द. वि. अत्रे हे आरोग्य खात्यात ४० वर्षे व्रतस्थपणे समर्पित सेवा करून समाधानाने निवृत्त झालेले सदभिरुचिसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. ऋतुरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या 'माझे भावविश्व' ह्या पुस्तकात आत्मकथनपर आठ लेख आहेत. हे लेख काही त्यांनी स्वेच्छेने लिहिलेले नाहीत, तर ऋतुरंग प्रकाशनाचे अरुण शेवते यांनी अत्रे यांच्याकडून हे लेख सक्तीने लिहून घेतले आहेत. अत्रे यांना गप्पा मारण्याची जितकी आवड आहे, तितकी लेखनाची आवड नाही. अत्रे आणि शेवते हे जिवलग मित्र. त्यामुळे मित्रांना एकमेकांच्या क्षमता आणि मर्यादा माहीतच असतात. आठपैकी सात लेख 'ऋतुरंग' दिवाळी अंकात प्रकाशित झालेले आहेत. त्या त्या वेळी वाचकांनी ह्या लेखांना भरभरून दाद दिली आहे. म्हणूनच ते लेख आता पुस्तकरूपाने आले आहेत.
द. वि. अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील राजुरी ह्या गावचा. वडिलोपार्जित वाडा बाहेरून डौलदार दिसत असला, तरी आत अठराविश्वे दारिद्र्य. वाड्यात वैभवाचे भग्न अवशेष. सोवळेओवळे अधिक. वडील आणि चुलत्यांचा भिक्षुकीचा व्यवसाय. त्यामुळे कशीबशी गुजराण होत असे. मातृछत्र बालपणीच हरवलेले. जेवणात आवडनिवड नाही. पानात जे पडेल ते खायचे. अनवाणी फिरण्यामुळे पायांत कुरपे झालेली. ते बालपण नव्हते, तर कार्टेपण होते. त्यामुळे शिक्षणाची फारच परवड झाली. आपल्या कुटुंबाविषयी त्यांनी लिहिले आहे : 'आमच्या कुटुंबात मोजकीच माणसे होती. आमच्याबरोबर गरिबीदेखील मुक्कामाला होती'.
'बडा घर पोकळ वासा' असेही त्यांनी आपल्या घराचे आणि कुटुंबाचे वर्णन केले आहे.
वाल्हे हे लेखकाचे आजोळ. मामा बडोदा येथे अधिकारी असल्यामुळे आणि गावी बागायती शेती असल्यामुळे आजोळ चांगले सधन होते. हे आजोळ लेखकाला आनंदाचा विसावा वाटत असे. कारण लेखकाच्या कुटुंबाला धनधान्य आणि कपडेलत्ते आजोळाकडून मिळत असत. ह्या वाल्हे गावाविषयी लेखकाने लिहिले आहे : 'वाल्हे म्हणजे वाल्या कोळ्याने त्या ठिकाणी तपश्चर्या करून वाल्मिकीऋषी या पवित्र उंचीपर्यंत आपले स्थान स्थापित केले, ती ही भूमी होय'.
अशी पौराणिक माहितीही ह्या लेखांतून मिळते.
पिढीजात दारिद्र्यावर मात करायची, तर शिक्षणाशिवाय आणि नोकरीशिवाय पर्याय नाही, हे लवकरच लेखकाच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी शिक्षण चालू असतानाच कुष्ठरोग तंत्रज्ञाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज केला. सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे राहून तुटपुंज्या विद्यावेतनावर प्रशिक्षण पूर्ण केले. 'कुष्ठरोग तंत्रज्ञ' म्हणून मराठवाड्याच्या ग्रामीण भागात ४० वर्षे फिरस्तीची नोकरी केली. ह्या नोकरीतून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. ह्या भ्रमंतीतून त्यांचे अनुभवविश्व आणि भावविश्व समृद्ध होत गेले. ह्या संदर्भातील त्यांच्या कटुगोड आठवणी अतिशय वाचनीय उतरल्या आहेत. १९७२च्या सुमारास मराठवाड्यात कुष्ठरोग तंत्रज्ञाला 'महारोगी डॉक्टर' किंवा 'कुष्ठरोगाचे साहेब' म्हणून ओळखत. ह्या ओळखण्यात आत्मीयता कमी आणि तुच्छताच अधिक होती.
५० - ५५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात कुष्ठरोगाविषयी अज्ञान, अंधश्रद्धा आणि गैरसमज फार होते. लोक आपल्या कुटुंबातील सदस्याला आणि समाज त्या संपूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकत असे. या काळात त्यांना जखमा धुण्यापासून त्यांची वैद्यकीय कारणे आणि लक्षणे यांचा अभ्यास करावा लागला. तरी लेखकाने 'आरोग्यखातं' म्हणून काम करण्यापेक्षा 'आरोग्यसेवा' म्हणून काम करण्यावर भर दिला. केवळ वेतनाकडे पाहून काम करण्यापेक्षा आपल्या घरातील जवळची व्यक्ती रुग्ण आहे असे समजून काम केले. त्यांचे काम उपेक्षित, कंटाळवाणे आणि खडतर होते, तरी त्या कामात आनंद मानला. सर्वेक्षण, प्रशिक्षण आणि औषधोपचार ह्या माध्यमातून कुष्ठरोगाशी मुकाबला केला. कुष्ठरुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून आणि गांधीजींचे कार्य नजरेसमोर ठेवून काम केले.
नोकरीत अनेक भल्याबु-या गमतीजमती अनुभवास आल्या, तरी लेखकाने शासकीय कामाशी कधीच प्रतारणा केली नाही. आरोग्यसेवेतील पुण्यकर्माचा एक वाटेकरी म्हणून त्यांनी योगदान दिले. ग्रामीण भागातील अनुभवांमुळे लेखकाचे मनोरंजनही झाले आणि त्यांना अंतर्मुख होऊन खूप काही शिकता आले. म्हणून लेखकाने लिहिले आहे : 'नियोजन करून जीवनाचा प्रवास होत नसतो'.
दळणवळणाची पुरेशी साधने नसलेल्या काळात फिरस्तीच्या नोकरीमुळे लेखकाला स्थानिक लोकजीवनाचा छान अभ्यास करता आला. ग्रामीण भागात करमणुकीची कोणतीच साधने नसल्यामुळे झपाटल्यासारखे रात्र - रात्र ऐसपैस वाचन करता आले. सर्वांशी समन्वय साधून काम करण्याची सवय लागली. जनसंपर्क वाढला आणि त्यातून आत्मभान आले.
द. वि. अत्रे यांना लोक 'ज्योतिषी' समजत असले, तरी ते स्वतःला ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक मानतात. ह्या विषयातील आपला अभ्यास कसा वाढत गेला, हे त्यांनी 'हस्तरेषा आणि मी' ह्या लेखात सविस्तर आणि सोदाहरण सांगितले आहे. ह्या क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासामुळे यशवंतराव गडाख, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अमृता प्रीतम, अभिनंदन थोरात, डॉ. सुभाष राजुळे, मिलिंद नार्वेकर, प्रशांत गडाख यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि उद्योगपती त्यांच्याशी जोडले गेले. तथापि त्यांनी आपले प्रस्थ न वाढवता आपली आध्यात्मिक साधना वाढवली. आपला सच्छीलपणा, आध्यात्मिक बैठक आणि प्रसन्न मनोवृत्ती विकसित केली. यातून त्यांनी आनंदलहरी अनुभवल्या.
'सावली' ह्या लेखात लेखकाने स्वप्नसृष्टी आणि सत्यसृष्टीचा वेध घेतला आहे. दिवसा माणूस मनानं कल्पित स्वप्नं रचीत असतो. स्वप्नं ही सत्याची सावली आहे, असे म्हटले आहे. संदर्भीय वय आणि चित्तदशा यांचा संबंध स्वप्नांतील घटनांशी लावला आहे. या संदर्भात त्यांनी आचार्य रजनीश यांच्या विचारांचा दाखला दिला आहे. देहू ह्या पुण्यक्षेत्री दीर्घकाळ वास्तव्य केल्यामुळे आपल्याला आत्मिक बळ मिळाले आणि जीवनात आमूलाग्र बदल घडला, असे लिहिले आहे.
डॉ. सदानंद मोरे हे लेखकाचे बालमित्र आहेत. 'इंद्रायणी काठी' ह्या लेखात डॉ. मोरे यांच्या अपरिचित पैलूंचा परिचय करून दिला आहे. मोरे यांना शालेय जीवनात बाबूराव अर्नाळकर यांच्या डिटेक्टिव्ह कादंब-या वाचनाचे अपरिमित वेड होते, ही माहिती वाचकांसाठी नवीन आहे. डॉ. सदानंद मोरे तरुणपणी देहू ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उपस्थित राहून उणिवा दाखवत असत. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या सभा आयोजित करून प्रचार केला होता. ह्या माहितीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील राजकीय पैलू जगासमोर आला आहे.
'गुरुजी' ह्या लेखात द. वि. अत्रे यांनी आपल्या जडणघडणीतील शिक्षकांचे योगदान कृतज्ञतापूर्वक अधोरेखित केले आहे. आपल्याला लाभलेले शिक्षक म्हणजे लोकदैवत होते, असे त्यांनी म्हटले आहे. त्या काळी गावातील कोणताही निर्णय शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक घेत असत. शिक्षक जात असतील तर गावातील लोक पायातील चप्पल काढून उभे राहात आणि नमस्कार करत. त्या शिक्षकांना बहुश्रुत व आदर्श नागरिक घडविण्याची तळमळ होती. त्या शिक्षकांनी 'श्रम जाहला अवघा श्रीराम' हा संस्कार लेखकाच्या बालमनावर बिंबविला. वाचनाची गोडी लावली. सुसंस्कृत व सुविद्य पिढी घडविण्यात शिक्षकांचे बहुमोल योगदान होते, हे लेखकाने आवर्जून नोंदविले आहे. शेवटी, हल्ली शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळा आणि भावनिक नाते दुरावत चालल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
द. वि. अत्रे यांची लेखनशैली अतिशय प्रसन्न आणि प्रासादिक आहे. ह्या लेखनात कुठेही आव किंवा अभिनिवेश नाही. उलट प्रांजळपणा हा ह्या लेखनाचा स्थायीभाव आहे. आपल्या बालपणातील कौटुंबिक दारिद्र्याबद्दल लेखकाने अतिशय प्रांजळपणे लिहिले आहे. आध्यात्मिक साधनेबद्दल तटस्थपणे लिहिले आहे. ह्या लेखनातून लेखकाची आपल्या कामाविषयी नितांत निष्ठा जाणवते. अतिरिक्त ताण न घेता नोकरी करण्याची वृत्ती दिसून येते. आचार्य रजनीश आणि जे. कृष्णमूर्ती यांची अवतरणे ह्या लेखांना वैचारिक उंची प्रदान करतात. लेखकाने आपल्या जीवनात आणि लेखनात कृतज्ञतामूल्य कसोशीने पाळले आहे. आईवडील, नातेवाईक, शिक्षक आणि मित्र, नोकरीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी यांच्याविषयी लेखकाने आत्मीयतेने लिहिले आहे. सतीश भावसार यांनी मुखपृष्ठावर रेखाटलेल्या कोवळ्या सोनेरी पिंपळपानांची कोवळीक ह्या लेखनात पुरेपूर उतरली आहे.
'माझे भावविश्व' (लेखसंग्रह)
लेखक : द. वि. अत्रे
प्रकाशक : ऋतुरंग प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ : सतीश भावसार
पृष्ठे १२४ मूल्य रु. २००
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा