"बाप" म्हणजे असा जादूगर आहे जो दुःखाला सुखात बदलतो,पाठीशी खंबीर उभा राहून लढायला शिकवतो,संकटावर मात करून जिंकण्याचे सामर्थ्य भरतो.ईमानदारीने मेहनत करून जगण्याचे बळ निर्माण करतो.स्वाभिमानाने जगण्याचे केवळ उपदेश न देता उभ आयुष्य उदाहरण बनून जगून दाखवतो.बाबा,वडील,पप्पा,डॅडी आणि पिता अश्या अनेक नावाने प्रसिद्ध असलेला हा दुवा आपल्या जीवनाच्या प्रत्येक वाटेवर न थकता साथ देत राहतो.अगणित त्याग करत मनातील इच्छा आणि आकांशाची आहुती देत आपले मार्ग प्रकाशित करण्यासाठी अविरत जळत राहतो.जबाबदारीचे ओझे वाहून थकला तरी त्याला थांबण्याची मुभा नाही कारण जो भार त्याने उचलला आहे त्याला उंच शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी तो निघालेला असतो .कर्तव्य निभावत असताना किती यातना झाल्या यापेक्षा तो त्या कर्तव्याची पूर्तता करण्यास जास्त महत्त्व देतो.
आजही ज्यांना बाप नावाचा आधार आहे ते नक्कीच जीवनात खचत नाहीत कारण आज बाप जरी कमवत नसला तरी त्याने आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहून कमावण्याची जी योग्यता दिली आहे त्याचे मोल कधीच होणार नाही.निस्वार्थ भावनेने इतरांच्या मदतीस धावून त्याने आपले सुंदर विश्व निर्माण केलेले असते आणि सर्वांच्या मनात घर करणारा हा पिता स्वतःच्याच घरात कधी परका होऊन जातो हे कळतच नाही.जीवनाची पूर्ण जमापुंजी खर्च करून तो केवळ घर उभं करतं नाही तर त्याच्या स्वप्नातील ते अनोखे जग असते ज्यासाठी खडतर प्रवास करून त्याने ते मिळवलेले असते. साऱ्या जगाशी झुंज देत त्याने आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले असते. मुले जशी मोठी होतात तशी त्यांची समज विकसित होत नाही.सर्रासपणे बोलण्या बोलण्यात मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने हाका मारतात,शिवीगाळ करताना बापाचा उल्लेख करतात.ज्या बापाच्या जीवावर उड्या मारतात त्याच बापाला एकेरी बोललात.काही ठिकाणी वडिलांना मारहाण केल्याची घटना ऐकण्यास मिळते तर काही ठिकाणी शुल्लक वादातून पित्याचा खून झालेला ऐकण्यात येतो.असंख्य संकटाना सामोरे जात ज्याने सुंदर जीवन घडवण्याचा उद्देश पूर्ण केला त्याच्या जीवनी एवढे दुःख का?चांगली कमावती मुले माय बापाला वृद्धाश्रमात सोडून त्रासातून मुक्त झाल्याचा आनंद मानतात परंतु ते विसरून जातात की ज्यांच्या अंगा खांद्यावर लहानाचा मोठा झाला त्याला आज खरी आधाराची गरज आहे.काठीचा आधार घेत एक एक पाऊल पुढे टाकणाऱ्या बापाला खरतर काठीचा पण भार होत असेल.
खरे म्हणजे बापाच्या भूमिकेतून जग पाहायला शिकलं तरच त्याचा त्याग कळेल ,त्याची ओढ कळेल आणि कळेल अंतरीची पिढा ज्यात तो रोज होरपळत राहतो.आपण सहजच म्हणून जातो "बाबा तुम्ही माझ्यासाठी केलंच काय?" अरे वेड्या तू उभा आहेस या पेक्षा अजून मोठा पुरावा त्याने काय द्यावा तुला.बेहिशोबी संपत्ती त्याने तुझ्यासाठी जतन केलेली ती म्हणजे निर्मळ मन आणि प्रभावी जीवन ज्याद्वारे कोणतीही अडचण सहज दूर करणे शक्य होते.जेंव्हा जेंव्हा आपण कशाचा हट्ट केला तेंव्हा तेंव्हा त्याने जिवाचं रान करून ती वस्तू आपल्या नजरेसमोर उभी केली आणि जेंव्हा त्याच्या उतरत्या वयात त्याने हट्ट केला तेंव्हा आपण त्या हट्टाला नजरांदाज करत राहतो.
हे कुठेतरी थांबल पाहिजे,बापाला त्याच हक्काचं सर्व मिळण्यासाठी त्याने आक्रोश करावा ही वेळच येऊ नये.मुलांनी कर्तव्य निभावत त्यांना समाधान प्राप्त करण्यासाठी जे करता येईल ते करत राहिले पाहिजे.आपण करू शकतो या भावनेने नाही तर बाप ह्या सर्वास पात्र आहे म्हणून.माझ्या रूपाने त्याने जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीला व्याजासह परत करून देण्याची संधी त्याने दिली यातच आपले सर्वस्व.
ईश्वरा तू असशील मोठा जगी
माझ्यासाठी तो तुझ्या पेक्षाही महान आहे
स्वतःला उगाळून मला सुगंधित करणारा
बाप माझा चंदनाची सहान आहे
पवन श्रीरंगसा कुसुंदल,नांदेड
मोब.९०७५५९५६९५

addComments
टिप्पणी पोस्ट करा