प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे हे कोल्हापूरच्या शिक्षण, समाजकारण आणि साहित्य क्षेत्रातील एक महनीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या जीवनाची इथपर्यंतची खडतर वाटचाल म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रेरणादायी प्रकल्प आहे. यंदा त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हापुरात वर्षभर विविध कार्यक्रम होत आहेत. त्याची सुरुवात परवाच एका व्याख्यानाने झाली. त्या पहिल्याच कार्यक्रमात लवटे परिवाराने सामाजिक कार्यासाठी एक कोटी रुपये दान देण्याचा संकल्प सोडला आहे. एका शिक्षकाची ही दानत पाहिल्यावर नतमस्तक व्हायला होते.
आजपासून ७५ वर्षांपूर्वी त्यांचा जन्म पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे अनाथाश्रमात एका कुमारीमातेच्या पोटी अनौरस अपत्य म्हणून झाला. जन्म देऊन ती माता बाळाला टाकून निघून गेली. अनाथाश्रमातील एका सेविकेने अंगावर दूध पाजून त्यांचा सांभाळ केला. अनाथपणाचा आणि अनौरसपणाचा कलंक कपाळी वागवत त्यांनी आपल्या आयुष्याची खडतर वाटचाल केली आहे. या जगात आपले कोणीच नाही, म्हणून ते रडतकुढत बसले नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःला तर घडवलेच, शिवाय आपल्यासारख्या अनेक वंचितांना घडण्यासाठी आधार दिला.
'खाली जमीन वर आकाश' हे त्यांचे आत्मकथन वाचताना अंगावर शहारे येतात. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या अनेक आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. दु:खी माणूसच दुसर्याचे दु:ख जाणतो, ह्या न्यायाने त्यांनी आपले आयुष्य वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी खर्ची घातले आहे. अनाथ, उपेक्षित, कलंकित, अंध, अपंग, मूकबधिर, मतिमंद, गतिमंद, अस्थिव्यंग, विकलांग अशा वंचितांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन सर्वस्व अर्पण केले आहे. अनाथाश्रम, बालकाश्रम, रिमांड होम अशा समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून काम केले. अनेक देशांत फिरून तेथील वंचितांच्या पुनर्वसनाचा अभ्यास केला.
आपल्यासारख्या अनेक वंचितांच्या जीवनकहाण्या त्यांनी जवळून बघितल्या. नुसत्या त्रयस्थपणे आणि अलिप्तपणे पाहिल्या नाहीत, तर गणगोत समजून त्यांच्या जीवनाशी ते समरस झाले. त्यांचे दु:खहरण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अशा वंचितांच्या जीवनांवर आधारित त्यांचा 'दु:खहरण' हा कथासंग्रह २०१८ साली प्रकाशित झाला आहे. हा कथासंग्रह मी नुकताच वाचला. ह्या कथासंग्रहात २३ वंचितांच्या ह्रदयद्रावक गोष्टी आहेत. ह्या पुस्तकात लेखकाने वंचितांचे विश्व उजागर केले आहे. ह्या कपोलकल्पित कथा नसून ख-याखु-या घडलेल्या गोष्टी आहेत. वंचितांच्या वेदना समाजाला कळाव्यात आणि समाजाच्या संवेदना जाग्या व्हाव्यात, हा लेखकाचा हेतू आहे. ह्या कथांची अर्थपूर्ण शीर्षकं वाचली तरी त्या जीवनकहाण्या अंगावर येतात. ह्या पुस्तकाला प्रो. डॉ. रणधीर शिंदे यांनी तितक्याच ताकदीने प्रस्तावना लिहिली आहे.
दु:खचक्राला बांधलेल्या माणसांच्या ह्या गोष्टी आहेत. 'दु:खहरण' मधील संध्याच्या पहिल्याच कथेने वाचक हादररून जातो. लेखकाने ही सगळी प्रकरणे किती हिमतीने हाताळली असतील, याच्या नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा येतो. नियतीने आणि निसर्गाने ह्या वंचितांच्या उद्धारासाठीच लेखकाची निवड केली आहे, असे वाटते. जमीराची गोष्ट वाचत असताना सामान्यांचे जग आणि वंचितांचे जग यात किती भयानक दरी असते, याची तीव्रतेने जाणीव होते. वाचून उदास होण्याशिवाय वाचकाच्या हाती तरी काय असते! 'खरा गुन्हेगार कोण?' ह्या कथेतील सुनंदाला लेखकाने तिचं घरसंसार व्यवस्थित वसवून दिलं. लेखकातल्या पुण्यवान पालकत्वाला वंदन केलेच पाहिजे!
ह्या उपेक्षित जीवांची जखम हळूहळू बरी होते, पण व्रण पुसता येत नाहीत, हे खरेच! एक अंकी 'रुक्मिणीहरण' हे नाटक भयानक आहे!
मुलाचे लिंगपरिवर्तन होऊन मुलगी बनलेल्या वासंती वाशिमकरची जीवनकहाणी अद्भुत आहे! ही वासंती पुढे नगरसेविका म्हणून निवडून आली.
त्यासाठी लेखकाने घेतलेला पुढाकार आणि पत्करलेला धोकाही तितकाच अद्भुत आहे!
बहुविकलांग वल्लरीची आणि तिच्या मातापित्याची जिद्द अनुसरणीय आहे.
कारण तिच्या जिद्दीमुळे तिच्या आयुष्यातील अंधाराचे जाळे फिटले. मूकबधिर सचिनने आपल्या जिद्दीने 'मूकं करोति वाचालं, पंगु लंघयते गिरिम्' हे वचन सार्थ ठरविले आहे.
जगण्याशी दोन हात करणाऱ्या माणसांच्या ह्या कथा आहेत. विजिगीषू माणसांच्या ह्या शौर्यगाथा आहेत. अशी उसवलेली अनेक आयुष्यं सावरताना लेखकाने व्यक्त केलेला, 'उद्याचं जग आपलं असणार आहे', हा आशावाद दुर्दम्यच म्हटला पाहिजे!
लेखकाच्या मानलेल्या आईची कर्मकहाणी 'खाली जमीन वर आकाश' ह्या आत्मकथनात वाचली होतीच. ती इथे पुन्हा वाचली. फारच ह्रदयद्रावक आहे!
पूर्वाश्रमीच्या कु. रेखा श्याम राव म्हणजे सध्याच्या सौ. रेखा सुनीलकुमार लवटे.
'डाग नसलेला चंद्र' ह्या शीर्षकाखाली लेखकाने सहचारिणीची जीवनकथा सांगितली आहे. दोन महिन्यांच्या रेखाला जन्मदात्रीने पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे अनाथाश्रमात सोडून दिले होते. लेखकाप्रमाणे त्यांचेही बालपण अनाथाश्रमात गेलेले. सौ. रेखाताईंच्या मनोगतातील 'अनाथपणाचे आभाळ पेलताना' ह्या तीन शब्दांत ह्या पुस्तकाचे संपूर्ण अवकाश पेलले आहे.
'कोंडीची कोंडी' ह्या प्रासयुक्त शीर्षकाच्या लेखातून व्यक्तिचित्र जिवंत करण्याचे लेखकाचे शब्दसामर्थ्य जाणवते.
'दु:खहरण' वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाच्या मनात दु:खाचे मळभ दाटते, पण 'पुरुषार्थी आई' ह्या शेवटच्या लेखामुळे मनाला उभारीही येते.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी अनेकांच्या फाटलेल्या आयुष्याला टाके घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. उसवलेली आयुष्यं सावरायला मदत केली आहे. अनेकांचे घसरलेले पाऊल सावरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावला आहे. ज्यांनी खूप सोसले, भोगले त्यांना सुखाचा सूर्योदय दाखवण्याची धडपड केली आहे. अनेक सूरदास आणि कालिदास घडवले आहेत. अनाथांचं आभाळ अनाथ राहू नये, यासाठी जिवाचे रान केले आहे. बालमित्र बिपिनच्या शून्याचे शतक होण्यासाठी जमेल ते केले.
ह्या केवळ दु:ख उगाळण्याच्या गोष्टी नाहीत, तर ह्या दु:खहरणाच्या गोष्टी आहेत.
आपल्या ह्या अंगीकृत कार्याबद्दल लेखकाने लिहिले आहे :
'मी, संस्था आणि मनुष्य संबंधांचा गोफ गुंफत उसवलेली आयुष्यं शिवत राहतो. तो उपकाराचा उद्योग नसतो. तो असतो एक खटाटोप. आपणच आपल्या गुजरलेल्या आयुष्याचा तो असतो एक पुनर्शोध. ते काम एखाद्या कुशल खलाशासारखं करावं लागतं. एकाच वेळी अष्टावधानं सांभाळायची. वा-यावर स्वार व्हायचं... नावेचं नियंत्रण... दिशानिश्चिती... अन् प्रवास तर सुरूच!'
लवटे सरांच्या ह्या अथक प्रवासाला हार्दिक शुभेच्छा!
'दु:खहरण' (वंचितांच्या कथांचा संग्रह)
लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक : अक्षरदालन, कोल्हापूर.
मुखपृष्ठ : गौरीश सोनार
पृष्ठे : १३० किंमत रु. ३५०
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा