मोहरम' : हंसराज जाधव यांचा सकस कथासंग्रह डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

प्रा. डॉ. हंसराज जाधव हे  नांदेड जिल्ह्य़ातील वजीरगावचे मूळ रहिवासी. आमचे आवडते शाहीर दामूअण्णा वजीरगावकर यांचे ते चिरंजीव आहेत. सध्या ते पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. दोन वर्षांपूर्वी दै. उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकाचे मुद्रितशोधन करताना त्यांची कथा वाचली होती. ती कथा मला अतिशय आवडली होती. त्या वेळी त्यांची अजिबात ओळख नव्हती. एक वाचक म्हणून त्यांच्या कथेविषयीचा अभिप्राय मी त्यांना व्हाट्सऐपवर कळवला होता. त्यानंतर त्यांच्याशी झालेल्या संवादातून ही ओळख झाली.

अलीकडे त्यांचा 'मोहरम' हा पहिलाच कथासंग्रह लोकवाङ्मय गृह प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. लोकवाङ्मयची मुद्रा हंसराज जाधव यांच्या कथेवर उमटली, हा त्यांच्या कथेचा सन्मान आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नांदेडला आले होते. त्या वेळी त्यांनी हा कथासंग्रह मला भेट दिला. दिवाळी अंकातील त्यांच्या पहिल्याच कथेने माझ्या मनात 'एक सशक्त कथाकार' अशी प्रतिमा निर्माण झाल्यामुळे मी हा कथासंग्रह आवडीने वाचला. 

१८४ पृष्ठांच्या ह्या संग्रहात एकूण ८ दीर्घकथा आहेत. चित्रदर्शी लेखनशैली हे हंसराज जाधव यांच्या कथेचे ठळक वैशिष्ट्य आहे. 

'मोहरम' ह्या कथेत ग्रामीण भागातील हिंदू मुस्लीम धार्मिक आणि सांस्कृतिक सलोख्याचे फारच सुंदर चित्रण केले आहे. ग्रामीण भागातील हिंदू मुस्लीम ऐक्याचे हे दर्शन अतिशय लोभसवाणे आहे. 

'चौताई' ह्या कथेत लेखकाने गावगाड्यातील स्पर्धेचे प्रत्ययकारी चित्र उभे केले आहे. चौताईतली रीस जबरदस्त आहे!

लेखकाची भाषा आणि लेखनशैली फारच प्रसन्न आहे! त्यामुळे प्रत्येक कथा ओघवती आहे. कथेचा पीळ शेवटपर्यंत टिकून राहतो. 

'सरप्लस' ह्या कथेत शिक्षणक्षेत्राची विदारक वाताहत फारच छान रेखाटली आहे!

ही कथा वाचताना मन सुन्न होतं. 

'देवानंद' ही कथा अतिशय ह्रदयस्पर्शी आहे!

'संकल्प' ही कथा वाचून मी पुन्हा एकदा अस्वस्थ झालो. कारण यापूर्वी ही कथा उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकात वाचली होती. महानुभाव पंथात लहान मुलींना 'मार्गा'त सोडण्याची प्रथा आहे. चिमुकल्या वैशालीला मार्गात सोडतानाचे वर्णन वाचून वाचकाचे अंतःकरण तिळतिळ तुटते. 

'बिल्लेवाला' ह्या कथेत शेतकरी संघटनेची बखर छान रंगवली आहे! ख-या आणि खोट्या बिल्लेवाल्यांचे दोन चेहरे समोर येतात. 

लेखकाचे समाजव्यवस्थेविषयीचे आकलन फारच स्वच्छ आहे. लेखकाची सूक्ष्म निरीक्षणशक्ती , घटना प्रसंगांची चित्रणशैली आणि बहुश्रुतता प्रत्येक कथेत प्रकर्षाने जाणवते.

'घंटेवारी' ह्या कथेत संभाजी मोफत एज्युकेशन सोसायटीविषयी वाचताना नजरेसमोर शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच उभी राहिली.

लेखकाने सीएचबीसाठी गुंठेवारीच्या धर्तीवर 'घंटेवारी' हा अतिशय अन्वर्थक शब्द चपखल घडवला आहे!

हा शब्द माझ्यासाठी नवीनच आहे.

घंटेवारीतील नऊ तुकड्यांतील नऊ कथा आणि व्यथा काळजात घर करून गेल्या.

तथाकथित उच्चशिक्षण व्यवस्थेतील सर्वस्तरीय शोषणाची फारच छान चिरफाड केली आहे!

मराठी लघुकथेत न मावणा-या अफलातून अशा कथा  हंसराज जाधव यांनी मराठी साहित्याला दिल्या आहेत.

'मुंगसं आणि मुंडावळ्या' ह्या कथेनं कोरोनाचा काळ जिवंत केला आहे. 

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आसाराम लोमटे यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे. पुस्तकाचे बोलके मुखपृष्ठ सरदार जाधव यांनी रेखाटलेले आहे. 

एका उत्कृष्ट कथासंग्रहासाठी प्रा. डॉ. हंसराज जाधव यांचे हार्दिक अभिनंदन!

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
थोरांदळे गावात हनुमान जयंती उत्सवानिमित्त पुरी, गुळवणी व चटणीचा महाप्रसाद*
इमेज