साहित्यिकांनी भविष्याचा वेध घेणारे लिखाण करावे पद्मश्री डॉ. अभय बंग : प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे विविध पुरस्कार प्रदान

  


नांदेड (प्रतिनिधी)

साहित्यिकाला काळभेदी दृष्टी असते, साहित्यिकाकडून आम्हाला भविष्य काळाविषयीचे लिखाण अपेक्षित आहे. साहित्यिकांनी भविष्याचा वेध घेणारे लिखाण करणे अपेक्षित असते, अशी अपेक्षा पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली. नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते नांदेडमध्ये बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या सोहळ्यात पद्मश्री डॉ. अभय बंग यांना मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

डॉ. बंग म्हणाले की, साहित्यिक म्हणून नाही, तर माझा हा साधना सन्मान तसेच आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा मोठा सन्मान आहे. स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन ते प्राप्त करण्यासाठी केले जाणारे जे प्रयत्न असतात, ती साधना असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज यशाच्या व्याख्या बदलल्याचे सांगताना डॉ. बंग यांनी आयआयटी, मेडिकल, यूपीएससी, एमपीएससी याच यशाच्या व्याख्या मानल्या जात असल्याचे सांगितले, त्यामागे धावण्यासाठी आपण मजबूर झालो आहोत, मात्र पालकांसह समाजाच्या या अपेक्षांच्या ओझ्याखाली कोट्यामध्ये जाऊन मुले आत्महत्या करीत असल्याचे भीषण वास्तवही त्यांनी मांडले.

मराठी भाषेतील साहित्यिक हे मध्ययुगातून बाहेर पडायला तयार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज ते माधवराव पेशवे यांच्या अलीकडे पलीकडे मराठी साहित्य जात नाही. महाराष्ट्र हा आखूड लोकांचा प्रदेश झाला आहे त्यामुळे महाराष्ट्राला भविष्य नाही, अशी टीका गिरीश कुबेर यांनी केली होती, मराठी साहित्यिकांचे लिखाण पाहिले तर ती टीका योग्य आहे की काय असे चित्र दिसत असल्याचे ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अतुलनीय व्यक्तिमत्त्व महात्मा गांधी यांच्याबद्दल ललित साहित्य का लिहिले नाही? महाकादंबरी महाकाव्य का नाही? फ्रेंच राज्यक्रांतीवर कादंबरी असल्याचेही त्यांनी सांगितले, मराठी लेखकांनी गांधी आणि स्वातंत्र्यसंग्राम यावर आतापर्यंत लिखाण का केले नाही? असा प्रश्न विचारत आगामी काळात तरी ते लिहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली, पाश्चिमात्य देशातील लेखकांनी भविष्यवेधी लिखाण केले आहे, हे त्यांनी सोदाहरण सांगितले.

सध्या भारतातील धार्मिक द्वेषाचे वातावरण पाहता आगामी काळात चांगले वाईट काय घडेल, यावर लेखकांनी लिखाण करून परिस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. भारत धर्मद्वेषाच्या मार्गाने जात आहे. लोकशाही कमी झाली आहे. या काळात लेखक, कलावंत यांनी आत्ममग्नतेतून बाहेर पड़त दूरदृष्टी देणारे ऋषी व्हावे, ही आजच्या काळाची गरज नसून ती परिस्थितीची हाक असल्याचेही डॉ. अभय बंग यांनी स्पष्ट केले. 

यावेळी प्रसाद बन महाराज होटाळेकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार 'वसुंधरेचे शोधयात्री' या संशोधनपर पुस्तकासाठी डॉ. अनुराग लव्हेकर यांना प्रसाद बन राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार 'अंकलचा कुत्रा आणि इतर कथा' या बालकथा संग्रहासाठी स्टॅन्ली गोन्सालविस यांना, प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार सौ. मंगला असोलेकर देशपांडे यांना 'नयनरम्य नॉर्वे' या प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, प्रसाद बन राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार लक्ष्मीकांत देशमुख यांना 'आंतरभारती' या दिवाळी अंकासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रतिनिधी संगीता देशमुख यांनी हा पुरस्कार डॉ. बंग यांच्या हस्ते स्वीकारला. प्रसाद बन ग्रंथगौरव या राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी आप्पासाहेब खोत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना 'काळीज विकण्याची गोष्ट' या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी स्टॅन्ली गोन्सालविस, डॉ. अनुराग लव्हेकर, सौ. मंगला असोलेकर देशपांडे यांनीही पुरस्काराला उत्तर दिले. ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांनी डॉ. बंग यांच्या कार्याचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन डॉ. सुरेश सावंत यांनी केले. कार्यक्रमास डॉ. व्यंकटेश काब्दे, डॉ. जगदीश कदम, पत्रकार शंतनू डोईफोडे, डॉ. सुशील राठी, डॉ. उमेश भालेराव, डॉ.मथु सावंत, सौ.नीमा कुळकर्णी, डॉ.वर्षा बन, महेश मोरे, विलास ढवळे, एल.के.कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

--------------

बातमीसोबत छायाचित्र पाठविले आहे

टिप्पण्या