अनहद' हा निर्मोही फडके यांचा नवाकोरा ललितलेखसंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. यात एकूण ४० ललितनिबंध आहेत. ललितनिबंधांत लेखकाचं मुक्त चिंतन असतं. 'अनहद'मध्येही असंच मुक्त चिंतन आहे. माणसाचं मन हे बॅंकेतल्या लॉकरसारखं असतं. त्यात अनमोल ऐवज दडलेला असतो. ह्या ललितनिबंधांच्या माध्यमातून लेखिकेने आपल्या मनाचा लॉकर मोकळा केला आहे. मनातल्या अंधाराची वेगवेगळी रूपे उलगडून दाखविली आहेत. अंधाराला मॅरिनेट करण्याचा प्रयत्न ती करते आहे. लेखिकेने सारस्वत चक्रवर्ती यांच्या 'स्पोर्ट्समन' ह्या कथेतील 'एखाद्या माणसाची नीरवता वाङ्मय होऊ शकते' ह्या विधानाचा दाखला देत कोरोनाकाळातील नीरवतेलाच वाङ्मयात रूपांतरित केले आहे.
'अनहद' म्हणजे आपल्याच मनात घुमत असलेले अनाहत असे नाद. हे नाद शब्दांत पकडणे तसे अवघड काम असते. लेखिकेने हे अनाहत नाद मोठ्या कौशल्याने शब्दबद्ध केले आहेत. अमृता, इमरोज, साहिर आणि प्रीतम यांच्या निमित्ताने लेखिकेचे हे चिंतन सुरू होते. इमरोज अमृताला वेगवेगळ्या नावांनी संबोधत असे. त्याप्रमाणे ह्या ललितलेखांतील 'ती' 'त्या'ला रॉबिन, दगडफूल, धबुकडा, अमलताश, अनुतोषा, कस्तुरमोगरा, अवधूता, फणसोंबा, विभास अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधते. तसाच 'तो' तिला स्वयंप्रभे, सुहासिनी, विदग्धे, वेडाबाई, जलदेवते, अथेना, चित्रलेखा,
कामाक्षी, पर्णिनी, विभोरी, मनस्विते, विदेही, हिमगौरी, कृष्णे, अळिंबी, कदंबिनी, झिबी, मुग्धा, मेघना, मल्लिका अशा वेगवेगळ्या लडिवाळ नावांनी संबोधतो. ह्या सर्वच लेखांमध्ये लेखिकेचे कलासक्त मन प्रतिबिंबित झाले आहे.
ह्या ललितनिबंधांतील 'तो' आणि 'ती' दररोज सायंकाळी हातात हात गुंफून गावाबाहेरच्या त्रिकोणी टेकडीवर फिरायला जातात. ती टेकडीबाई आता तिची चांगली मैत्रीण बनली आहे. त्या टेकडीची दोघांनाही इतकी सवय झाली आहे, की तिला टेकडीबाईनं कवेत घेतल्याचा भास होतो. त्या टेकडीवर पारिजातक घमघमत असतो. पालाण टाकून बसलेली टेकडीबाई यांच्याकडे टुकूटुकू बघत असते. आनंदाच्या प्रसंगी ही टेकडीबाई तोंडाचं बोळकं करून मनापासून हसते. याच टेकडीवर तिला एक पिंगळा भेटतो, भविष्य सांगणारा. तो तिला एका अतृप्त बाईची गोष्ट सांगतो. ती हळदुली पाऊलवाट त्यांना खुणावत असते. 'त्या'च्या रूपात तिला रातवा भेटतो, धसमुसळा. त्याच्या सहवासात तिला अंगभर सोनचाफा बहरल्यागत होतं. म्हणून तर ती त्याला विनवते, 'आज जाने की जिद ना करो...'
मावळतीचं लखलखीत कांचनी गोलाकार रहस्य पाहून 'ती' हरखून जाते.
टेकडीच्या पाऊलवाटेवर देवबाभूळ दिसताच लेखिकेला एकदम रुक्मिणीची आणि आवलीची आठवण होते. देवबाभळीने त्या दोघींच्या कपाळावर भंडारा उधळल्याची आणि तळव्यांना अभंग काटे दिल्याची आठवण जागी होते. मग आभाळातील इवलाले पांढुरके ढग धुपांगारासारखे दिसू लागतात. विषारी विचारांच्या काटेरी रोपट्यांची पैदास भोवतालात जोमाने होत असल्याची जाणीव तीव्र होते. 'अद्भुत' ह्या लेखात वसुमती चेटकिणीचा संदर्भ येतो. स्त्रीधर्म नको असलेल्या किंवा स्त्रीधर्म नाकारणाऱ्या मुलींनाच ती दिसते, अशी वदंता. लेखिकेने वाचकांना मंदिरांच्या आणि चर्चच्या परिसरातून फिरवून आणले आहे, पण कुठेही कालबाह्य धर्मश्रद्धांना खतपाणी घातले नाही. कारण त्यांची दृष्टी धर्मनिरपेक्षतेची आहे.
कामाक्षी मंदिरात स्त्रीलिंगाची पूजा केली जाते आणि शिवमंदिरात पुरुषलिंगाची पूजा केली जाते. अशा भाबड्या लोकभावनांचा आणि धर्मश्रद्धांचा 'रहस्य' ह्या लेखात भेद केला आहे. शेवटी 'लिंगांची मंदिरं बांधली म्हणून लिंगभावना कमी होत नाही. ना पुरुषाची, ना बाईची', अशा शब्दांत मल्लिनाथी केली आहे.
ब्रह्मपुत्रा ही नदी म्हणून आपल्याला माहीत आहे. एका लेखात ब्रह्मपुत्राचा 'नद' असा पुल्लिंगी उल्लेख आला आहे. ब्रह्मपुत्राच्या जन्माची आख्यायिकाही सांगितली आहे. ब्रह्मपुत्राच्या संदर्भात निर्माण झालेल्या पर्यावरणीय प्रश्नांचा आढावाही घेतला आहे. चिंतनशीलता हा ह्या लेखिकेचा स्थायीभाव आहे.
'मनाचे मेहुंडे' ह्या लेखात ज्ञानेश्वरांच्या एका ओवीतील सौंदर्य उलगडून दाखविले आहे. 'साजिंदा श्रावण' ह्या लेखात श्रावणाची विविध रूपे भेटतात. लेखिकेला हाच श्रावण भावनांचा साजिंदा साथीदार वाटतो. निरागसतेच्या आड खोडकरपणा करणाऱ्या अवखळ मुलासारखा वाटतो. स्त्रीच्या भावभावना आंदोलित करणारे श्रावणी झोके तर हवेहवेसे! 'कैलासपती' हा शब्द उच्चारताच आपल्याला महादेवाची आठवण होते. 'योगिराज कैलासपती' ह्या लेखात लेखिकेने 'नागचाफा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका फुलझाडाची ओळख करून दिली आहे. 'ग्लॅडिओलस' ह्या लेखात परदेशातून आलेल्या आणि इथेच रुजलेल्या एका सुंदर फुलझाडाची ओळख करून दिली आहे.
'उन्मनी' ह्या लेखात तमीळ भाषेतील आद्य कवयित्री अंदाळ, मधुराभक्तीचे अत्त्युच्च शिखर असलेल्या संत मीराबाई आणि संत जनाबाई यांच्याशी संवाद साधला आहे. ह्या तिघींचंही 'बाईपण' लेखिकेला 'भारी' वाटतं. अंदाळच्या एका कवितेचा लेखिकेने केलेला भावानुवाद अतिशय भावस्पर्शी उतरला आहे. 'नर्मदा आणि मी' ह्या लेखात नर्मदेची परिक्रमा घडविली आहे. नर्मदेशी आपली नाळ किती आदिम आहे, हे सांगितले आहे. मेकल पर्वतावर शंकराच्या घामापासून नर्मदेचा जन्म झाला, यांसारख्या पुराकथा वाचकांच्या ज्ञानात भर घालतात. लेखिकेने अनुभवलेला नर्मदेचा अभ्रकी खळाळ वाचकाच्या मनात गुंजत राहतो. इतके हे लेखन प्रत्ययकारी आहे. ह्या निबंधांमध्ये कथा आणि कविता एकरूप झाल्या आहेत.
निसर्ग हाच खरा कलाकार आहे, ह्या विधानाची प्रचिती पुस्तकाच्या पानोपानी येते. किंबहुना निसर्ग, माणूस आणि मानवी मन हेच लेखिकेच्या चिंतनाचे प्रमुख विषय आहेत. लेखिकेचे निसर्गवेड स्तिमित करणारे आहे. लेखिकेचे निसर्गप्रेमी मन प्रत्येक लेखात प्रतिबिंबित झाले आहे. ह्या लेखांतील पारिजातक, टेकडीबाई, नर्मदा नदी, पायवाटा, आकाश, कैलासपतीचे झाड, पानं, फुलं, पक्षी, निळ्या रंगाची प्रवाही चंद्रकोर, सूर्य, प्रकाश आणि अंधार यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लाभले आहे. लेखिकेने शब्दांच्या कुंचल्याने लोभस निसर्गाची शब्दचित्रं रेखाटली आहेत. त्यामुळे निसर्गाच्या कलाकुसरीची ही वर्णने अतिशय साजिवंत उतरली आहेत. हे सगळेच लेख निसर्गाकडे पाहण्याची अद्भूतरम्य दृष्टी देतात.
'अनहद' वाचत असताना शांता शेळके यांचे ललितनिबंध हमखास आठवतात. शांता शेळके यांचे ललितनिबंध पान दोन पानांत अपेक्षित परिणाम साधून जातात. तसाच प्रकार 'अनहद'मध्ये आहे. हे सगळेच साधारण दोन पानांचे आटोपशीर निबंध आहेत. आकार छोटा, पण परिणाम मोठा असे ह्या लेखांचे स्वरूप आहे. डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत ह्या लेखांचा उल्लेख 'लेखुले' असा केला आहे. तो अगदी सार्थ आहे. ह्या सगळ्या लेखिकेच्या अनुभवकणिका आहेत. एकेक लेख म्हणजे एकेक मनोवस्था किंवा भावावस्थेचा इंद्रधनुषी आलेख आहे. मानवी मनातील विविध भ्रमविभ्रम आणि भावकल्लोळ लेखिकेने छान टिपले आहेत. हे लेख म्हणजे मानसिक आणि भावनिक पातळीवरचा संवाद आहे. स्वतःच स्वतःशी साधलेला संवाद. ह्रदयस्थाशी साधलेला हा ह्रद्य असा संवाद आहे. हे आपसात संवाद साधणारे दुसरे तिसरे कोणी नसून एकाच झाडावरचे दोन पक्षी आहेत. काही लेखांत लेखिकेने लोकभावनांचे आणि लोकश्रद्धांचे उत्तम उत्खनन केले आहे. त्या माध्यमातून विविधांगी लोकसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडविले आहे.
निर्मोही फडके यांची लेखनशैली अतिशय ओघवती आणि प्रवाही आहे. लेखिकेची भाषाशैली अतिशय काव्यात्म आहे. लेखिकेने आपल्या ललितलेखनात शब्दांचा मितव्यय केलेला आहे. धबुकडा, सोनसळी ऊन, हळदुली पाऊलवाट, कोमेजलेली पाऊलवाट, मांजरझाक, उन्हाचा झळंबा, सांजावलेला उजेड, पाखरांचा अन्हाडपणा, बाळसावलेली बारव, पश्चिमेचा ओपसरा, खडकुती शेताडी, अमृतमुळी देवबाभूळ, पश्चिमेचा इरकली टोपपदर, घनदाटलेलं आभाळ, अनेकरंगी अस्वस्थता असे काही खास शब्द घडविले आहेत. लेखिकेची लाघवी भाषा मोठीच मोहक आहे! निर्मोहीच्या भाषेचे मोहजाल वाचकाच्या मनाला मोहिनी घातल्याशिवाय राहत नाही.
ललितनिबंधांची शीर्षके मोठी आकर्षक आहेत. बंदिश, धडकन, गहराई, चिनगारी, परछाई, रुतबा, लम्हा, महक, तलाश, अनहोनी, आरजू, रूह, फरिश्ता, तूफान, आमेन, नजराना, साज ह्या उर्दू, अरबी आणि फार्सी भाषेतून आलेल्या शब्दांनी निबंधांची शीर्षके सजविली आहेत. ह्या शब्दांच्या अर्थच्छटा आणि भाषेचे वळणवळसे वाचकाला समृद्ध करतात.
'त्याचं येणं
उधाण मला
किती राखायचं
असं जिवाला'
ह्या कवितेच्या ओळींसारखे हे ललितलेख अतिशय उत्कट, तरल आणि भावस्पर्शी आहेत. लेखिकेने मूर्त जगण्यातले अमूर्तपण कौशल्याने उजागर केले आहे.
ह्या लेखांमध्ये अमृता, इमरोज, साहिर, प्रीतम यांचे संदर्भ तर येतातच, शिवाय रॉबिनहूड, चांदणी केदार राग यांचेही संदर्भ येतात. सारस्वत चक्रवर्ती यांची कथा, प्रतिभा राय यांची कथा, ग्रेसची कविता, महाश्वेता देवींचे साहित्य,
रजिया सुलतान चित्रपटातील गाणी, मुघल ए आझम मधील भिंत, मोहोंजोदडोची शेवटची भिंत, ट्रॉय शहराची भिंत, इलियड महाकाव्य, पोवळ्याचं झाड, कामाक्षी मंदिर, पुरीचे जगन्नाथ मंदिर, रमलविद्येतील रमलखुणा, आद्य संतकवयित्री अंदाळ, संत मीराबाई आणि जनाबाईच्या रचना, हादग्याची आणि भोंडल्याची गाणी, ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांचे अभंग, रवींद्रनाथ टागोरांच्या कविता, डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी विचार, असे विविध संदर्भ येतात. यावरून लेखिकेचे वाचन आणि व्यासंग किती विविधांगी आहे, याची आपल्याला कल्पना येते.
'म्हातारपणी आपलं बालपण रिव्हर्स होऊन येतं', 'कोणतीही कलाकृती स्वतःत अपूर्ण असेल, तरच ती दुसर्याला अस्वस्थ करते', 'मन तर नाचरं असतंच सगळ्यांचं', 'शेवटच्या क्षणापर्यंत आपण शंभर टक्के स्वतःला सापडलेलेच नसतो',
ह्या विधानांतून लेखिकेच्या चिंतनाची खोली आपल्या लक्षात येते. 'त्या तरुतळी विसरले गीत' ही लेखिकेची खंत वाचकाला अस्वस्थ करून जाते.
ह्या लेखांमध्ये लेखिकेने जगण्यातले अनेक लोभस क्षण हळुवारपणे टिपले आहेत. मनतळीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मनातील अमूर्त ध्वनी टिपले आहेत. प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे. खरोखरच जगतोय रोज की, कणाकणानं मरतोय हे न कळण्याच्या आजच्या अस्वस्थ कालखंडात 'अनहद'मधील निबंध वाचकाच्या मनाला उभारी देतात. हे लेख वाचणे हा एक आनंददायी अनुभव आहे.
'अनहद' (ललितलेखसंग्रह)
लेखिका : डॉ. निर्मोही फडके
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
पृष्ठे : १२६ किंमत रु. २००
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा