेले तरुण लेखक आहेत, कवी आहेत. त्यांचा 'भुईशास्त्र'नंतरचा 'कासरा' हा दुसरा कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. कवीची नाळ शेतीमातीशी आणि गावखेड्याशी घट्ट बांधलेली आहे. ऐश्वर्य पाटेकर यांची कविता जगण्यातून उगवलेली असल्यामुळे ती जगण्याशी समरस झालेली आहे, हे 'भुईशास्त्र'ने यापूर्वीच सिद्ध केले आहे.

'वर्तमानाला वाळवी लागलीय

दूषित माणसांचं बियाणं फोफावतय एरंडासारखं'

ही खंत कवीला अस्वस्थ करते आहे.

'म्हणून सगुण माणसांचं बियाणं

या सर्वांतून मला वाचवत न्यायचं आहे'

ही कवीची केवळ काव्यनिष्ठा नव्हे, तर जीवननिष्ठा आहे. कवीची चिरंतन आशा आता केवळ कवितेच्या ठायी एकवटली आहे. 

'कारण नष्ट होत जाणा-या शेवटच्या माणसाला आता

कविताच वाचवणार आहे'

हा कवीचा विश्वास कौतुकास्पद आहे.

'मी माझ्यात अख्खं गाव घेऊन फिरतोय'

ही कवीची खरीखुरी ओळख आहे. कवी गावखेड्याशी आणि शेतीमातीशी एकरूप झाला आहे, हेच त्यातून ध्वनित होते. अशा वेळी कवीला 'भाकरीसाठी पायपीट करताना तुडवलेली बारा गावची माती' आठवते. ही माती कवीच्या श्वासात आणि ध्यासात रुतून बसलेली आहे. 

कवीला 'गायीबैलांच्या गोठ्यातला शेणामुताचा वास' आठवतो. ही स्मरणसाखळी बरीच मोठी आहे. 

पिरसायबाच्या जत्रेसाठी आईने तळहातावर खर्ची म्हणून ठेवलेला एक रुपयाचा चंद्र कवीला आठवतो आहे. 

आपल्याला तोडले किंवा चिरले, तरी हेच दिसेल असे कवीला वाटते. कवीच्या डोळ्यांत ती सगळी आठवणींची जत्रा साक्षात उभी राहते.

आई रात्री झोपल्यावर तिला पांघरूण घालताना कवी तिच्या डोळ्यांत हुडकत असतो कलंडलेला गाव.

इतका गाव कवीच्या ध्यानी मनी स्वप्नी रुतून बसलेला आहे.

गाव आठवताच कवीला गावाकडच्या निंदणा-या, सोंगणा-या कष्टकरी 'बाया' आठवतात. त्या बाया म्हणजे 'मातीच्या लेकी' आहेत. त्या सगळ्या मातीच्या लेकींमधे कवीला आपली कष्टाळू आई दिसू लागते.

ह्या 'मातीच्या लेकी

चित्यासारख्या धावतात 

धामिणीसारख्या गरगरतात

सळसळतात नागिणीसारख्या

वत्सलतात गायीसारख्या' 

'त्यांच्या दु:खाला कोण निंदणार?

कोण सोंगणार दु:खाचं भरघोस वाढलेलं तण?

कोण उतरवून घेईल त्यांच्या पाटीतलं ऊन?'

असे अनेकानेक प्रश्न कवीला अस्वस्थ करतात.

कवी आईसारखी सगळी कामं करतो, पण

'फक्त मला आईसारखी

माझी आई होता येत नाही'

ही कवीची खंत आहे.

'गं. भा. मथुबाई संपत मोरे' ही आणखी एक मातीची लेक. नव-यानं आत्महत्या केल्यावर ती आपल्या संसाराचा गाडा नेटानं रेटत राहते.

'आपला आपणच भुईला रेटा द्यायचा

अन् उभं -हायचं!

मोडलेल्या झाडाला डीर फुटतात का न्हाई?'

हे तिचं जगण्याचं अपराजित तत्त्वज्ञान आहे.

'माणसाच्या राक्षसानं भेदून टाकलेत तिन्ही लोक' ही मोठीच भयप्रद गोष्ट आहे!

'देश कंबरेत वाक पडून म्हातारा होऊ शकतो' ही केवळ कविकल्पना नसून संभाव्य घटनाक्रम आहे.

कवी केवळ गावकुसाचे दु:ख मांडत नाही, तर कवीच्या डोक्यावर समस्यांचं 'ग्लोबल गाठोडं' आहे.

गावखेड्यापासून तुटत चालल्यामुळे कवीची अवस्था मोठी भयानक होते :

'मी माती हरवून आल्यासारखा दु:खीकष्टी!

कुणाच्या तरी मौतीला गेल्यासारखा

मातीला जाऊन येतो'. 

कवीच्या मनाला ग्रासणारी ही खिन्नता वाचकालाही अस्वस्थ करून जाते.

'आधी वावराचं बोट तुटून आलं होतं माझ्या हातात 

आता माझं बोट तुटून वावराच्या हातात गेलं की काय?' 

असा भास कवीला होतो. हे एक 'दु:स्वप्न' आहे, असे कवीला वाटते. 

'कितीतरी वर्षांत मी जातो जेव्हा गावी' ह्या कवितेत कवीने गावखेड्यांची पडझड मोठ्या प्रत्ययकारी शब्दांत चितारली आहे :

'यदूबाबा न् रंभाईच्या ओस पडलेल्या घराच्या 

पापण्या ओल्या झाल्याहेत

चिमानानाच्या घरानं मला पाहताच फोडला हंबरडा 

सीतावहिनीचं घर मोडून पडलय

संतू न्हाव्याचं घर दिसत नाहीये 

तोंडाळ मिरीचं घर मुकं झालय

केदू काशीनाथच्या घरानं जमिनीवर अंग टाकलय. 

गणू गोपाळाच्या घराच्या भिंती वाकुल्या दाखवताहेत 

रघू जेऊघालेच्या घराच्या छपरास मेढीनं

धरलं आहे कण्हत कुथत तोलून

आवडाईच्या घराचं अंगण कुणी खोदून नेलय? 

राधाईचं ओट्यासकट तुळशीवृंदावन गायब झालंय'. 

हे विषण्ण करणारे वर्णन कोणत्याही गावखेड्याला तंतोतंत लागू पडते. 

विस्कटलेल्या गावखेड्याची उदासी चराचराला व्यापून उरली आहे :

'साळुंक्या रडताहेत

विहीर रडते आहे 

गाय रडते आहे 

बैल रडतो आहे'. 

ही उदासी वाचकांपर्यंत पोहोचविण्यात ऐश्वर्य पाटेकर यांची कविता कमालीची यशस्वी झाली आहे. 

'वर्तमानाची ही गिचमीड लिपी' साक्षराला निरक्षर ठरवू पाहते आहे. एक भाकर पृथ्वीएवढी वाटण्याचा हा कराल कालखंड आहे. पृथ्वीच्या उकिरड्यावर राज्यकर्त्यांच्या बुद्धीची टरफलंच टरफलं साचली आहेत. 

इतकेच नाही, तर 

'स्मशानात परावर्तित होऊन गेलीय अवघी पृथ्वी'. 

'आणि आपण पाहतोय ज्या ईश्वराची वाट

न जाणो त्याचं आधीच स्वर्गात स्मशान झालं असेल तर! 

आणि हे काय अचानक कोणी फोडला हंबरडा 

ईश्वराच्या नावानं?' 

अशा शब्दांत ही बंडखोर  कविता ईश्वर ह्या संकल्पनेच्या अस्तित्वालाच थेट आव्हान देते. 

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की

'गाव तोंडावर गोधडी ओढून 

सूर्य सामसूम झाल्यासारखा तोंड लपवून' 

असे चित्र कवीला दिसते आहे. 

सूर्याला तोंड लपवण्याची वेळ कुणी आणली? 

'जेव्हा राज्यकर्ते जास्तच उद्दाम होतात' 

हे त्याचे सडेतोड उत्तर आहे. 

'वर्तमान वास्तवाचा कासरा 

सैल होण्याऐवजी दिवसेंदिवस 

आवळतच चाललाय

व्यवस्थेच्या तुरुंगात जागच्या जागी 

खुरमुंडी' 

ह्या बाजारू व्यवस्थेनं सामान्य जीवाच्या जगण्याची 'खुरमुंडी' केली आहे, ही परिस्थितीच मोठी केविलवाणी आहे! 

दुष्काळी दृश्याचे सहा तुकडेही असेच अस्वस्थ करणारे आहेत. 

जागतिकीकरणाने सामान्य माणसाच्या जगण्याचे 'मार्केट' करून टाकले आहे. 'बाजार' करून टाकला आहे. माणसाची जणू 'खेळणी' झाली आहेत. 

'वावराचं मृत्युपत्र' ह्या कवितेच्या शेवटी कवी लिहितो:

'माझ्या मृत्युपश्चात तुम्ही

विकलंच मला बिगर शेतकऱ्याला

माझा तळतळाट भोवल्याशिवाय

राहणार नाही'.

वावराचा हा तळतळाट संवेदनशील वाचकाच्या काळजाला करवत लावून जातो.

या सगळ्या ससेहोलपटीत कवीच्या दृष्टीने कविता हाच एकमेव दिलासा आहे. हीच कविता कवीला पदराआड घेऊन पान्हा पाजते. हीच कविता कवीला उचलून घेते कडेवर. कवीला जडलेलं कवितेचं दुखणं फक्त कवीच्या आईलाच समजतं.

सभोवताल सगळा अंधार दाटला आहे. 'अंधाराची म्हैस गाव अंगाखाली घेऊन सुस्त' पडली आहे. अशा परिस्थितीत कवीला प्रश्न पडतो :

'आता या अंधाराचं काय करू?

म्हणून कवितेची वही पुढ्यात घेतली

तर पान उलटताच कवितेतून भपकन

बाहेर पडला उजेड'

कविता हाच कवीच्या आयुष्यातला एकमेव कवडसा आहे.

हल्ली पोटार्थी माणसांची अवस्था कृमिकीटकांसारखी झाली आहे. 

'बंदूक' ही ह्या संग्रहातली केवळ तीन ओळींची अतिशय अल्पाक्षररमणीय आणि तितकीच परिणामकारक अशी कविता आहे :

'त्यांनी हातातून भाकर काढून घेत

ठेवली बंदूक हातावर

मी नेम धरून भुकेवर गोळी झाडली'. 

भुकेची अशी विविध रूपे ह्या कवितेत भेटतात. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसांचा हा आतला आवाज आहे. मानवी जगण्यातली सगळी अगतिकता आणि असहायता कवीने ह्या कवितेत बांधली आहे. 

गावखेडी, शेतीमाती, नांगर आणि फावडं, भूक आणि भाकरी, शहराच्या घशात चाललेली खेडी, बिगरशेती होत चाललेली शेतजमीन, गायीगुरांचा हंबरडा, कष्टकरी महिला, म्हणजेच मातीच्या लेकी, मातीच्या वाटा - पायवाटा, शेण-शेणकूर, जात्यावरचं दळण, भावनेचं अर्थशास्त्र कवटाळून बसलेली आवडाई, सासुरवाशिणींना पदरात घेणा-या कोरड्या विहिरी, आत्महत्या करणारी झाडं, वारंवार पडणारे दुष्काळ आणि त्यामुळे उद्ध्वस्त होत चाललेली खेडी, डोळे रोखून आणि चोची परजून बसलेली गिधाडे, मानवाचे झालेले वस्तूकरण, चहूकडे दाटलेला अंधार, जीएसटीची कातरी, राज्यकर्त्यांचा उद्दामपणा, समाजमाध्यमांचं ढुंमकं हे सगळे ह्या कवीचे आणि कवितेचे आस्थाविषय आहेत. ह्या सगळ्या जगण्यातील ताणेबाणे कवीने छान टिपले आहेत. कवीने समाजमाध्यमांचा निष्क्रिय वाचाळपणा नेमकेपणाने अधोरेखित केला आहे. 

'कासरा' हे मर्यादित अर्थाने कवीचे आणि अमर्याद अर्थाने समकालीन समाजजीवनाचे आत्मकथन आहे. पदोपदी अनुभवलेल्या ठेचांची ठसठस ह्या कवितेत आहे. ही कविता म्हणजे एका युगाचा आत्मशोध आहे. 'कासरा' ही व्यथित करणारी आठवणींची जत्रा आहे. 

हल्ली कवितेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर कंपोझिंग चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर 'कासरा'मधील कविता तिच्यातील अंगभूत अस्सलतेमुळे उठावदारपणे उठून दिसते. कवीच्या अंतःकरणातील अस्वस्थता वाचकांपर्यंत पोहोचविणारी 'कासरा'तील कविता ही एकविसाव्या शतकाची कविता आहे. 

  • कासरा (कवितासंग्रह) 
  • कवी : ऐश्वर्य पाटेकर 
  • प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, मुंबई 
  • मुखपृष्ठ : संतोष घोंगडे 
  • पृष्ठे १२८          किंमत रु. २५०

  • डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या