स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्यावतीने दि. १३ मार्च रोजी अनुराधा पाटील यांची कविता: ‘पुनर्मुल्यांकन’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात येणाऱ्या या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे राहणार आहेत. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री अनुराधा पाटील व महाराष्ट्र शासनाचा भाषावृती जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य विषयावर सुप्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम बीजभाषण करणार आहेत.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्रामध्ये डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. गणेश मोहिते, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. मारोती कसाब, डॉ. लहू वाघमारे, डॉ. विजयकुमार ढोले शोधनिबंधांचे वाचन करणार आहेत.
अनुराधा पाटील यांच्या प्रकट मुलाखतीचे दुपारच्या सत्रात आयोजन करण्यात आले आहे. राज्य पुरस्कारप्राप्त कादंबरीकार सुचिता खल्लाळ आणि शिवाजी अंबुलगेकर हे श्रीमती पाटील यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतरच्या सत्रामध्ये अनुराधा पाटील यांच्या कवितांच्या हिंदी, इंग्रजी, फ्रेंच व स्पॅनिश भाषेतील भाषांतरांचे वाचन अनुक्रमे डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. रमेश ढगे, डॉ. नीना गोगटे, डॉ. झिशान अली हे करणार आहेत. शेवटच्या सत्रात कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप केला जाईल. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचा भाषाव्रती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अनुराधा पाटील या मराठीतील ज्येष्ठ कवयित्री असून साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या कवितेने मराठी कवितेला नवे वळण दिले आहे. या चर्चासत्राचा लाभ मराठी विषयाचे प्राध्यापक, अभ्यासक, परिसरातील साहित्यिक, संशोधक, विद्यार्थी यांनी घ्यावा, असे आवाहन संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे, मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा