जांभळासारख्या गोड गोड कवितांनी नटलेला कवितासंग्रह : 'जांभुळबेट' कु. सुडके वैष्णवी गंगाधर (वर्ग सातवा)

डॉ. सुरेश सावंत सरांचा 'जांभुळबेट' हा बालकवितासंग्रह मी पूर्ण वाचला आहे. 'जांभुळबेट' या कवितासंग्रहाला उत्कृष्ट कवितासंग्रह म्हणून महाराष्ट्र शासनाने पुरस्कारही दिला आहे. खरोखरच हा काव्यसंग्रह खूपच छान आहे. कवितासंग्रहाचे नाव तर एकदम भारीच आहे! 'जांभूळबेट'. नदीच्या किनारी म्हजेच एका बेटावर  जांभळाची झाडं खूप असतील, म्हणून कवीने त्याला  'जांभुळबेट' असे नाव दिले असावे. जांभळं सर्वांनाच खूप आवडतात, म्हणून हा कवितासंग्रहही मला   जांभळासारखाच गोड गोड वाटला.    

या कवितासंग्रहातील पहिलीच कविता 'जांभुळबेट' मला खूप आवडली. त्यातील काही ओळी......


'जांभुळबेटावर उतरली परी

थेट निघाली पोपटाच्या घरी 

पोपटानं दिली जांभळं पाच 

पोपट म्हाणाला, 'नाच परि नाच!' 

 सर्वांना आवडणारी परी आणि तिची कथा, कविता वाचताना व ऐकताना खूपच भारी वाटते. परीची  मालिका (सिरियल) तर मला खूप आवडते. त्या मालिकेचे नाव होते 'परीचे सुपर मार्केट'. ती मी न चुकता पाहात असे. असेच एकदा जांभुळबेटावर परी अवतरली व ती थेट पोपटाच्या घरी गेली. पोपटानेही परीचा पाहुणचार केला. तिला  खाण्यासाठी  जांभळं दिली आणि परीला म्हणतो कसा "नाच परी नाच". किती सुंदर कल्पना कवीने केली आहे! त्या बेटावर परीसोबत मोर, शंख, शिंपलेही नाचायला लागले. 


परीने खूप मज्जा केली. तेवढ्यात एक  खेकडा  परीला दिसला. त्या खेकड्याला  पाहताच परी भिऊन आभाळात पळून गेली. ही कविता वाचत असताना मझ्या डोळ्यांसमोर ते चित्र उभे राहिले. मला तर जणू टीव्हीवर परीची  मालिकाच पाहत आहे की काय, असे वाटू लागले.

या कवितासंग्रहातील 'फूल व्हावे' ही कविताही  मला आवडली. ही कविता वाचून मला असे वाटले, की मलाही फूल होता आलं तर वाऱ्याबरोबर डोलता आलं असतं. पावसामध्ये मनमुराद नाहता आलं असतं. अशी खूप मजा मलाही करता आली असती.


'आमची फळबाग' या कवितेतून खूप माहिती मिळते. विविध जिल्ह्यांतील फळांची माहिती या कवितेतून मिळते.

'सोलापूर-नगरची बोरं डौलदार

परभणी-नांदेडची केळी पिवळीशार

अशी आमची फळबाग अमृताची ठेव

बाराही महिने जागवते जिभेची चव'. 

कोकण हे नारळ, फणस, सुपारी, आंबा या फळांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक द्राक्षांसाठी, अलिबाग कलिंगडासाठी, नागपूरची संत्री, रत्नागिरीचे काजू नि नारळ, सोलापूर-नगरची बोरं, तर आमच्या नांदेड आणि परभणीची केळी प्रसिद्ध आहे. या सर्व जिल्ह्यांची व तेथील फळांची माहिती या कवितेतून वाचायला मिळाली आणि सामान्यज्ञानात भर पडली.


'चांदोबाची तक्रार' ही कविता तर मला खूपच आवडली आणि माझ्या लहानपणीची आठवण करून दिली. आम्ही लहानपणी अंगणात  चांदोबाकडे बघत त्याला बोलत बाजेवर झोपत असू. त्याला 'चांदोमामा' म्हणत असू. पण आता अंगणात कोणीही झोपत नाही. सर्वांच्या घरी टीव्ही असल्यामुळे सर्वजण टीव्ही बघत घरातच झोपत आहेत, म्हणून चांदोबा आपल्याकडे तक्रार करत आहे की,

'मामा' म्हणून तुम्ही मला 

बोलवत नाही आता

वेगवेगळे चॅनेल पाहून 

घरात झोपी जाता'. 


या कवितेमुळे मला लहानपणीचे एक गीत आठवले. आम्ही जेव्हा अंगणात झोपत असू, तेव्हा ते म्हणायचं                  'चांदोमामा, चांदोमामा येऊन जा

तूप- रोटी खाऊन जा 

तुपात पडली माशी 

चांदोमामा राहिला उपाशी'. 


'पंख मला जर.....'ही कवितापण मला खूप आवडली. खरोखरच माणसालाही पंख असते तर कसे झाले असते! म्हणून कवीने खूपच सुंदर कल्पना केली

'मीच पाखरू झालो असतो 

आभाळावर गेलो असतो' 

पंख असते तर मी पाखरू होऊन या झाडावरून त्या झाडावर जाऊन हवे ते फळ खाल्ले असते. उंच उंच विमानासारखे उडत त्यालाही मागे टाकले असते. किती सुंदर कल्पना कवीने केली आहे. आणि कवितेचा शेवट तर खूपच सुंदर  केला आहे! 

'सगळे माझा करतील हेवा 

पंख मला पण फुटतील केव्हा?'


'आळशी माणसाचं स्वप्न' ही कविता खूप काही  शिकवण देऊन जाते. आळशी माणसाचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही, कारण तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत. फक्त खोटं खोटं केल्यासारखं करतो, म्हणून कवी म्हणतो 

'खोटे खोटे पंख खोचून

कावळा मोर होत नाही 

आळशाचं स्वप्न कधीच

साकार होत नाही'. 

 ही कविता वाचून मला असे वाटले, की आपले जर स्वप्न पूर्ण करायचे असतील, तर आपल्या अंगातला आळस काढला पाहिजे.  माझी आई मला  नेहमी म्हणते, की आळस काढून टाक. लवकर उठत जा. ट्युशनला जा. वेळेवर शाळेत जा. वेळेवर गृहपाठ कर. म्हणून मला वाटते की आळस हा आपला नंबर एकचा शत्रू आहे.


 प्रत्येकानं जर आळस न करता अभ्यास केला, तर आपले स्वप्न नक्कीच साकार होईल, असे मला वाटते.

'पावसाचं गाणं' ही कविता मुलांचा आणि पावसाचा संवाद ऐकवणारी कविता आहे. आजकाल पाऊस वेळेवर पडत नाही. पडलाच तर खूप कमी पडतो. त्यामुळे दुष्काळ पडत आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. झाडे वाळून जात आहेत. म्हणून मुले पावसाला बोलवत आहेत :

'नदी नाले आटून गेले

झाडं वाळत आहेत 

तहानलेले पशुपक्षी

टीपं गाळत आहेत'. 


अशी परिस्थिती माणसांमुळेच झाली आहे. वृक्षतोड केल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. त्यामुळे वेळेवर पाऊस पडत नाही. म्हणून मला वाटते की आपण वृक्षतोड थांबवली पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. 'झाडे लावा झाडे जगवा'चा संदेश आपण सर्वांनी पाळला पाहिजे.

या कवितासंग्रहात अडकू-भडकू, बाभळी, नाकतोडा, थेंबांची गंमत, छंद असावा, शेजारचे फुलपाखरू, वेंधळा कोण, वासरू, काचेची खिडकी, माझे आजोबा, खारुताई याही कविता खूपच सुंदर आहेत. 


डॉ. सुरेश सावंत सर खूपच छान छान कविता लिहितात, म्हणून ते माझे आवडते कवी आहेत. म्हणून मला असे वाटते की 'जांभुळबेट' हा कवितासंग्रह खूपच सुंदर आहे. सर्वांनी वाचावा असा आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रमोद दिवेकर यांनी काढले आहे. आतील चित्रे संतोष घोंगडे यांनी रेखाटली असून ती खूपच सुंदर आहेत. ही  चित्रे कवितेला अनुसरून खूपच आकर्षक रेखाटली आहेत. म्हणून हा कवितासंग्रह खूपच सुंदर झाला आहे.


'जांभुळबेट' : कवितासंग्रह 

कवी : डॉ.सुरेश सावंत 

प्रकाशन : इसाप प्रकाशन, नांदेड 

मुखपृष्ठ : प्रमोद दिवेकर 

पृष्ठे : ३२ 

मूल्य : रु. २०

---------------------------------------------

 नाव : कु. सुडके वैष्णवी गंगाधर

 वर्ग : सातवा 

 शाळा : श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती, ता. मुखेड जि. नांदेड

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
थोरांदळे गावात हनुमान जयंती उत्सवानिमित्त पुरी, गुळवणी व चटणीचा महाप्रसाद*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज