लढवय्या प्रोफेसर: डॉ.महेश कळंबकर

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.महेश कळंबकर दि. ३० जून रोजी नियत वयोमानाप्रमाणे ३७ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत.

          एक लढवय्या प्राध्यापक, एक परिवर्तनवादी, संघर्षशील, कृतिशील विचारवंत म्हणून डॉ. महेश कळंबकर यांची ओळख आहे. यशवंत महाविद्यालयाने त्यांच्या संघर्षाला साथ दिली. विरोध विकास तत्त्व हे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे असते. त्याद्वारेच मानवाची प्रगती होत असते. 'यशवंत ' मध्ये समकालीन सहकारी प्राध्यापकांमार्फत सकारात्मक विरोध त्यांना झाला आणि या विरोधामुळेच ते फुलले. त्यांना वैचारिक विरोध झाला; त्यामुळे ते प्रगल्भ झाले. 

          रसायनशास्त्र हा विषय त्यांच्या आवडीचा विषय मन लावून त्यांनी ३७ वर्षे विद्यार्थ्यांना शिकविले. आपल्या कार्यकाळात तीन एम.फिल. व दोन पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे २५ पेक्षा जास्त दर्जेदार संशोधन पेपर प्रसिद्ध झाले. 'यशवंत ' च्या आधी ते योगेश्वरी महाविद्यालय, आंबेजोगाई येथे एक वर्ष सेवेत होते.ऑगस्ट १९८८ पासून यशवंत मध्ये ते रुजू झाले. 

          विज्ञानमंच, पुणे या माध्यमातून त्यांनी वीस वर्षे वैज्ञानिक संकल्पना असलेले विविध प्रयोग केले. डॉ. भास्कर दवणे हे नांदेड विज्ञानमंचाचे समन्वयक होते. त्यांच्या सहकार्याने 'विश्वाच्या निर्मितीपासून ते आधुनिक मानवापर्यंत' या विषयावर त्यांनी प्रयोग केले.

           केवळ रसायनशास्त्रामध्ये रमतील ते डॉ.महेश कळंबकर कसले? सामाजिक शास्त्राच्या अनुषंगाने फुले, शाहू, आंबेडकरी विज्ञानवादी चळवळ त्यांनी प्रारंभापासूनच स्वीकारली आणि यशस्वीरित्या राबविली.

           वाचकांना वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की, प्रोफेसर असलेल्या डॉ. महेश कळंबकर यांनी आंतरजातीय विवाह वधू वर सूचक केंद्र यशस्वीरित्या चालविले. या केंद्राद्वारे अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. त्या दृष्टीने प्रबोधन चळवळ राबविली. खेड्यापाड्यात जाऊन त्यावर व्याख्याने दिली.

           महत्त्वाचे म्हणजे १९९५ पासून स्वतःच्या नावासमोर आईचे नाव लावण्याचा प्रघात त्यांनी स्वतः स्वीकारला व व्यवहारातही आणला. सार्वजनिक ठिकाणी 'डॉ. महेश कळंबकर उर्फ डॉ. फ्रीडम द्रोपदाबाई' या नावाची नोंद केली.

           त्यांचा साहित्यिक प्रवासही बराच सुखद आहे. माझ्या सायंटिफिक बायकी कविता हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. फुले आंबेडकरी प्रवाह हा वैचारिक ग्रंथही प्रकाशित आहे. क्रांतीज्योती सावित्रीआई फुले: आई शिक्षकदिनोत्सव हा ग्रंथही बऱ्याच प्रमाणात गाजला.

           स्त्रीवादावर बऱ्याच ठिकाणी व्याख्यानांद्वारे त्यांनी जनजागृती केली. १९९५ पासून २०२२ पर्यंत जवळपास २७ वर्ष स्वामुक्टा संघटनेच्या विविध पदांवर विशेषतः अध्यक्ष आणि सचिव पदावर ते कार्यरत राहिले. अखिल भारतीय मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या विभागीय सचिवपदी त्यांनी प्रभावीरीत्या भूमिका बजावली. अनेक शैक्षणिक प्रश्न सोडविण्याचा जिकरीने प्रयत्न केला. विशेषतः सेट नेटचा प्रश्न महाराष्ट्र पातळीवर नेला आणि त्याबद्दल यशस्वी लढा दिला.

           डॉ.ए.टी.सूर्यवंशी आणि डॉ. भास्कर दवणे यांनी त्यांना फुले आंबेडकरी चळवळीत आणले. त्यांनी आवर्जून पुढील वाक्याचा उच्चार केला की, मी जातीत जन्मलो तरी माझी मुले जातीत मरणार नाहीत, हे व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या दोन्ही अपत्यांनी आंतरजातीय विवाह केलेले आहेत.

            ज्या ज्या प्राचार्यांच्या कार्यकाळात त्यांनी सेवा बजावली, त्याबद्दल त्यांचे उद्गार कृतज्ञतापूर्वक आहेत. प्राचार्य वर्दाचार्यलू हे नम्र व इतरांकडून काम करून घेणारे यशस्वी प्रशासक होते. अत्यंत शिस्तप्रिय प्रशासन व सर्वच अभ्यास विषयांवर कमांड असलेले प्राचार्य म्हणून ते डॉ.बी.एस. ढेंगळे यांच्याकडे पाहतात. धडाडीने निर्णय घेणारे प्राचार्य म्हणून डॉ.एन.व्ही. कल्याणकर त्यांना भावतात. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा प्राचार्य म्हणून डॉ.ए.एन.जाधव त्यांना आवडतात तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे त्यांचे चांगले मित्र आहेत. बऱ्याचदा प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे आणि डॉ.महेश कळंबकर यांच्यातील संवाद प्रशासक आणि विभागप्रमुख यांच्या पलीकडे असलेला आढळून येतो. शैक्षणिक उपक्रमांवर प्रेम करणारा प्रशासक व पूर्णतः शिक्षणमय झालेला हाडाचा शिक्षक म्हणून ते प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्याकडे पाहतात.

           त्यांनी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीला अत्यंत ग्रेट मानलेले आहे. जिथे प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सन्माननीय संस्थाचालक धडपडत असतात. व्यक्तिमत्व विकास आणि संशोधनपूरक वातावरण निर्मितीसाठी सदैव सहाय्य करणारे तसेच संपूर्ण स्वातंत्र्य देणारे, प्रेरणा देणारे संस्थाचालक भेटल्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण, माजी राज्यमंत्री व सचिव श्री.डी.पी. सावंत तसेच संस्थेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी केवळ नांदेड व मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रातील शैक्षणिक तत्व, पर्यावरण उंचीवर घेण्याचे  कार्य केलेले आहे; अशी भावना ते व्यक्त करतात.

           एक विरळ व्यक्तिमत्व, अफलातून व हटके जीवन जगलेले व जगणारे सहकारी डॉ.महेश कळंबकर यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी, समृद्ध जावो; हीच सदिच्छा!

                              -डॉ.अजय गव्हाणे, 

                      राज्यशास्त्र विभागप्रमुख,

                 यशवंत महाविद्यालय, नांदेड.

                भ्रमणध्वनी: ८३२९२५६६३६

टिप्पण्या