मुखेड / प्रतिनिधी
चांगला वक्ता होण्यासाठी वाचनाची चिंतनशील बैठक, इतरांचे विचार आत्मसात करण्याची दृष्टी आणि आपल्या भाषेवर प्रभुत्व आपल्या अंगी असतील तर तुम्हालाही वक्ता होता येईल. असे महत्त्वपूर्ण विचार प्रा. संजीव डोईबळे यांनी मांडले.
शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास ' या विशेष वार्षिक शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. केशव पाटील तर प्रा. एम. एस. सगरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना प्रा. डोईबळे म्हणाले की, जगातील कोणतीही भाषा अत्यंत लवचिक असते. तिला आपल्या शैलीनुसार वाकवता आले पाहिजे. भाषेवर प्रभुत्व असेल तर आपला विचार श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचविता येतो.श्रोत्याना समजेल अशा भाषिक शैलीतून आपल्या विचारांची मांडणी केली तर टाळ्या ही मिळवता येतात.भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर जगातील दर्जेदार लेखन आपण वाचले पाहिजे. सभाधिटपणा हा सरावाने येत असतो. म्हणून विद्यार्थी जीवनात आपण मिळेल त्या व्यासपीठावर सहभाग नोंदविला पाहिजे. प्र.के.अत्रे, बाळासाहेब ठाकरे यासारख्या नामवंत व्यक्तींचे चरित्र ,आत्मचरित्र आपण वाचावे. असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. उत्तम वक्ता होण्यासाठी तुम्हाला प्रथम उत्तम वाचक होता आले पाहिजे. खाल्लेले पचवता आले पाहिजे. श्रोता कंटाळवाणा होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी विनोद निर्मिती करता आली पाहिजे. यासाठी वाचन,लेखन करताना नोंदी ठेवल्या पाहिजे. त्या योग्य वेळी वापरता आल्या पाहिजेत. वकृत्व ही एक कला असते. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्याने तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. जो वक्ता माणूस, माती, साहित्य, संस्कृती आणि समाज समजून घेऊन कलात्मक दृष्टीने मांडणी करतो तोच उत्तम वक्ता होऊ शकतो. असे महत्त्वपूर्ण विवेचन त्यांनी आपल्या व्याख्यानात मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी श्रीकांत डोंगळे यांनी तर आभार प्रकाश डोंगळे या विद्यार्थ्यांनी मांडले. कार्यक्रमास रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ केशव पाटील ,श्री एम. एस.सगरोळे ,शिबिर सहायक प्रकाश राठोड, व्यंकट पांचाळ व तसेच शिबिरार्थी आणि गावातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा