नांदेड ः
आधुनिक होतानाही सर्वच क्षेत्रांत भारतीय परंपरेतील नीतिमूल्यांचे संस्कारच सर्व आरोग्य विषयक (मानसिक -भावनिक-शारिरीक), कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, आर्थिक आणि कलाक्षेत्रांतील समस्यांवर उत्तर ठरू शकते, असा सूर 'ती आणि तिचं विश्व' या महाचर्चेत उमटला.
महिला समन्वय समिती, अभंग पुस्तकालय, भाग्यलक्ष्मी बॅंक, संत दासोपंतस्वामी प्रतिष्ठान आणि प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या वतीने महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी 'ती आणि तिचं विश्व' महाचर्चा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सौ.मुग्धा बोरगांवकर यांनी तयार केलेल्या श्रीलक्ष्मी-सरस्वती- अन्नपूर्णा यांच्या प्रतिमांच्या शक्ती पूजनाने झाली.
यावर्षीच्या संकल्पनेची म्हणजे प्रेरणा आणि समावेशन (Inspire-Inclusion) या संदर्भातने शिवराज पाटील यांनी अप्रतिम भू-अलंकरण केले.
विजया वाड लिखित 'आम्ही बाया गं' हे स्त्री गीत अंजली देशमुख, अंजली दीक्षित, अंजली माजलगांवकर, मनिषा पाठक, स्वरा उमरीकर, मंजुषा देशपांडे यांनी अतिशय सुंदर गायले. तबल्याच्या साथीला राघव जोशी होता. विशेष निमंत्रित म्हणून सौ.स्मिता गंगाखेडकर या उपस्थित होत्या.
सौ. सुरेखा किनगांवकर यांनी प्रास्ताविक केले. सौ.पल्लवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर महाचर्चेला सुरूवात झाली.
महिलांची आर्थिक साक्षरता या विषयावर सौ.सीमा आतनुरकर, कुटुंब आणि महिला यावर सौ.राधिका वाळवेकर, महिलांचे आरोग्य डॉ. सौ.संगीता मसारे, महिलांची सामाजिक स्थिती आशाताई पैठणे, महिलांची शैक्षणिक स्थिती सौ.राजश्री धर्मापुरीकर, महिलांचे वाचन सौ. नीमा कुळकर्णी, कला, छंद आणि महिला सौ. कविता जोशी यांनी विचार मांडले. तर, महिलांचे राजकारण यावर सौ.अपर्णा चितळे यांच्याशी डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी व सौ.शर्वरी सकळकळे यांनी संवाद साधला.
यावेळी महिला व कुटुंब, समाज, शिक्षण, लेखन-वाचन, राजकारण, कला - छंद, आरोग्य आणि महिलांची आर्थिक साक्षरता या विषयांवर अत्यंत सकस अशी चर्चा झाली. सकारात्मक आणि नकारात्मक बाबींवर सर्वच वक्त्यांनी प्रगल्भ विचार मांडले. तसेच सौ.ज्योती डोईफोडे यांनी या चर्चेवर भाष्य केले. सौ.पल्लवी निळेकर यांनी आभार मानले. वंदे मातरम् या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पद्मजा जोशी, वर्षा जोशी, रावी नेरकर तसेच प्रतिभा निकेतन महाविद्यालय आणि माधव घोरबांड, संजय हजारे, सौ.वर्षा रासे यांनी याप्रसंगी मोलाचे सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा